Bhaskar Jadhav on BJP : शिवसेनेनं भाजपला राज्यात वाढवलं, पण आता कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ; भास्कर जाधवांचा हल्लाबोल
Bhaskar Jadhav on BJP : भास्कर जाधव यांनी भाजपवर सडकून टीकास्त्र सोडले. ते म्हणाले की, कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ झाला आहे. कुऱ्हाडीचा दांडा आमच्याच पायावरती पडतोय याचंच आम्हाला दुःख आहे.
रत्नागिरी : भाजपसोबत जे गेले नाहीत त्यांच्यावर कारवाई होत आहे, याचा अर्थ कारवाई सूडबुद्धीनेच होत आहे, भाजपला (BJP) महाराष्ट्रात (Maharashtra) शिवसेनेने वाढवलं, पण भाजपकडून शिवसैनिकांना छळलं जातं असल्याची घणाघाती टीका शिवसेना ठाकरे गटाचे नेते आमदार भास्कर जाधव (Bhaskar Jadhav on BJP) यांनी केली.
कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ
भास्कर जाधव यांनी भाजपवर सडकून टीकास्त्र सोडले. ते म्हणाले की, कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ झाला आहे. कुऱ्हाडीचा दांडा आमच्याच पायावरती पडतोय याचंच आम्हाला दुःख आहे. प्रत्येक अन्यायाला सत्तेच्या माजाला जनता उत्तर देईल, असेही त्यांनी सांगितले. अजित पवार गटाचे नऊच्या नऊ मंत्री यांची ईडीची चौकशी सुरू नव्हती का? शिंदे गटातील 40 आमदार भाजप सोबत गेले त्यांचं काय रक्षाबंधन झालं? अशी विचारणा त्यांनी केली.
अयोध्यातले राम मंदिर सुप्रीम कोर्टामुळे
राम मंदिर (Ram Mandir) होणे ही कुणा एका पक्षाची इच्छा नव्हती, असा टोलाही त्यांनी भाजपला लगावला. राम हा सर्वांचा, राम हा कुणा एका पक्षाला राजकारण करण्यासाठी वापरता येणार नाही. राम ही आमची शक्ती प्रेरणा आहे. राम मंदिराचा कार्यक्रम विशाल मनानं करायचं ठरवलं असतं, तर याला निमंत्रण द्यायचं, त्याला निमंत्रण द्यायचं हा भेदभाव झालाच नसता. अयोध्येतील राम मंदिर सुप्रीम कोर्टामुळे होत आहे, राम न्यासामुळे राम मंदिराची निर्मिती झाल्याचे ते म्हणाले.
ते गेले तरी आनंद नाही गेले तरी आनंद
अख्या जगानं शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना महत्व दिले, पण चार पक्षाच्या लोकांनी ठाकरे यांना महत्त्व दिले नसेल, तर माझ्यासारखा कार्यकर्ता त्याला फारसं महत्त्व देत नाही. एकनाथ शिंदे अयोध्येला जाणार नाहीत की त्यांना कोणी येऊ नको म्हणून सांगितलं आहे? ते गेले तरी आनंद नाही गेले तरी आनंद असल्याचा खोचक टोलाही लगावला. रामाचं मंदिर उभे राहत असल्याचा आनंद आहे. शिंदे गेले का आणि मिंधे गेले काय याचा फार विचार करण्याची आवश्यकता नाही.
त्यांची बुद्धी केवळ गोमूत्र पुरेशी
दुसरीकडे, काळाराम मंदिरात उद्धव ठाकरे गेले, तर गोमूत्र शिंपू असं राम कदम यांनी म्हटलं आहे. राम कदम यांच्या वक्तव्याचा भास्कर जाधव यांनी समाचार घेतला. ते म्हणाले की, त्यांची बुद्धी ही केवळ गोमूत्र पुरेशी आहे. तुझ्याकडून आम्हाला सर्टिफिकेट घेण्याची गरज नाही. गोमूत्र शिंपडू नये तर ते पीत राहावं, असा घणाघात त्यांनी केला.
इतर महत्वाच्या बातम्या