(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Amit Thackeray: अमित ठाकरेंचं पहिल्यांदाच उद्धव ठाकरेंना उत्तर, म्हणाले, वरळीत बिनशर्त पाठिंबा घेतला, मुलाला आमदार केलं, ते विसरु नका!
Maharashtra Politics: उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे यांच्यावर टीका करताना मनसेने महायुतीला दिलेल्या बिनशर्त पाठिंब्याला 'बिनशर्ट पाठिंबा' असे म्हणत खिल्ली उडवली होती. अमित ठाकरे यांच्याकडून काकांना प्रत्युत्तर.
मुंबई: उद्धव ठाकरे यांनी वर्धापन दिन सोहळ्यात मनसेची टिंगल करताना 'बिनशर्ट पाठिंबा' असा उल्लेख केला होता. त्यांच्या या टीकेला मनसेप्रमुख राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे (Amit Thackeray) यांनी प्रत्युत्तर दिले आहे. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचा 'बिनशर्ट पाठिंबा' हा विनोद कळायला मला 10 मिनिटं लागली. इकडे वरळीत राज साहेबांनी (Raj Thackeray) त्यांना बिनशर्त पाठिंबा दिला होता. तेव्हा मुलाला आमदार बनवताना काही वाटलं नाही का? ही गोष्ट त्यांनी विसरायला नको होती, असे अमित ठाकरे यांनी म्हटले.
राज साहेबांनी मनसे पक्ष हा स्वत:च्या हिंमतीवर आणि मेहनतीवर काढला. पक्ष मोठा व्हायला वेळ लागला तरी त्यामध्ये राजसाहेबांची मेहनत आहे. विधानसभा निवडणुकीत तुम्हाला मनसेचा उत्साह वाढलेला दिसेल, असे अमित ठाकरे यांनी म्हटले. यावेळी एका पत्रकाराने अमित ठाकरे यांना तुम्ही विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार का, असा प्रश्न विचारला. त्यावर अमित ठाकरे यांनी, 'मी निवडणुकीला उभं राहावं, अशी तुमची इच्छा आहे का?', असा प्रतिप्रश्न विचारला. संबंधित पत्रकाराने हो म्हणताच, मग तुम्ही राज साहेबांना जाऊन सांगा, असे अमित ठाकरेंनी म्हणताच एकच हशा पिकला.
विधानसभा निवडणुकीसाठी मनसे पक्ष कामाला लागला आहे. आज विधानसभा निवडणुकीच्या तयारीसाठी बैठक होती. मी सगळ्या विधानसभा मतदारसंघांमध्ये फिरणार आहे. मी लोकांना भेटून त्यांच्या अडचणी जाणून घेणार आहे. आमची विधानसभा निवडणुकीची तयारी सुरु झाली आहे, असेही अमित ठाकरे यांनी म्हटले.
आदित्य ठाकरेंच्या मतदारसंघातील लीडवर अमित ठाकरे काय म्हणाले?
अमित ठाकरे यांनी वरळी विधानसभेचे आमदार आदित्य ठाकरे यांच्या कामगिरीवर भाष्य केले. आता शेवटच्या तीन महिन्यांमध्ये काम करुन काही होणार नाही. एका आमदाराला पाच वर्ष मिळतात. कोरोनापासून वरळी कोळीवाड्यात त्यांनी ज्याप्रकारे फिरायला पाहिजे होते, तसे ते फिरताना दिसले नाहीत. या गोष्टी लोकांशी बोलल्यावर कळतील. आम्ही त्यांना या अपेक्षेने बिनशर्त पाठिंबा दिला नव्हता. वरळीतून संदीप देशपांडे यांना उतरवण्यासंदर्भात काय बोलणी झाली असतील तर ती मला माहिती नाहीत, असे अमित ठाकरे यांनी म्हटले.
यावेळी अमित ठाकरे यांनी ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांनाही टोला लगावला. वरळीत मनसेचा पदाधिकारी उभा राहिला तर त्याचे डिपॉझिट जप्त होईल, असे परब यांनी म्हटले होते. मनसेचं डिपॉझिट जप्त होईल, हे आत्ताच सांगायला, अनिल परब हे का सर्व्हे कंपनीत कामाला लागल आहेत का? ही गोष्ट लोकांना ठरवू द्या ना. गेल्या विधानसभा निवडणुकीत वरळीतून आदित्य ठाकरे यांना 20 ते 25 हजारांचं लीड होतं. लोकसभा निवडणुकीत हे लीड 7 हजारापर्यंत खाली आले. तुम्ही याबाबत लोकांशी बोलले पाहिजे, त्यानंतर विचार करुन बोलले पाहिजे, असा सल्ला अमित ठाकरे यांनी अनिल परब यांना दिला.
आणखी वाचा
मला विरोध करण्यासाठी काही, उघड म्हणजे 'बिनशर्ट' पाठिंबा, उद्धव ठाकरेंचा राज ठाकरेंवर पहिला हल्ला