मैत्रिणीच्या फ्लॅटवर तरूणाची आत्महत्या; पोलिसांनी मैत्रिणीवर केला गुन्हा दाखल
Ratnagiri latest Crime News : मैत्रिणीला वारंवार लग्नासाठी विचारत होता. पण, ती त्याला नकार देत होती. यातूनचं त्यानं टोकाचं पाऊल उचललं
Ratnagiri latest Crime News : प्रेमात निराशा आणि अपयश आल्यानंतर अनेकजण टोकाचं पाऊल उचलतात. आयुष्य संपवण्यापर्यंत देखील काही घटना समोर येतात. काही वेळा एकतर्फी प्रेमातून देखील टोकाचं पाऊल उचललं जात असल्याच्या घटना समोर येतात. अशाच प्रकाराची एक घटना रत्नागिरीमधून समोर आली आहे. प्रेयसीनं लग्नास नकार दिल्यानं तरूणानं टोकाचं पाऊल उचलत आयुष्य संपवल्याची घटना रत्नागिरी शहरात समोर आली आहे. साहिल मोरे असं या तरूणाचं नाव असून त्यानं 21 ऑक्टोबर रोजी गळफास घेत आपलं आयुष्य संपवलं आहे. मुख्य बाब म्हणजे त्यानं आपल्या मैत्रिणीच्या फ्लॅटवर गळफास घेतला. त्यानंतर साहिलच्या मैत्रिणीनं आपल्या आणखी एका मैत्रिणीच्या साहाय्यानं साहिलला एका खासगी रूग्णालयात दाखल केलं. पण, तोपर्यंत फार उशीर झाला होता. कारण, डॉक्टरांनी साहिलला मृत घोषित केले होते. साहिलनं उचललेल्या टोकाच्या पावलामुळे रत्नागिरी शहरासह सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात आली. या प्रकरणी आता रत्नागिरी शहर पोलिसांनी साहिलच्या मौत्रिणीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. साहिलच्या बहिणीनं याबाबत पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. त्यानंतर पोलिसांनी तपास करत साहिलच्या मैत्रिणीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
मैत्रिणीचा लग्नास नकार -
साहिल आपल्या मैत्रिणीला वारंवार लग्नासाठी विचारत होता. पण, ती त्याला नकार देत होती. एका दिवशी साहिल त्याच्या मैत्रिणीच्या फ्लॅटवर गेला, त्यावेळी देखील त्यानं तिला लग्नास विचारले होते. पण, तिनं नकार दिला. यावेळी दिलेला नकार साहिलला सहन झाला नाही. त्यानंतर त्यानं मैत्रिणीच्या फ्लॅटवरील किचनमध्ये जात थेट गळफास घेत आपलं आयुष्य संपवलं. याच प्रकरणात आता साहिलच्या मैत्रणिविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
आयुष्य एकदाच मिळतं -
आयुष्यात अनेक चढ - उतार येत असतात. काही वेळी अपयशाचा देखील सामना करावा लागतो. पण, त्यानं खचून जाणं हा पर्याय नाही. प्रेमामध्ये देखील अपयश येतं. काही वेळी प्रेम कायम स्वरूपी राहतं. तर काही वेळी त्यामध्ये देखील नकार येतो. पण, त्यामुळे आयुष्य संपवणं ही गोष्ट चुकीची आहे. आपल्या मागे आपल्या कुटुंबातील इतरांचा विचार होणं देखील गरजेचं आहे अशा प्रकारचा मतप्रवाह देखील सध्या समोर येत आहे.