Varandha ghat Close: वरंध घाट 30 सप्टेंबरपर्यंत अवजड वाहतुकीसाठी बंद
22 जुलै ते 30 सप्टेंबरपर्यंत भोर घाट अवजड वाहतुकीकरता संपूर्णपणे बंद करण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी ही माहिती दिली आहे.
पुणे : भोर-महाड मार्गावरील प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. शनिवार (22 जुलै) पासून भोर- महाड राष्ट्रीय महामार्गावरील भोर तालुक्याच्या हद्दीतील वरंध घाट रस्ता पावसाळा कालावधीत अवजड वाहतुकीकरता संपूर्णपणे बंद करण्यात येणार आहे. 22 जुलै ते 30 सप्टेंबरपर्यंत भोर घाट अवजड वाहतुकीकरता संपूर्णपणे बंद करण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी ही माहिती दिली आहे.
या घाटातील पुणे जिल्ह्याच्या हद्दीतील रस्ता हा नागमोडी वळणाचा असून पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी होऊन अनेकवेळा अचानक दरडी कोसळणे, झाडे पडणे, रस्ता खचणे, माती वाहून जाणे अशा स्वरुपाच्या घटना घडतात. त्यामुळे संभाव्य जीवित व वित्त हानी टाळण्याच्या उद्देशाने हा घाट रस्ता अवजड वाहनांसाठी पावसाळा कालावधीत बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
घाट रस्ता फक्त हलक्या वाहनांच्या वाहतुकीसाठी खुला
जिल्ह्यात भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या ऑरेंज आणि रेड इशाऱ्याच्या वेळी सर्व प्रकारच्या अवजड, मध्यम व हलक्या प्रकारच्या वाहनांच्या वाहतुकीकरीता रस्ता बंद राहील. ऑरेंज आणि रेड इशारा नसलेल्या कालावधीत सदर घाट रस्ता फक्त हलक्या वाहनांच्या वाहतुकीसाठी खुला राहील, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.
पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन
या मार्गावरील वाहतूक पर्यायी मार्गाद्वारे म्हणजेच पुणे-पिरंगुट-मुळशी-ताम्हिणी घाट-निजामपूर-माणगाव-महाड या पर्यायी मार्गाचा वापर करण्यात यावा, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे. या भागाकडे जाण्यासाठी हा सर्वात लहान मार्ग असल्याने, दोन्ही जिल्ह्यातील अनेक औद्योगिक वाहने घाट भागाचा वापर करतात. मर्यादित लेन आणि अचानक येणार्या वळणांमुळे गर्दी होत असल्याने ही वाहने घाटात वारंवार अडकतात. पावसाळ्यात या घटना नियमित घडतात. त्यामुळे हा घाट बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे.
पुण्यासह राज्यभरात अनेक ठिकाणी पावसामुळे आपत्ती होऊ नये यासाठी खबरदारी घेतली जात आहे. त्यातच दरडी कोसळल्याच्या घटना सातत्याने घडताना दिसतात. त्यात अनेकदा जीवित हानी होते. पावसाळ्यात नागरिकांची गैरसोय होऊ नये आणि नागरिकांंचं नुकसान होऊ नये, यासाठी सगळ्या स्तरावरुन दरवर्षी प्रयत्न केले जातात. वरंध घाटाबरोबरच पुण्याजवळील काही भीतीदायक किंवा आपत्तीजनक पर्यटन स्थळेही बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
हे ही वाचा :