Supriya Sule: लग्नात गाडी दिसली की लगेच विचारा, हुंड्यात मिळालेय का? वैष्णवी हगवणे प्रकरणावर सुप्रिया सुळे नेमकं काय म्हणाल्या?
Supriya Sule: काही दिवसांपूर्वी घडलेल्या वैष्णवी हगवणे प्रकरणामुळे तर राज्यभरातून संताप व्यक्त होत आहे, या वाढत्या घटनांमुळे मोठ्या प्रमाणावर संताप व्यक्त होत आहे.

पुणे: राज्यभरात गेल्या काही दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणावर विवाहित महिला सासरच्या जाचाला आणि त्रासाला कंटाळून टोकाचं पाऊल उचलत आहे. आपलं जीवन संपवत आहेत. काही दिवसांपूर्वी घडलेल्या वैष्णवी हगवणे प्रकरणामुळे तर राज्यभरातून संताप व्यक्त होत आहे, या वाढत्या घटनांमुळे मोठ्या प्रमाणावर संताप व्यक्त होत आहे. अशातच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी आपल्या भावना वक्तव्य केल्या आहेत. हुंडा मुक्त महाराष्ट्र कसा होईल यासाठी प्रयत्न केला पाहिजे. आपल्या पुण्यात एका तालुक्यात आजही महाराष्ट्राची लेक हुंड्यासाठी आत्महत्या करते याच्या सारखी दुर्दैवी घटना नाही. हुंड्याबद्दल आपल्या भाष्य करावे लागत आहे, अशी खंत सुप्रिया सुळेंनी व्यक्त केली आहे.
लग्नाचा रुखवताजवळ गाडी दिसली तर विचारायचं.....
जुलै महिन्यापासून पुढील एक वर्षे संपूर्ण शाळा कॉलेज संस्था मिळून पूर्ण ताकदीने हुंडा विरोधी मोहीम आपल्याला चालवयाची आहे.आपण जेव्हा लग्नाला जातो तर तिथे आधी विचारायचं हुंडा घेतला का? किंवा दिला का? त्याने सांगितले हो तर आपण त्या लग्नाला जायचं नाही. लग्नाचा रुखवत दाखवतात. तिथं गाडी दिसली तर विचारायचं कोणाच्या नावावर आहे कोणी दिली...? आता जी घटना पुण्यात झाली. त्या हगवणे कुटुंबाचे आमचे पाच दशकाचे कौटुंबिक संबंध पण, आज सुशिक्षित कुटुंब, सुना अशा घरात जर मुलगी माहेरी गेली तर सारखं माहेरून गाडी घेऊन ये ,मोबाईल घेऊन ये, तुला मोबाईलवर बोलायचं आहे. तर तू तुझ्या हिमतीवर घे ना, असंही पुढे सुप्रिया सुळेंनी म्हटलं आहे.
पुढे बोलताना सुळे म्हणाल्या, 8 मार्चला महिला दिन असतो, पण 22 जूनला आम्ही हा कार्यक्रम करत असतो, देशात पहिल्यांदा याच दिवशी महिला धोरण राबविण्यात आले होते, निर्णय प्रक्रियेत त्या आल्या होत्या. सायबर क्राइम हा त्या वेळी विषय नव्हता,आता मोबाईलमुळे महिलांच्या बाबतीत अनेक क्राइम वाढले आहेत. यात सायबर क्राईम हा मुद्दा वाढवला. आता DBT चे पैसे थेट महिलांच्या खात्यात येतात आधी ते नव्हते.
लाडकी बहीण योजनेमुळे पैसे मिळाले चांगलं आहे, पण सामाजिक परिवर्तन झाले का? हा महत्त्वाचा प्रश्न आहे, मी सरकारवर टीका करत नाही, पण महिलांच्या आयुष्यात काय मोठा यामुळे बदल झाला. 2100 रुपये कधी देणार त्यांना वाटेल तेव्हा, जसे शेतकरी कर्जमाफीला म्हणतात, वेळ येईल तेव्हा देऊ याला साडेचार वर्ष जातील त्यांची वेळ यायला. सरकार माध्यमातून अनेक निधी दिले महिलांना स्वतःच्या पायावर उभं करण्यासाठी सरकारने प्रयत्न केले पाहिजेत. त्यांना व्यवसाय देऊन त्यांच्या मालाला मार्केट पण दिलं पाहिजे, इच्छाशक्ती आणि सामाजिक परिवर्तन फक्त निवडणुकीपुरतं नको, असंही पुढे सुप्रिया सुळेंनी म्हटलं आहे.


















