Aaditya Thackeray To Visit Ratnagiri : सिंधुदुर्गनंतर आदित्य ठाकरे यांचा रत्नागिरी दौरा; उदय सामंत, योगेश कदम यांच्या मतदारसंघात येणार
बंडखोर आमदार उदय सामंत आणि योगेश कदम यांच्या मतदार संघात आदित्य ठाकरे येणारसिंधुदुर्गनंतर आता आदित्य ठाकरे करणार रत्नागिरी जिल्ह्याचा दौरापुढील 15 दिवसात आदित्य ठाकरे रत्नागिरी जिल्ह्यात, लवकरच होणार तारीख जाहीर

Aaditya Thackeray To Visit Ratnagiri : सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा, पुणे असा दौरा केल्यानंतर शिवसेना नेते आणि आमदार आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) पुढील पंधरा दिवसांमध्ये रत्नागिरी (Ratnagiri) जिल्ह्याच्या दौऱ्यावर जाणार आहेत. यावेळी ते बंडखोर आमदार योगेश कदम (Yogesh Kadam) यांच्या दापोली-मंडणगड-खेड आणि उदय सामंत (Uday Samant) यांच्या रत्नागिरी-संगमेश्वर या विधानसभा मतदारसंघात आपली निष्ठा यात्रा काढणार आहेत. शिवसेना नेत्याने 'एबीपी माझा'ला ही माहिती दिली आहे.
उदय सामंत हे आदित्य ठाकरे यांच्या जवळचे म्हणून ओळखले जात होते. सामंत शिंदे गटात सामील झाल्यामुळे रत्नागिरीत होणार दौऱ्यात आदित्य ठाकरे उदय सामंत आणि योगेश कदम यांच्यावर कशा रीतीने हल्लाबोल करतात? हे पाहावं लागेल. कारण सिंधुदुर्गात आलेल्या आदित्य ठाकरे यांनी दीपक केसरकर यांना देखील लक्ष्य केलं होतं. त्यांच्यावर टीकास्त्र डागलं होतं.
एकंदरीत आपल्या संपूर्ण दौऱ्यात आदित्य ठाकरे चांगलेच आक्रमक झालेले पाहायला मिळाले. शिवाय त्यांच्या दौऱ्याला मिळाला प्रतिसाद देखील चांगला होता. त्यामुळे शिवसेनेचा बालेकिल्ला समजला जाणाऱ्या रत्नागिरी जिल्ह्यात आदित्य ठाकरे यांच्या दौऱ्यावेळी शिवसेनेकडून होणारे शक्तिप्रदर्शन आणि त्यांना मिळणाऱ्या प्रतिसादाकडे सबंध महाराष्ट्राचे लक्ष असणार आहे.
पुण्यात उदय सामंत यांच्या गाडीवर हल्ला
आदित्य ठाकरे यांच्या शिवसंवाद यात्रेच्या दुसऱ्या टप्प्याचा समारोप पुण्यात झाला. कात्रज इथे सभा आयोजित करण्यात आली होती. परंतु काल पुण्यात शिवसेनेचे बंडखोर आमदार आणि माजी मंत्री उदय सामंत यांच्या गाडीवर हल्ला झाला. शिवसैनिकांनी हा हल्ला केल्याचं बोललं जात आहे. या प्रकरणी पुण्यातील भारती विद्यापीठ पोलिसांनी रात्रभर शिवसैनिकांची धरपकड केली. आदित्य ठाकरे यांच्या 'शिवसंवाद' सभेच्या आयोजकांसह पाच जणांना अटक करण्यात आली आहे. अजूनही काही जणांना अटक होण्याची शक्यता आहे.
शिवसेना नेते आणि माजी मंत्री आदित्य ठाकरे यांची कात्रजमध्ये 'शिवसंवाद' यात्रा आयोजित करण्यात आली होती. यासाठी हजारो शिवसैनिकांची गर्दी झाली होती. या दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील पुणे दौऱ्यावर होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दगडूशेठ गणपती मंदिरात दर्शनासाठी येणार होते. त्यांच्या आधीच उदय सामंत हे मंदिरात जात असताना काही जणांच्या जमावाने उदय सामंत यांच्या कारवर हल्ला केला. यावेळी गद्दार..गद्दारच्या ही घोषणा देण्यात आल्या होत्या. या हल्ल्यात सामंत यांच्या कारची काच फुटली. या हल्ल्याप्रकरणी मुख्य आयोजक संभाजी थोरवे, राजेश पळसकर, चंदन साळुंके, सूरज लोखंडे, रुपेश पवार यांना अटक करण्यात आली आहे. तर, पंधरा लोकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
