(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Nilesh Rane: अन् आक्रमक निलेश राणेंनी रिफायनरी विरोधकांची माफी मागितली, जाणून घ्या काय घडलं?
Nilesh Rane: आक्रमक स्वभावासाठी ओळखले जाणारे निलेश राणे यांनी रिफायनरी विरोधी आंदोलकांची माफी मागितली.
Nilesh Rane: आपल्या आक्रमक स्वभावासाठी ओळखले जाणारे भाजपचे नेते निलेश राणे यांनी चक्क आंदोलकांची माफी मागितली. निलेश राणे यांनी ही माफी आपल्या कार्यकर्त्यांसाठी मागितली. बारसू धोपेश्वर गावात रिफायनरी उभारण्यासाठी सर्वेक्षणाचे काम सुरू आहे. शनिवारी, या सर्वेक्षणाच्या कामाला स्थानिक रिफायनरी विरोधकांनी विरोध दर्शवला होता. त्यानंतर आज निलेश राणे सर्वेक्षणाच्या ठिकाणी गेले असता, त्यांना आंदोलकांच्या रोषाला सामोरे जावे लागले.
निलेश राणे यांनी आज प्रस्तावित रिफायनरीच्या जागेवर जमीन मालकांसह सकाळी भेट दिली होती. रिफायनरीची जागा ही एमआयडीसीची असून इतर ठिकाणी प्रकल्पासाठीच्या जमिनीचे मालक आपल्यासोबत आले असल्याचे त्यांनी म्हटले होते. आपण रिफायनरी आंदोलकांना भेटून त्यांचं म्हणणं ऐकणार असल्याचे राणे यांनी सांगत सर्वेक्षणाच्या ठिकाणी गेले.
राणे यांच्याविरोधात रोष
निलेश राणे हे सर्वेक्षणाच्या ठिकाणी दाखल होत असताना स्थानिक रिफायनरी विरोधकांनी त्यांचा ताफा अडवला. यावेळी राणे यांच्याविरोधात स्थानिक महिलांनी आक्रमक भूमिका घेत ठिय्या सुरू केला. स्थानिकांचा या रिफायनरीला विरोध असल्याचे महिलांनी आणि ग्रामस्थांनी निलेश राणे यांना ठणकावून सांगितले. रिफायनरीसाठी सुरू असलेले सर्वेक्षण तातडीने थांबवण्याची मागणी यावेळी ग्रामस्थांनी केली. रिफायनरी बाबत आपण चर्चा करुयात, त्यासाठी तुम्ही वेळ आणि ठिकाण ठरवा असे आवाहनही निलेश राणे यांनी केले.
अन् राणे यांनी माफी मागितली
निलेश राणे यांच्याविरोधात महिला ग्रामस्थांनी आक्रमक भूमिका घेतली. शनिवारी, स्थानिकांनी रिफायनरीचे काम थांबवले होते. त्यावेळी रिफायनरी विरोधक स्थानिक ग्रामस्थ आणि पोलिसांमध्ये बाचाबाची झाली. पोलिसांच्या कारवाईत एक महिला जखमी झाली होती. यावेळी काहींनी महिला आंदोलकांना शिविगाळ केल्याचा आरोप स्थानिकांनी केला. यामध्ये काही राणेंचे कार्यकर्ते होते असाही दावा करण्यात आला. शनिवारी घडलेल्या घटनांचा जाब स्थानिक, रिफायनरीविरोधी आंदोलकांनी निलेश राणे यांना विचारला. त्यावर निलेश राणे यांनी आपल्या कार्यकर्त्यांचे चुकले असल्यास माफी मागत असल्याचे सांगितले. आक्रमक असणाऱ्या निलेश राणे यांनी कार्यकर्त्यांसाठी चक्क माफी मागितल्याने कोकणात याची चर्चा सुरू झाली आहे.
पोलिसांच्या बळावर सर्वेक्षण करणार?
नाणार येथील रिफायनरी प्रकल्प रद्द केल्यानंतर राजापूर तालुक्यातील बारसू आणि इतर गावांमध्ये रिफायनरी प्रकल्प उभारण्यात येणार आहे. या रिफायनरीसाठी जमिनीचे, मातीचे सर्वेक्षण करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. शनिवारी, रिफायनरीविरोधक आंदोलकांनी ड्रोन सर्व्हे, माती परीक्षणाला विरोध केला होता. यावेळी पोलिसांसोबत मोठी बाचाबाचीदेखील झाली. स्थानिकांचा विरोध पाहता सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले नाही. त्यामुळे पोलिसांची अधिक कुमक बोलावून सर्वेक्षण करण्यात येणार असल्याचे म्हटले जात आहे.