रुग्णालयामध्ये डॉक्टर उपलब्ध नसल्यानं मध्यरात्री राजन साळवी आक्रमक, डीन आणि रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना विचारला जाब
जिल्हा रुग्णालयातील परिस्थितीबाबत मुख्यमंत्री, आरोग्यमंत्री आणि जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांची भेट घेणार असल्याची माहिती आहे.
रत्नागिरी: राज्यातील रुग्णालये मृत्यूचे सापळे बनत चालले आहे. सातत्याने शासकीय रुग्णालयांतील (Government Hospital) दुर्घटना समोर येत असताना सरकार आणि प्रशासनाकडून कोणत्याही ठोस हालचाली होताना दिसत नाही. नेमलेले डॉक्टर कधीच रुग्णालयात उपस्थित नसतात. त्यामुळे रुग्णांवर वेळेवर उपचार होत नाहीत, असे अनेक प्रकार आपण पाहिले आहेत. असाच एक प्रकार रत्नागिरी (Ratnagiri News) जिल्हा रुग्णालयात पाहायला मिळाला. रुग्णालयात डॉक्टर उपलब्ध नसल्याने रुग्णाला ताटकळत बसावे लागले. डॉक्टरांची प्रतीक्षा केल्यानंतर वैतगलेल्या रुग्णाच्या नातेवाईकानी थेट ठाकरेंच्या शिलेदाराला फोन केला. फोन केल्यानंतर ठाकरेंचा शिलेदाराने मध्यरात्री रुग्णालयात गाठले आणि रुग्णालय प्रशासनाला फैलावर घेतले.
शिवसेनेच्या ठाकरे गटाचे आमदार आणि उपनेते राजन साळवी यांनी मध्यरात्री जिल्हा रुग्णालय गाठलं. डॉक्टर उपलब्ध होत नसल्याने साळवी यांनी डीन आणि रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना जाब विचारला. तसेच जिल्हा रुग्णालयातील परिस्थितीबाबत थेट सरकारला जाब विचारणार आहे. जिल्हा रुग्णालयातील परिस्थितीबाबत मुख्यमंत्री, आरोग्यमंत्री आणि जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांची भेट घेणार असल्याची माहिती आहे.
राजन साळवी आक्रमक
रत्नागिरी जिल्हा रुग्णालयामध्ये अपघात विभागात तब्बल चार तासाहून अधिक काळ डॉक्टर उपलब्ध नसल्याची तक्रार शिवसेनेच्या ठाकरे गटाचे आमदार आणि उपनेते राजन साळवी यांच्याकडे रुग्णांच्या नातेवाईकांनी केली. त्यानंतर मध्यरात्री 12 वाजता राजन साळवी यांनी जिल्हा रुग्णालयामध्ये धाव घेत प्रत्यक्ष पाहणी करून सर्व परिस्थितीचा आढावा घेतला. दरम्यान मेडिकल कॉलेजचे डीन येत नाहीत तोवर जिल्हा रुग्णालयातून हलणार नाही अशी आक्रमक भूमिका राजन साळवी यांनी घेतली. त्यानंतर मेडिकल कॉलेजचे डीन जिल्हा रुग्णालयामध्ये तातडीने दाखल झाले. यावेळी राजन साळवी यांनी संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेतला. ही परिस्थिती गंभीर असून यामध्ये रुग्णांचे हाल होता कामा नये अशी अपेक्षा त्यांनी बोलून दाखवत असताना मेडिकल कॉलेजच्या डीन यांना देखील धारेवर धरले.
मुख्यमंत्री, आरोग्यमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री यांची भेट घेणार
जिल्हा रुग्णालयामध्ये ग्रामीण आणि दुर्गम भागातून रुग्ण येत असतात. अशा वेळेला डॉक्टर उपलब्ध नसतील, तर रुग्णांनी नेमकं करायचं तरी काय? असा सवाल राजन साळवी यांनी यावेळी उपस्थित असलेल्या जिल्हा रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना केला. शिवाय आपण स्वतः यामध्ये लक्ष घालणार असून राज्य शासनाला याबाबत भूमिका घेण्यास भाग पाडू असा पवित्रा सध्या राजन साळवी यांनी घेतला आहे. त्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री, आरोग्यमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री यांची भेट घेणार असल्याची माहिती राजन साळवी यांनी दिली. आपल्या मतदारसंघातील दौरा आटपून राजन साळवी रत्नागिरीकडे आपल्या घरी येत असताना त्यांना जिल्हा रुग्णालयातील परिस्थिती कळली. त्यानंतर साळवी यांनी थेट जिल्हा रुग्णालय गाठले.
हे ही वाचा :