भांडी विक्री, जुगार-मटका ते 6 जणांची हत्या, बहिणींनी सुपारी दिलेल्या आंदेकर कुटुंबाचा पाच दशकांचा इतिहास, सूडचक्र A टू Z
पुण्याच्या गुन्हेगारी विश्वात आंदेकर कुटुंबाचा रंक्तरंजीत इतिहास तब्ब्ल पाच दशकांचाय . त्यामुळं वनराज आंदेकरांच्या हत्येनंतर पुण्यातील टोळीयुद्ध भडकण्याची भीती व्यक्त होत आहे.
पुणे : पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचा नगरसेवक वनराज आंदेकरची (Vanraj Andekar Murder) त्याच्याच बहिणींच्या सांगण्यावरून निर्घृण हत्या करण्यात आली. भावा - बहिणीतील मालमत्तेचा आणि वर्चस्वाच्या वादातून ही हत्या झाल्याचं पोलिसांचं म्हणणे आहे. आंदेकर कुटुंब गेल्या काही वर्षांत (Pune Crime News) राजकारणात सक्रिय झालं. मात्र पुण्याच्या गुन्हेगारी विश्वात या कुटुंबाचा रंक्तरंजित इतिहास तब्ब्ल पाच दशकांचाय . त्यामुळं वनराज आंदेकरांच्या हत्येनंतर पुण्यातील टोळीयुद्ध भडकण्याची भीती व्यक्त होत आहे.
पुण्यातील नाना पेठेत निवांत उभ्या असलेल्या वनराज आंदेकरांची चार दुचाकींवरून आलेल्या मारेकऱ्यांनी अवघ्या दहा सेंकदात हत्या केली . जीव वाचवण्यासाठी पळण्याचा प्रयत्न करणाऱ्या वनराज आंदेकरांची पिस्तुलातून गोळ्या झाडून आणि कोयत्यांनी वार करून हत्या करण्यात आली . वाऱ्याच्या वेगाने आलेले हल्लेखोर तसेच पसार देखील झाले . पुण्यातील मध्यवर्ती भागात झालेल्या वनराज आंदेकरांच्या या हत्येला त्यांचा सख्ख्या बहिणींसोबतचा मालमत्तेचा वाद कारणीभूत ठरला . गेल्या काही महिन्यांपासून वनराज आंदेकर यांचं त्यांच्या दोन सख्ख्या बहिणी संजीवनी आणि कल्याणी आणि दोन सख्खे मेहुणे जयंत आणि गणेश लक्ष्मण कोमकर यांच्यासोबत बिनसलं होतं .
संजीवनी कोमकरच्या मालकीच्या नाना पेठेतील दुकानावर वनराज आंदेकरने पुणे महापालिकेच्या अतिक्रमण हटाव विभागाला कारवाई करायला भाग पाडलं . त्यावेळी झालेल्या भांडण पुण्यातील समर्थ पोलीस ठाण्यात पोहचलं होतं . त्यावेळी संजीवनी आंदेकरने पोलीस ठाण्यातच वनराजला तुला संपवते अशी धमकी दिली होती . सख्ख्या बहिणीने दिलेली धमकी वनराजने गांभीर्यानं घेतली नाही आणि रविवारी रात्री बेसावध असलेल्या वनराजची हत्या झाली . या हत्येनंतर पोलिसांनी संजीवनी ,कल्याणी या दोन सक्ख्या बहिणी आणि जयंत आणि गणेश या त्यांच्या नवरायांसह सोमनाथ गायकवाड , या प्रमुख आरोपींसह दहा जणांना अटक केलीय . मध्यवर्ती पुण्यात यामुळं तणावाचं वातावरण आहे .
कुटुंबातील अंतर्गत संघर्षच वनराज आंदेकरच्या हत्येला कारणीभूत
मागील पाच दशकांपासून आंदेकर कुटुंबाची पुण्यातील मध्यवर्ती भागात दहशत राहिलीय . त्यातील पंचवीस वर्षं आंदेकर कुटुंबातील अनेकजण पुणे महापालिकेत नगरसेवक म्हणून निवडून येत गेल्यानं या दहशतीला राजकीय पाठबळही वेळोवेळी मिळत गेलं . मात्र इतरांवर जरब बसवणाऱ्या या आंदेकर कुटुंबातील अंतर्गत संघर्षच वनराज आंदेकरच्या हत्येला कारणीभूत ठरलाय .
