मुंबईत वर्षा गायकवाडांच्या बालहट्टानं काय मिळवलं? कार्यकर्ते असूनही काँग्रेसने तब्बल 20 जागा वाऱ्यावर सोडल्या, वंचितने सुद्धा 16 जागांवर उमेदवार दिलेच नाहीत
Mumbai Congress Crisis in BMC Election: जागावाटपामध्ये वंचित बहुजन आघाडीला काँग्रेसकडून 62 जागा सोडण्यात आल्या. मात्र, यामध्ये सुद्धा 16 जागांवर वंचितकडून उमेदवारच देण्यात आलेले नाहीत.

Mumbai Congress Crisis in BMC Election: मुंबई महानगरपालिकेची अटीतटीची लढाई पहाता शिवसेना ठाकरे गटाकडून पहिल्यांदा राज ठाकरे यांना आपण 'मनसे' साद घालत सोबत घेतलं. त्यानंतर काँग्रेसला सुद्धा सोबत घेण्यासाठी शिवसेना ठाकरे गटाचा शेवटपर्यंत मनस्वी प्रयत्न सुरू होता. मात्र, त्याला पहिल्यांदा मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा खासदार वर्षा गायकवाड यांनी हरताळ फासत स्वबळाचा नारा दिला. मात्र, स्वबळाचा नारा देऊनही काँग्रेसला वंचितसोबत आघाडी करून वाट्याला आलेल्या सर्व जागांवर उमेदवार देण्यामध्ये अपयश आल्याचे दिसून येत आहे. इतकेच नव्हे तर वंचित बहुजन आघाडीसोबत युती करूनही तब्बल 36 जागांवर उमेदवार नसल्याने कोणाचा पायपुस कोणालाच नसल्याची स्थिती आहे. त्यामुळे वर्षा गायकवाड यांचा बालहट्ट मुंबईला काँग्रेसमध्ये चांगलाच नडला आहे का? अशी सुद्धा चर्चा राजकीय वर्तुळामध्ये रंगली आहे.
16 जागांवर वंचितकडून उमेदवारच देण्यात आले नाहीत
जागावाटपामध्ये वंचित बहुजन आघाडीला काँग्रेसकडून 62 जागा सोडण्यात आल्या. मात्र, यामध्ये सुद्धा 16 जागांवर वंचितकडून उमेदवारच देण्यात आलेले नाहीत. दुसरीकडे स्वबळाचा नारा देऊनही ठाकरेंशी नडलेल्या वर्षा गायकवाड यांना 20 जागांवर कार्यकर्ते असूनही उमेदवार न दिल्याने गोंधळ आणखी वाढला आहे. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आल्यानंतर वर्षा गायकवाड यांच्याकडून विचारसरणीचा आणि उत्तर भारतीय मतांचा विचार करून कडाडून विरोध करण्यात आला. राज ठाकरे यांच्यासोबत कोणत्याही प्रकारची युती केली जाणार नाही, अशी वक्तव्य सातत्याने मुंबई काँग्रेसच्या नेतृत्वाकडून करण्यात आली.
तब्बल 20 जागा मुंबईमध्ये वाऱ्यावर सोडून दिल्या
मात्र तोंडपाटीलकी सुरू असताना मैदानामध्ये मात्र काँग्रेसची स्थिती तोळामासाचीच आहे. काँग्रेसने एक, दोन नव्हे तर तब्बल 20 जागा मुंबईमध्ये वाऱ्यावर सोडून दिल्या आहेत. वंचितकडून 200 जागांच्या आसपास निवडणूक लढवण्याची तयारी असताना केवळ 62 उमेदवार देताना सुद्धा त्यांचीही दमछाक झाली. 16 जागांवर त्यांनी उमेदवारी दिले नाहीत. त्यामुळे 46 जागांवर उमेदवार रिंगणात आहेत. दुसरीकडे काँग्रेसच्या अधिकृत पाच उमेदवारांविरोधात वंचित उमेदवार आहेत. त्यामुळे हा फटका सुद्धा कोणाला बसणार याकडे लक्ष असेल.
कोणत्या प्रभागात काँग्रेस उमेदवार नाहीत?
मुंबईमध्ये 6, 11, 12, 13, 14, 15, 19, 21, 30, 46, 80, 84, 117, 153, 182, 198 आदी प्रभागात काँग्रेसला उमेदवार सापडला नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे वर्षा गायकवाड यांनी हट्ट करूनही उमेदवार न दिल्याने मुंबई काँग्रेसमधील दुफळी सुद्धा समोर आली आहे. दुसरीकडे, जागावाटपासून ते प्रचारापर्यंत ठाकरे बंधूंनी एकी दाखवत कोणत्याही परिस्थितीत मुंबई ताब्यात ठेवण्यासाठी यंत्रणा राबवली आहे. अमित ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्याकडूनही मुंबई पिंजून काढली जात आहे.
इतर महत्वाच्या बातम्या




















