Kirit Somaiya : अनिल परब यांच्या रिसॉर्टविरोधात एफआयआर का नाही? सोमय्या आज पुन्हा रत्नागिरीत
Kirit Somaiya : अनिल परब यांच्या कथित साई रिसॉर्टवर तोडक कारवाई करावी या मागणीसाठी किरीट सोमय्या आज पुन्हा एकदा रत्नागिरीत दाखल होत आहेत.

Kirit Somaiya : शिवसेना नेते आणि राज्याचे माजी परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) यांच्या कथित मालकीच्या रिसॉर्टवर तोडक कारवाईसाठी भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या (Kirit Somaiya) आणखी आक्रमक झाले आहेत. सोमय्या यांनी आज पुन्हा एकदा रत्नागिरीत दाखल होणार असून जिल्हाधिकाऱ्यांसह इतर महत्त्वाच्या अधिकाऱ्यांची भेट घेणार आहेत. सोमय्या आज सकाळीच रत्नागिरीसाठी रवाना झाले आहेत.
अनिल परबांशी संबधित दापोलीतल्या रिसॉर्टवर हातोडा पडत नाही तोपर्यंत शांत बसायचं नाही असा चंगच जणू भाजप नेते किरीट सोमय्यांनी बांधलेला दिसतोय. सोमय्या आज रत्नागिरीचे जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक आणि मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची भेट घेणार आहेत. दिवाळीपर्यंत अनिल परब यांच्या मालकीचे साई रिसॉर्ट पडणार असा विश्वास सोमय्यांनी व्यक्त केला आहे.
अनिल परब यांच्या मालकीच्या असलेल्या रिसॉर्टच्या बाजूच्या रिसॉर्टवर एफआयआर दाखल झाला आहे. मग अनिल परब यांच्या रिसॉर्टवर का नाही? असा सवाल सोमय्या यांनी उपस्थित केला आहे. ठाकरे सरकारने अनिल परब रिसॉर्टबाबत वेगळी भूमिका घेतली असल्याचा आरोप सोमय्यांनी केला आहे. अनिल पराब यांच्या रिसॉर्टबाबत FIR दाखल करणार असून दिवाळीपर्यंत परब यांचे रिसॉर्ट पडणार असल्याचे सोमय्या यांनी म्हटले.
काही दिवसांपूर्वीच सोमय्या हे दापोलीत रिसॉर्टवर तोडकामाच्या कारवाईच्या मागणीसाठी दाखल झाले होते. मात्र, प्रशासनाने दिलेल्या माहितीने समाधान झाल्याने त्यांनी रिसॉर्ट परिसरात दाखल होण्याचे टाळले होते.
रिसॉर्टवर कारवाईचे आदेश
रिसार्टसंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हास्तरीय कोस्टल झोन मॉनिटरिंगची कमिटीची बैठक पार पडली. या बैठकीत रिसॉर्ट पाडण्यासंदर्भात बांधकाम विभागाला नियोजन करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले होते. केंद्र शासनाच्या आदेशाप्रमाणे आणि शासकीय पद्धतीने रिसॉर्ट पाडण्यासंदर्भात प्रक्रिया सुरू झाली असून लवकरच कारवाई होणार आहे. सी कोच आणि साई रिसॉर्ट पाडण्यासंदर्भात आराखडा तयार करण्यात आला आहे. रिसॉर्ट पाडण्यासंदर्भात बांधकाम विभागाला नियोजन करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. केंद्र शासनाने घालून दिलेल्या विहित नियमानुसार कारवाई होणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांनी 29 ऑगस्ट रोजी दिली होती.
सोमय्यांचे आरोप काय?
अनिल परब यांचे साई रिसॉर्ट हे बेकादयेशीर आहे. तसेच या रिसॉर्टच्या बांधकामात काळ्या पैशांचा वापर करण्याचा आरोपही सोमय्यांनी केला आहे. मार्च 2022 महिन्यात दापोली कोर्टात भारत सरकारने अनिल परब यांच्या विरोधात फौजदारी गुन्हा दाखल करावा अशी याचिका करण्यात आली. भारत सरकारच्या पर्यावरण मंत्रालयाने हा रिसॉर्ट बेकायदेशीर असल्याने 31 जानेवारी 2022 रोजी हा रिसॉर्ट 90 दिवसांत तोडण्याचे आदेश दिले होते. 12 मार्च 2021 रोजी रिसॉर्टचे उद्घाटन करण्यात आले होते. साई रिसॉर्ट एन एक्स व सी कोच हे अनधिकृत असून तोडण्याचे आदेश दिले होते. 90 दिवसांमध्ये रिसॉर्ट मालक किंवा प्रशासनाने हे दोन्ही रिसॉर्ट तोडायचे होते. मात्र, 90 दिवस पूर्ण झाले असून अजूनही रिसॉर्ट पाडण्यात आले नाही. या रिसॉर्टच्या व्यवहार प्रकरणात मनी लाँड्रिंगचा आरोप करण्यात येत आहे.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
