Ashadhi Wari 2023 : रुक्मिणी आणि संत गजानन या मानाच्या दोन पालख्या हिंगोली जिल्ह्यात, भाविकांचं भक्तीमय वातावरणात स्वागत
शेगावहून निघालेली संत गजानन महाराजांची पालखी (Sant Gajanan Maharaj Palkhi) आणि वाशिमहून निघालेली रुक्मिणीची पालखी (Rukmini Palkhi) आज हिंगोली जिल्ह्यात मुक्कामी आहेत.
Hingoli Palkhi: हिंगोली जिल्ह्यांमध्ये सगळीकडे भक्तीमय आणि आनंदाचे वातावरण असल्याचं चित्र आहे. कारण शेगाव होऊन निघालेली संत गजानन महाराजांची पालखी जिल्ह्यात पोहचली आहे तर वाशिमहून निघालेली रुक्मिणीची पालखी सुद्धा हिंगोली जिल्ह्यात मुक्कामी आहे. त्यामुळे जिल्हाभरात भक्तीमय वातावरण झाले आहे.
आषाढी एकादशीनिमित्त आपल्या सावळ्या विठुरायाला भेटण्यासाठी महाराष्ट्रभरातून अनेक मानाच्या त्याचबरोबर इतरसुद्धा अनेक पालख्या, दिंड्या पंढरपूरच्या दिशेने निघत असतात. अगदी वर्षभरापासून आतुरलेले हे वारकरी आपल्या विठुरायाला भेटण्यासाठी मजल दरमजल करत पायी प्रवास करून पंढरीला पोहोचत असतात. याच मानाच्या समजल्या जाणाऱ्या पालख्यांपैकी दोन पालख्या, शेगावहून निघालेली संत गजानन महाराजांची पालखी आणि वाशिमहून निघालेली रुक्मिणीची पालखी आज हिंगोली जिल्ह्यात मुक्कामी आहेत. त्यामुळे जिल्ह्याभरामध्ये अगदी भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे.
शेगावहून निघालेली गजानन महाराजांची पालखी हिंगोलीत
विदर्भाची पंढरी असलेल्या शेगाव संत गजानन महाराजांची निघालेली पालखी हिंगोली जिल्ह्यात दाखल झाली असून ही पालखी दरवर्षी तीन दिवस हिंगोली जिल्ह्यांमध्ये मुक्कामी असते. यावर्षी या पालखीमध्ये एकूण साडेसातशे वारकरी सहभागी झाले असून आषाढी एकादशीनिमित्त ही वारी पंढरपूरला पोहोचत असते. एका महिन्यामध्ये साडेपाचशे किलोमीटरचा पायी प्रवास करून ही पालखी पंढरपूरला पोहोचणार आहे. या वर्षीचे वारीचे हे 51वे वर्ष आहे. बुधवारी रात्री या पालखीचा मुक्काम हिंगोलीचा डिग्रस कऱ्हाळे या गावांमध्ये झाला असून पुढील पायी प्रवासासाठी पालखी निघाली आहे. अत्यंत शिस्तीत चालणारे वारकरी पांढरे शुभ्र कपडे आणि हातात भगवा झेंडा हे या वारीचे वेगळेपण असतं. हातात टाळ आणि मृदुंग विठ्ठल नामाचा जयघोष अशा या भक्तीने वातावरणामध्ये ही पालखी मजल दरमजल करत पंढरपूर कडे प्रवास करत आहे.
रुक्मिणीची पालखी हिंगोली जिल्ह्यात
रुक्मिणी मातेचे माहेर श्रीक्षेत्र कोंडण्यपूर येथील श्री विठ्ठल-रुक्मिनी संस्थानतर्फे पंढरपूर वारी 23 तारखेला प्रस्थान झाली आहे. रुक्मिणी मातेचा पायदळ पालखी दिंडी सोहळा 428 वर्षांपासून सुरू आहे. संत सदाराम महाराजांनी 1594 साली या वारीला प्रारंभ केला आहे. वारीचे हे 429 वे वर्ष आहे. आई रुक्मिणी मातेची ही पालखी अतिशय जुनी असल्याने जागोजागी या पालखीचे मोठ्या भक्तिभावाने स्वागत केल्या जाते. ही पालखी काल हिंगोली जिल्ह्यात दाखल झाली आसून बुधवारी या पालखीचा कान्हेरगाव नका येथे मुक्काम होता हिंगोलीकरांच्या वतीने जल्लोषात स्वागत करण्यात आले आहे. आता ही पालखी पंढरपूरचा पुढील प्रवास करण्यासाठी निघाली आहे.
ही बातमी वाचा :