Irshalwadi Landslide : इर्शाळवाडीतील बचावकार्याला पुन्हा सुरुवात, खाजगी संस्थांच्या टीम सरकारी संस्थांच्या मदतीला
Irshalwadi Landslide : रायगड जिल्ह्यातील इर्शाळवाडी या ठिकाणी दरड कोसळून दुर्घटना घडली. काल मुसळधार पावसामुळे थांबवलेलं बचावकार्य आज सकाळी 6.30 वाजता पुन्हा सुरु करण्यात आलं आहे.
Irshalwadi Landslide : रायगड जिल्ह्यातील इर्शाळवाडी (Irshalwadi) या ठिकाणी दरड (Landslide) कोसळून दुर्घटना घडली. बुधवारी (19 जुलै) रात्री घडलेल्या दुर्घटनेमध्ये आतापर्यंत 16 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर 98 जणांना वाचवण्यात यश आलं आहे. गुरुवारी (20 जुलै) संध्याकाळी पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे या ठिकाणच्या बचावकार्यात अडथळे येत होते, त्यामुळे बचावकार्य थांबवण्यात आलं होतं. आज सकाळी 6.30 वाजता हे बचावकार्य पुन्हा सुरु करण्यात आलं आहे.
सरकारी संस्थांच्या मदतीला खाजगी संस्थांच्या टीम
सरकारी संस्थांच्या मदतीला आता खाजगी संस्थांच्या टीमदेखील दरड दुर्घटनास्थळी पोहोचले आहेत, रिलायन्स फाऊंडेशनने कम्युनिकेशन चांगले होण्यासाठी ham radio सिस्टीम इथे प्रस्थापित केली आहे, जेणेकरुन वर असलेल्या टीम्ससोबत खालून चांगल्या प्रकारचे आणि लवकर कम्युनिकेट करता येईल, सोबतच त्यांच्याबरोबर डॉक्टर आणि सर्च अॅण्ड रेस्क्यू टीम देखील आहे.
अवघ्या काही क्षणांत होत्याचं नव्हतं झालं
बुधवारी रात्री शांत निजलेल्या इर्शाळवाडीत अवघ्या काही क्षणांत होत्याचं नव्हतं झालं आणि सारा महाराष्ट्र हादरुन गेला. रायगड जिल्ह्यातल्या मुसळधार पावसात दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेत इर्शाळवाडीतली 48 पैकी 17 घरं गाडली गेली. या दुर्घटनेत जवळपास 20 घरांचं गंभीर नुकसान झालं असून, उरलेली दहा घरं वाचली आहेत. या दुर्घटनेची माहिती मिळताच बचाव पथकं तासाभरात घटनास्थळी दाखल झाली. पण पाऊस आणि अंधारामुळे बचावकार्य सकाळीच सुरु करावं लागलं. गुरुवारी दिवसभरातही पाऊस आणि जोरदार वाऱ्यानं बचाव पथकाची परीक्षा घेतली. या दुर्घटनेत 16 जणांचा मृत्यू झाला असून 98 जणांना वाचवण्यात बचाव पथकाला यश आलं आहे. इर्शाळवाडी गावातील अनेकजण अजूनही बेपत्ता असल्याची माहिती आहे.
दुर्घटनास्थळी ठाण मांडून मुख्यमंत्र्यांकडून परिस्थितीचा आढावा
दरम्यान राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील सकाळपासून घटनास्थळी दाखल झाले होते. मदत आणि बचाव कार्यावर त्यांनी देखरेख ठेवली. त्याशिवाय, मंत्री गिरीश महाजन, आमदार महेश बाल्दी यांनी मध्यरात्रीच घटनास्थळ गाठले होते. मध्यरात्रीपासून ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संपर्कात होते. तर, सकाळच्या वेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नियंत्रण कक्षातून मदत आणि बचाव कार्याचा आढावा घेत यंत्रणांना सूचना दिल्या. त्याशिवाय, मंत्री उदय सामंत, दादा भुसे, अनिल पाटील, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले, मनसे नेते बाळा नांदगावकर आदी नेत्यांनी घटनास्थळाजवळ भेट देत परिस्थितीचा आढावा घेतला.
हेही वाचा