Rajan Salvi: ACB च्या नोटिशीनंतर आमदार राजन साळवींची पहिली प्रतिक्रिया, तुरुंगात डांबले तरी उद्धव ठाकरेंसोबत राहणार
Maharashtra Politics Shivsena: एसीबीकडून आलेली नोटीस ही दबावाची कारवाई सुरू असून तुरुंगात गेलो तरी उद्धव ठाकरेंसोबत कायम असणार असल्याचे आमदार राजन साळवी यांनी म्हटले.
Maharashtra Politics Rajan Salvi: शिवसेनेचे ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक (Vaibhav Naik) यांच्यानंतर राजापूरचे आमदार राजन साळवी (Rajan Salvi) यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (Anti-Corruption Bureau-ACB) नोटीस बजावल्यानंतर पुन्हा एकदा दबावाच्या राजकारणाची चर्चा सुरू झाली आहे. एसीबीच्या नोटिशीनंतर आमदार राजन साळवी यांनी आज पत्रकार परिषद घेत तुरुंगात डांबले तरी उद्धव ठाकरे यांची साथ सोडणार नसल्याचे सांगितले. आपण मातोश्रीशी एकनिष्ठ असल्यामुळेच ही नोटीस बजावण्यात आल्याचे त्यांनी म्हटले. या नोटिशीमागे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असल्याचाही आरोप त्यांनी केला.
शिवसेना ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी यांनी आज पत्रकार परिषद घेत एसीबीकडून आलेल्या नोटिशीनंतर पत्रकार परिषद घेतली. आमदार साळवी यांनी म्हटले की, राजकीय उलथापालथीनंतर मी निष्ठावंत राहिलो. मी उद्धव ठाकरे यांची साथ सोडली नाही. त्यामुळेच मला ACB ची नोटीस आली आहे. यंत्रणाचा वापर करत नोटीस दिल्या जात असल्याचा आरोप साळवी यांनी केला. ज्यांच्यावर बेहिशेबी मालमत्ताचा आरोप ते भाजपमध्ये जात आहेत. मलादेखील तुम्हाला तुरुंगात डांबणार अशा धमक्या देण्यात आल्या असल्याचा दावा साळवी यांनी केला. आपण एसीबीच्या नोटिशीला घाबरत नसून चौकशीला सामोरे जाणार असल्याचेही त्यांनी म्हटले. नोटीस पाठवण्याइतके माझ्याकडे कोणते घबाड आहे, हाच प्रश्न मला पडला असल्याचेही साळवी यांनी म्हटले.
उद्धव ठाकरे यांच्यासोबत कायम
राजन साळवी हे शिंदे गटाच्या मार्गावर असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होती. आमदार साळवी यांनी प्रस्तावित रिफायनरी प्रकल्पाला पाठिंबा दर्शवला. त्यानंतर त्यांच्या शिंदे गटातील प्रवेशाबाबत चर्चा सुरू होत्या. आज राजन साळवी यांनी या मुद्यावर भाष्य करताना आपण तुरुंगात गेलो तरी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत कायम राहणार असल्याचे म्हटले. मला स्वकीयांचा, पक्षातील कोणत्याही व्यक्तीचा त्रास नाही. उद्धव ठाकरे यांनी आपण पाठिशी असल्याचे आश्वासन दिले असल्याचे साळवी यांनी म्हटले.
15 दिवसांची मुदत मागितली
मला 15 दिवसांची मुदत द्या अशी मागणी एसीबीकडे केली असल्याचे आमदार राजन साळवी यांनी म्हटले. आमदार साळवी यांना एसीबीने चौकशीसाठी अलिबाग येथे सोमवारी, 4 डिसेंबर रोजी बोलावले आहे. या दरम्यान, एसीबीने मला अटक केली तरी चालेल असेही त्यांनी म्हटले. मी कोणत्याही दबावाला बळी पडणार नसून मी मरेपर्यंत तुरुंगात राहीन, पण कुठही जाणार नाही, असेही साळवी यांनी म्हटले.