(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Prabhakar Bhave Passed Away: रंगभूषाकार हरपला! ज्येष्ठ रंगभूषाकार प्रभाकर भावे यांचं निधन
Prabhakar Bhave Passed Away: ज्येष्ठ रंगभूषाकार प्रभाकर भावे यांचे वयाच्या 78 वर्षी निधन झाले आहे.
Prabhakar Bhave Passed Away: ज्येष्ठ रंगभूषाकार प्रभाकर भावे ( Prabhakar Bhave) यांचे आज पहाटे वयाच्या 78 वर्षी निधन झाले आहे. पुण्यात त्यांनी अखेरच श्वास घेतलाय. गेल्या काही दिवसांपासून ते पुण्यात मुलीच्या घरी राहात होते. तेथेच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या जाण्याने रंगभूमीचा रंगभूषाकार हरपला आहे, अशा भावना रंगकर्मींकडून उमटत आहे. नवी पेठेतील वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार पार पडले. गेल्या काही दिवसांपासून ते ब्रेनस्टयूमर आजाराने ग्रस्त होते. हळूहळू त्यांचे अवयव निकामी होऊ लागले होते. मागील अनेक दिवसांपासून त्यांची प्रकृती साथ देत नव्हती.
पुण्यातील रंगभूमीत ज्येष्ठ रंगभूषाकार प्रभाकर भावे यांची खास ओळख होती. त्यांच्या कामामुळे आणि कलेमुळे त्यांना वेगळा मान होता. मागील 55 वर्ष त्यांनी याच क्षेत्रात काम केलं. आतापर्यंतच्या महाराष्ट्रातील सर्व स्पर्धांशी ते नाट्यभूषाकार म्हणून काम करायचे. नाटक म्हटलं की त्यात जीवंतपणा वाटावा यासाठी प्रचंड प्रयत्न केले जातात. एका एका पात्रावर विशेष लक्ष दिलं जातं. त्यात महत्वाचं म्हणजे सेटदेखील खरा वाटावा यासाठी मोठे प्रयत्न केले जातात. याच नाटकातील मुखवटेदेखील सुंदर तयार केले जातात. तेच मुखवटे तयार करण्यात त्यांचा हातखंडा होता.
रंगभूषा नावाचं पुस्तक
55 वर्ष रंगभूषाकार म्हणून त्यांनी कार्य केलं आहे. त्यांच्या या कारकीर्दीच्या प्रवासात त्यांनी ‘रंगभूषा’ नावाचे पुस्तक देखील त्यांनी लिहिले होते शिवाय पु.ल. देशपांडे यांच्या हस्ते त्या पुस्तकाचं प्रकाशन करण्यात आलं होतं. या पुस्तकाला राज्य सरकारचा त्या वर्षीचा उत्तम साहित्यकृतीचा पुरस्कार देखील मिळाला होता.
आणि ते रंगभूषाकार झाले...
प्रभाकर भावे यांच्या वडिलांना नाटकाची आवड होती. त्यांना कलेची आवड असल्याने अनेक कला त्यांना अवगत होत्या. वडिलांंकडून त्यांनी रंगभूषा शिकून घेतली. त्यावेळी ते फार लहान होते. लहान वयातच त्यांना रंगभूषेविषयी उत्सुकता वाटत होती. त्यानंतर त्यांनी रंगावर प्रेम करायला सुरुवात केली. त्यांनी सवाई माधवरावाचा मृत्यू' आणि 'रायगडाला जेव्हा जाग येते' ही नाटकं पाहिली. त्या नाटकातील शिवाजी महाराज आणि बाकी कलाकृती पाहून त्यांनी रंगभूषा हेच आपलं करियर म्हणून निवडलं. त्यामुळे पुण्याच्या नाट्यविश्वाला हक्काचा रंगभूषाकार मिळाला.
रंगभूमीचा रंगभूषाकार हरपला
नाटकाच्या अनेक स्पर्धांसाठी त्यांनी काम केलं होतं. आतापर्यंत अनेक पात्र त्यांनी कलेच्य माध्यमातून जगवली होती. त्यांच्या जाण्याने रंगभूमीचा रंगभूषाकार हरपला, अशा प्रतिक्रिया रंगकर्मीयांकडून उमटत आहे. पुण्याच्या नाट्यविश्वाचा हक्काचा रंभूषाकार गमावला, अशाही शब्दात शोक व्यक्त केला जात आहे.