पुण्यातील उद्योजिकेनं बनवली गुलाबपासून वाईन
आता सध्या मार्केटमध्ये ‘रोजे’ म्हणून वाईन मिळते. त्याला गुलाबाचा स्वाद असतो. पण ही वाईन द्राक्ष्यांपासूनच बनवलेली असते. त्यानंतर त्याच गुलाबाचा इसेंस घातला जातो.
पुणे : वाईनप्रेमींसाठी एक खुषखबर आहे. वाईन प्रेमींना गुलाबापासून बनवलेल्या वाईनचाही आनंद आता घेता येणार आहे. पुण्यातील जयश्री यादव यांना गुलाबापासून वाईन बनवण्याचं पेटंट मिळालं आहे. देशी गुलाब वाणाच्या पाकळ्यांपासून जयश्री यांनी ही गुलाब वाईन बनवली आहे. अनेक वर्षांपासून गुलाबाची लागवड आणि त्यापापासून बनणाऱ्या वस्तुंच्या व्यवसाय करणाऱ्या पुण्यातील उद्योजिका जयश्री यादव यांनी आता गुलाबापासून ही वाईन बनवली आहे.
महाराष्ट्रात फक्त फळांपासूनच वाईन बनवण्याची परवानगी होती. त्यामुळे गुलाबापासून वाईन बनवणं आणि त्याचा व्यवसाय करण्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी मला फुलापासून वाईन बनवण्याची परवानगी शासनाकडून मिळवण्यासाठीही प्रयत्न करावे लागले, असं जयश्री यादव यांनी सांगतिलं. 2009 पासून गुलाबापासून वाईन बनवण्यासाठी जयश्री यादव यांची धडपड सुरु होती. त्यानंतर त्यांची मुलगी कश्मिरा यादव- भोसले हिच्या मदतीने ही वाईन पुर्णत्वास नेण्यास त्यांना यश मिळालं आहे.
आता सध्या मार्केटमध्ये ‘रोजे’ म्हणून वाईन मिळते. त्याला गुलाबाचा स्वाद असतो. पण ही वाईन द्राक्ष्यांपासूनच बनवलेली असते. त्यानंतर त्याच गुलाबाचा इसेंस घातला जातो. पण आमच्या वाईनचं वैशिष्ट्य म्हणजे ही सेंद्रिय पद्धतीने वाढवलेल्या देशी गुलाबाच्या पाकळ्यांपासून आम्ही बनवली आहे, असं कश्मिरा यादव-भोसले यांनी सांगितले.
या गुलाब वाईनचं अजून कमर्शियल उत्पादन सुरु झालेलं नाहीये. ही वाईन बाजारात यायला अजून सहा महिने लागतील असं यादव यांनी सांगितलं. खेड तालुक्यात त्यांची गुलाबशेती आहे आणि त्याच्या जवळच ही वायनरी ऊभी केली जाणार आहे. वायनरीचं काम पूर्ण झाल्यावर तिथे या गुलाब वाईनचं उत्पादन घेतलं जाणार आहे, अशी माहिती त्यांनी दिली.