Kirit Somaiya Dapoli: साई रिसॉर्टवर सोमय्या पोहचलेच नाही, ग्रामपंचायतीच्या उत्तराने समाधान झाल्याचे दिलं स्पष्टीकरण
Kirit Somaiya Dapoli: शिवसेना नेते अनिल परब यांच्या कथित साई रिसॉर्टवर किरीट सोमय्या पोहचलेच नाही. तोडक कारवाईबाबत ग्रामपंचायत अधिकाऱ्यांनी दिलेल्या उत्तराने समाधान झाले असल्याचे त्यांनी सांगितले.
Kirit Somaiya Dapoli: शिवसेना नेते अनिल परब यांच्या मालकीच्या कथित रिसॉर्टवर (Shivsena Leader Anil Parab Resort) तोडक कारवाई प्रशासनाने करावी यासाठी भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या (Kirit Somaiya) आज दापोलीत दाखल झाले. साई रिसॉर्टवर तोडक कारवाई करावी या मागणीसाठी सोमय्या रिसॉर्टवर धडक मारणार होते. मात्र, त्यापूर्वीच मुरुड ग्रामपंचायतीच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या उत्तराने समाधान झाल्याने सोमय्या यांनी रिसॉर्टवर जाणार नसल्याचे जाहीर केले. त्याऐवजी शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर यांनी पाडलेला बंगला पाहणार जाणार असल्याचे सोमय्यांनी जाहीर केले.
रिसॉर्टवर तोडक कारवाई प्रशासनाने करावी यासाठी सोमय्या यांनी आज दापोली गाठले. सोमय्या यांनी खेड ते दापोली असा पायी दौराही काढला. काही ठिकाणी त्यांनी चौकसभांमध्ये भाषणे करत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, अनिल परब यांच्यावर टीका केली. काही दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रिसॉर्ट पाडण्याच्या आदेशावर स्वाक्षरी केली असल्याचा दावा किरीट सोमय्या यांनी केला होता.
रिसॉर्टवर तोडक कारवाई करावी या मागणीसाठी आज सोमय्यांनी आक्रमक पवित्रा घेतला. मुख्यमंत्र्यांनी रिसॉर्ट तोडण्याचे आदेश दिले असले तरी प्रशासनात उद्धव ठाकरे यांची माणसे आहेत. त्यांच्याकडून कारवाई होत नसल्याचा आरोप सोमय्यांनी केला. रिसॉर्ट असलेल्या मुरुड ग्रामपंचायतीत सोमय्या यांनी अधिकाऱ्यांची भेट घेतली. त्यांनी दिलेल्या उत्तराने समाधान झाले असल्याचे सोमय्यांनी म्हटले. तोडक कारवाईसाठी प्रतिकात्मक हातोडा ग्रामपंचायतीला देणार असल्याचे त्यांनी म्हटले. त्यानंतर आपण साई रिसॉर्टवर जाणार नसून मिलिंद नार्वेकर यांनी पाडलेला बंगला पाहण्यासाठी जाणार असल्याचे सांगितले. सोमय्या यांच्या तक्रारीनंतर मिलिंद नार्वेकर यांनी बंगल्याचा काही भाग पाडला होता. हा भाग अनधिकृत असल्याचा आरोप सोमय्यांनी केला होता. दरम्यान, साई रिसॉर्टजवळ मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. सोमय्या यांना रिसॉर्टच्या ठिकाणी येऊ नये यासाठी पोलिसांनी बंदोबस्त ठेवला असल्याचे म्हटले जात होते.
शिवसेनेकडून प्रतिउत्तर नाही
किरीट सोमय्या यांच्या दापोली दौऱ्याच्या दरम्यान स्थानिक शिवसैनिकांनी कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त केली नाही. स्थानिक शिवसैनिकांनी याला विरोध केला नाही. शिवसेनेने सोमय्यांच्या दौऱ्यात मवाळ भूमिका घेतली.
सोमय्यांचे आरोप काय?
अनिल परब यांचे साई रिसॉर्ट हे बेकायदेशीर आहे. तसेच या रिसॉर्टच्या बांधकामात काळ्या पैशांचा वापर करण्याचा आरोपही सोमय्यांनी केला आहे. मार्च 2022 महिन्यात दापोली कोर्टात भारत सरकारने अनिल परब यांच्या विरोधात फौजदारी गुन्हा दाखल करावा अशी याचिका करण्यात आली. भारत सरकारच्या पर्यावरण मंत्रालयाने हा रिसॉर्ट बेकायदेशीर असल्याने 31 जानेवारी 2022 रोजी हा रिसॉर्ट 90 दिवसांत तोडण्याचे आदेश दिले होते. 12 मार्च 2021 रोजी रिसॉर्टचे उद्घाटन करण्यात आले होते.
साई रिसॉर्ट एन एक्स व सी कोच हे अनधिकृत असून तोडण्याचे आदेश दिले होते. 90 दिवसांमध्ये रिसॉर्ट मालक किंवा प्रशासनाने हे दोन्ही रिसॉर्ट तोडायचे होते. मात्र, 90 दिवस पूर्ण झाले असून अजूनही रिसॉर्ट पाडण्यात आले नाही. या रिसॉर्टच्या व्यवहार प्रकरणात मनी लाँड्रिंगचा आरोप करण्यात येत आहे.
अनिल परब यांची ईडी चौकशी
शिवसेना नेते अनिल परब यांची दापोली रिसॉर्ट प्रकरणी याआधी ईडीने चौकशी केली आहे. राज्याचे परिवहन मंत्री असताना अनिल परब यांच्या शासकीय निवासस्थानी आणि खासगी निवासस्थानी ईडीकडून मे महिन्यात छापेमारी करण्यात आली होती. त्यानंतर अनिल परब यांची तीनदा ईडी चौकशी करण्यात आली होती. साई रिसॉर्ट आपले नसल्याचा दावा परब यांनी याआधीच केला आहे.