Irshalwadi Landslide: इर्शाळवाडीला मदत घेऊन जाणार आहात? तर थांबा, ही बातमी तुमच्यासाठी...
Irshalwadi Landslide: इर्शाळवाडीतील दुर्घटनेनंतर दरडग्रस्तांना मदत करू इच्छित असाल तर थेट तिथे जाणं टाळण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे. त्याऐवजी तुम्ही घरी बसून मदत करा.
Irshalwadi Landslide: इर्शाळवाडीतील दुर्घटनाग्रस्तांना (Irshalwadi Landslide) मदत करण्यासाठी अनेक हात पुढे सरसावले आहेत. बऱ्याच वस्तूंची मदत घेऊन शेकडो सामाजिक संस्था आणि सामाजिक कार्यकर्ते इर्शाळवाडीला पोहोचत आहेत. परंतु येथील लोक तात्पुरत्या स्वरुपात कंटेनरमध्ये राहत आहेत, हे कंटेनर छोट्या आकाराचे असून त्यात राहण्याइतकी सोय आहे. अशात विविध संस्थांनी दिलेल्या वस्तूंची साठवणूक करुन हे कंटेनर सामानांनीच भरले आहेत. त्यामुळे त्याऐवजी तुम्ही दरडग्रस्तांना आर्थिक मदत करू शकता.
इर्शाळवाडी परिसरात सध्या जमावबंदीचे आदेश लागू आहेत आणि बाहेरील व्यक्तींना या गावात प्रवेश बंदी आहे. जर तुम्ही एखादी मदत घेऊन इर्शाळवाडीला पोहोचवणार असाल तर चौक गावापासून पुढे तुम्हाला जाता येणार नाही. तसेच प्रशासनाने सद्य स्थितीमध्ये या दुर्घटनाग्रस्तांना सर्वोतोपरी आवश्यक असलेली मदत केली आहे. त्यांच्या कायमस्वरूपी निवाऱ्याची तजवीज सध्या प्रशासन करत आहे, त्यामुळे आपणास मदत करायची असल्यास निधीच्या स्वरुपात तुम्ही मदत करू शकता. यासाठी जिल्हा प्रशासनाने खाली बँक खात्याची माहिती दिली आहे, त्याद्वारे तुम्हाला मदत करता येणार आहे.
- खात्याचे नाव: जिल्हा आपत्ती प्रतिसाद निधी (District Disaster Response Fund)
- बँकेचे नाव: स्टेट बँक ऑफ इंडिया, मुख्य शाखा , अलिबाग (State Bank of India, Alibag)
- बँक खाते क्रमांक : 38222872300
- IFSC Code : SBIN0000308
या बँक अकाऊंटवर तुम्ही आर्थिक मदत देऊ शकता आणि दरडग्रस्तांना योग्य ती मदत करू शकता
किंवा आपण काय मदत करू शकता?
इर्शाळवाडी गावाशी संबंधित तहसीलदार दीक्षांत देशपांडे यांना संपर्क करुन तुम्ही इतर स्वरुपातील मदत करू शकता. यामुळे आपली मदत वाया जाणार नाही आणि ती नक्कीच योग्य पद्धतीने दुर्घटनाग्रस्तांपर्यंत पोहोचली येईल. त्यासाठी खाली त्यांचा संपर्क क्रमांक दिला आहे.
श्री.दीक्षांत देशपांडे (सबंधित तहसीलदार) - 91 58157493 / +91 866-905-6492
इर्शाळवाडी परिसरात पर्यटक, नागरिकांना बंदी
इर्शाळवाडी परिसरात पर्यटक, नागरिकांना प्रवेश बंदी लागू करण्यात आली आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे दरड कोसळलेल्या घटनास्थळी आणि त्याच्या परिसरात इर्शाळगड, नंबराची वाडी येथील दुर्घटनास्थळी, बेस कॅम्प परिसरात शासकीय मदत यंत्रणा तसेच मदतकार्यात नेमणूक केलेल्या इतर व्यक्ती, सेवाभावी संस्था यांच्या व्यतिरिक्त इतर नागरिक, ट्रेकर्स यांना प्रवेशास निर्बंध घालण्यात आला आहे. फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 (1) नुसार दिनांक 23 जुलै ते दिनांक 6 ऑगस्ट या कालावधीसाठी प्रतिबंधात्मक आदेश लागू केले गेले आहेत.
हेही वाचा: