Karjat Khalapur Assembly constituency : शिवसनेत दोन गट, महेंद्र थोरवे शिंदे गटात गेल्यामुळे गणितं बदलणार, पाहा मतदार संघाची काय स्थिती?
Karjat Khalapur Assembly constituency :
Karjat Khalapur Assembly constituency : रायगड जिल्ह्यातील कर्जत - खालापूर विधानसभा मतदारसंघातील शिवसेना आमदार महेंद्र थोरवे एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेले आहेत. त्यामुळे साहजिकच सद्यस्थितीचा विचार करता गणितं बदलणार. शिवसेनेत दोन गट पडले आहेत. त्याचा फायदा कोण उचलणार? एकनाथ शिंदे गट आणि शिवसेना पैकी कुणाला फायदा होणार? याची उत्तरं राजकारणाशी निगडीत प्रत्येक व्यक्तिला हवी असतात. अर्थात हि गोष्ट लक्षात घेत आम्ही काही वरिष्ठ पत्रकार, जणकार यांच्याशी बोललो. त्यांना कर्जतमधील सध्याची राजकीय स्थिती काय आहे? कुणाला फायदा? कुणाला तोटा? यावर सवाल केले. कारण, कुठं तरी बंडखोर आमदारांना फायदा होण्याची शक्यता मोठ्या प्रमाणाच वर्तवली जात असताना, सध्याची वेळ आणि वस्तुस्थिती जाणून घेणे महत्त्वाचे आहे.
यावेळी 'एबीपी माझा'शी बोलताना जाणकारांनी 'परिस्थिती जशी दिसते किंवा वाटत आहे तशी निश्चितच नाही. मुळात महेंद्र थोरवे हे काही मुळचे शिवसैनिक नाहीत. ते शेतकरी कामगार पक्षातून शिवसेनेत आले. त्यानंतर ते आमदार झालेत. परिणामी त्यांचा वैयक्तिक जनाधार खूप मोठा आहे. किंवा शिवसैनिक त्यांना मोठ्या प्रमाणात पाठिंबा देतील हि बाब गोष्ट होऊ शकत नाही. अर्थात सद्याच्या स्थितीचा फायदा ना शिवसेनेला होणार ना थोरवे यांना. झाल्यास तो होईल राष्ट्रवादी काँग्रेसला. कारण, महाविकास आघाडी सरकारमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसकडे पालकमंत्रीपद होतं.त्यामुळे निधी वाटप चांगलं गेलं आहे. गावातील ग्रामपंचायती आणि कार्यकर्त्यांना चांगल्याप्रकारे निधी मंजूर झाला आहे. अशातच शेकापशी देखील त्यांची जवळीक आहे. शिवाय, शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये असलेला गोंधळ आणि त्या गोंधळातून विभाजन झाल्यास पहिल्यांदा त्याचा फायदा राष्ट्रवादी काँग्रेसला होईल. शेतकरी कामगार पक्षाची मतं सहसा कुठं जात नाहीत. पण, भाजप या ठिकाणी काय रणनिती आखेल? हे देखील पाहायाला हवं. विधानसभा निवडणुकीसाठी आपण अडिच वर्षाचा अवधी आहे असं धरलं तरी यामधल्या काळात बऱ्याच घडामोडी होतील. कर्जतमध्ये राष्ट्रवादीचे माजी आमदार सुरेश लाड हे देखील सक्रिय असून त्यांचा मतदार संघावर चांगला पगडा आहे. तर , सुरेश लाड हे महेंद्र थोरवे यांचे विरोधक मानले जातात. तर, भाजप सुद्धा कर्जत तालुक्यात आपलं अस्तित्व निर्माण करण्याचा पूर्ण प्रयत्न करीत आहे. त्यामुळे निष्कर्ष किंवा ठोस अंदाज काढण्यापेक्षा साधारणपणे हे असं चित्र असेल.' अशी प्रतिक्रिया 'एबीपी माझा'कडे बोलताना दिली
यानंतर आम्ही संजय ठाकूर यांच्याशी संवाद साधला यावेळी त्यांनी 'सध्या संभ्रमावस्था कार्यकर्त्यांमध्ये दिसून येते. विशेषता तरूण शिवसैनिकांमध्ये. कारण, आमदार गेले पण, जिल्हाप्रमुख मात्र उद्धव ठाकरेंसोबत आहे. शिवाय, जो जुना शिवसैनिक बाळासाहेबांना मानत होत तो अद्याप देखील उद्धव ठाकरे यांच्या पाठिशी आहे. असं असलं तरी शेकाप अर्थात शेतकरी कामगार पक्षाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. कारण, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीत शेतकरी कामगार पक्षाचं प्राबल्य आहे. शेकाप हा मागील अडिच वर्षे महाविकास आघाडी सरकारच्या पाठिशी राहिला. असं असताना 2 ऑगस्ट रोजी शेकापचा मेळावा होईल. त्यानंतर त्यांची भूमिका कळू शकेल. अर्थात सेनेतील या दुफळीचा फायदा शेकाप किंवा ऱाष्ट्रवादीला देखील होऊ शकतो. पण, सध्या भाजप जिल्ह्याच्या दक्षिण भागात देखील लक्ष केंद्रीत करत आहे. त्यांच्या पनवेल येथील मेळाव्यात दिशा देखील स्पष्ट झाली आहे. त्यामुळे भाजपच्या चालींकडे देखील दुर्लक्ष करून चालणार नाही अशी प्रतिक्रिया 'एबीपी माझा'शी बोलताना दिली.