Ratnagiri News: भगवान कोकरे महाराजांचे आमरण उपोषण 11 व्या दिवशी स्थगित; रत्नागिरीतील गोशाळेच्या मुद्यावर सुरू होते आंदोलन
Ratnagiri News: रत्नागिरी लोटे एमआयडीसीतील गोशाळेच्या प्रश्नावरून भगवान कोकरे यांचे मागील 11 दिवसांपासून सुरू असलेले उपोषण अखेर मागे घेण्यात आले आहे.
Ratnagiri News: रत्नागिरी जिल्ह्यातील (Ratnagiri) लोटे एमआयडीसी (Lote MIDC) येथील गोशाळे संदर्भात भगवान कोकरे महाराज यांचे सुरू असलेले आमरण उपोषण आज अकराव्या दिवशी अखेर स्थगित करण्यात आले. सरकारच्या प्रतिनिधिंनी वारकरी संप्रदायाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून गोशाळे संदर्भात आश्वासित केले. त्यानंतर भगवान कोकरे महाराज यांनी आपले उपोषण अखेर मागे घेतले आहे.
वारकरी संप्रदायाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष प्रकाश महाराज जवंजाळ, गोशाळा महासंघाचे अध्यक्ष डॉ. सुनील सूर्यवंशी, प्रदेश संयोजक सेवाप्रकोष भाजपाचे शेखर मुंदडा, शिवसेना धर्मवीर अध्यात्मिक सेना प्रदेशाध्यक्ष अक्षय महाराज भोसले यांच्या मध्यस्थीने पशुसंवर्धन मंत्री राधकृष्ण विखे पाटील यांच्याशी दूरध्वनीवर संपर्क साधून गोशाळेच्या मागण्यासंदर्भात आश्वासन देण्यात आले. दरम्यान पुढील 25 दिवसात सरकारने आश्वासनाची पूर्तता केली नाही तर मात्र संपूर्ण महाराष्ट्रात वारकरी संप्रदायातर्फे प्रत्येक जिल्ह्यात व तालुक्यात आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा वारकरी संप्रदायचे प्रकाश महाराज जवंजाळ यांनी दिला आहे.
नेमकं प्रकरण काय?
रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील लोटे एमआयडीसीमध्ये श्री संत ज्ञानेश्वर माऊली जीवनमुक्ती धाम सेवा संस्था संचालित गोशाळेची 2008 मध्ये स्थापना झाली. सुरुवातीला या गोशाळेमध्ये 40 ते 50 गाई म्हशींनी सुरुवात झाली होती. त्यानंतर आता जवळपास 1100 गुरांची संख्या झाली आहे. त्यामुळं आता गोशाळा चालवायची कशी? या गुरांच्या चाऱ्या पाण्यासाठी महिन्याला लागणारा 40 ते 45 हजार रुपयांचा खर्च आणायचा कोठून? असा प्रश्न समोर असतानाही गेली 15 वर्ष या गोशाळेचे संस्थापक भगवान कोकरे महाराज हे या गाईंना कीर्तन सेवा करुन सांभाळत आहेत. या कीर्तन सेवेतून येणारे पैसे आणि लोकांकडून येणारी मदत याच्यावरती आजपर्यंत या गाईंचा चारा पाण्याचा प्रश्न सुटत होता. मात्र गेली तीन वर्ष ही गोशाळा वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे.
गृहमंत्र्यांच्या आदेशानंतर झाली होती गोशळेची चौकशी
गुहागर-खेड मतदारसंघात गेल्या काही वर्षांमध्ये होणाऱ्या गो तस्करी, गो अवैद्य वाहतूक या घटना दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत. त्यामुळं या मतदारसंघाचे विद्यमान आमदार सध्याचे शिवसेनेचे नेते भास्कर जाधव यांनी दोन वर्षांपूर्वी अधिवेशनात या घडणाऱ्या प्रकारांची लक्षवेधी मांडली होती. त्याची लवकरात लवकर चौकशी व्हावी आणि दोषींवरती कारवाई व्हावी अशी ही मागणी केली होती. या मागणीनंतर त्या वेळचे तत्कालीन गृहमंत्र्यांनी चौकशीचे आदेश दिले होते. त्यानंतर या मतदारसंघात खेड एमआयडीसीमध्ये असलेल्या गोशाळेची चौकशी झाली परंतू, अहवाल अजूनही सर्वांसमोर आलेला नाही. काही काळानंतर यामध्ये राजकीय वातावरण किंवा राजकीय रंग पाहायला मिळाला. गोशाळा असलेल्या बाजूच्या सोन गावातल्या रहिवाशांनी या गोशाळेचे मलमूत्र आणि सांडपाणी गावच्या ओढ्यामध्ये येऊन या ओढ्यावरती आधारित असलेल्या विहिरी आणि बोरवेलचे पाणी दूषित होते. त्यामुळं आम्हाला आजार येतात अशी तक्रार संबंधित एमआयडीसी कार्यालयात केली. एवढेच नाही तर सोनगावचे रहिवाशी या एमआयडीसीच्या कार्यालयासमोर उपोषणाला बसले.