काय आहे आंदेकर कुटुंबाचा इतिहास?
- सत्तरच्या दशकात जुने कपडे घेऊन त्याबदल्यात भांडी विकणारं आंदेकर कुटुंब गुन्हेगारीकडं वळलं आणि जुगार , मटका , खंडणी अशा मार्गांनी मध्यवर्ती पुण्यात या कुटुंबानं बस्तान बसवलं .
- बाळकृष्ण आंदेकर याने सुरु केलेल्या या टोळीतील प्रमोद माळवदकर वेगळा झाल्याने सत्तरच्या दशकात पुण्यात आंदेकर - माळवदकर टोळीयुद्धाची सुरुवात झाली .
- त्यातून आंदेकर टोळीने प्रमोद माळवदकरच्या वडिलांची 1978 मध्ये हत्या केली .
- पुढे माळवदकर टोळीने बाळकृष्ण आंदेकरची 1984 ला हत्या केली. हत्या करून त्या हत्येचा बदला घेतला.
- बाळकृष्ण आंदेकरच्या हत्येनंतर या टोळीची सूत्रं त्याचा चुलतभाऊ सूर्यकांत आंदेकाराकडे आली .
- सूर्यकांत आंदेकरला हत्येप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली .
- या टोळीयुद्धातून पुण्यात पुढे सहा हत्या झाल्या. त्यानंतर पुणे पोलिसांनी 1997 मध्ये प्रमोद माळवदकरचा एन्काउंटर केल्यावर हे टोळीयुद्ध शांत झालं .
- पुढे आंदेकर कुटुंबाने गुन्हेगारी बरोबरच राजकारणात प्रवेश केला आणि बाळकृष्ण आंदेकरची बहीण वत्सला आंदेकर या 1997 ला नगरसेवक म्हणून निवडून आल्या आणि 1998 ला सुरेश कलमाडींच्या पाठिंब्यावर पुण्याच्या महापौर बनल्या.
- तर जन्मठेपेची शिक्षा झालेल्या सुर्यकांत आंदेकरांची पत्नी राजेश्री आंदेकर या देखील नगरसेविका बनल्या.
- आंदेकर कुटुंबातील रमाकांत, गणेश, उदयकांत आणि वनराज हे देखील नगरसेवक बनले.
- वनराज हा सुर्यकांत आणि राजेश्री यांचा मुलगा तर संजिवनी आणि कल्याणी या मुली. पण पुढे या सख्ख्या भावा - बहीणीतच मालमत्ता आणि वर्चस्वातून वाद सुरु झाला.
- यातन जयंत कोमकर आणि सोमनाथ गायकवाड याचा साथीदार निखिल आखाडे याच्यावर काही महिन्यांपूर्वी सुर्यकांत आंदेकरने हल्ला केला.
- सूर्यकांत आंदेकरवर त्यावेळी मोक्का कायद्याअंतर्गत कारवाई देखील करण्यात आली .
- मात्र राजकीय दबावामुळे सुर्यकांतला जामीन मिळाला. आणि जयंत कोमकर आणि सोमनाथ गायकवाडने चिडून वनराज आंदेकरचा काटा काढायचं ठरवलं .
- मात्र मध्यवर्ती भागातील या टोळीयुद्धानं पुण्यात भीतीच वातावरण असून विरोधकांनी कायदा आणि सुवसिस्थेचा प्रश्न उपस्थित केलाय.
पाच दशकाच्या टोळीयुद्धाचा शेवट अखेर कुटुंबात झाला
वनराज आंदेकरांच्या हत्येच्या आरोपाखाली वनराजच्या सख्ख्या बहिणी संजीवनी आणि कल्याणी आणि दोन सख्खे मेहुणे जयंत आणि गणेश कोमकर यांना अटक केलीय . मात्र इथून पुढे हे टोळीयुद्ध आणखी भडकणार नाही याची खबरदारी घेण्याचं आव्हान पुणे पोलिसांसमोर असणार आहे. गुन्हेगारीचा शेवट गुन्हेगारीनेच होतो हा इतिहास आहे. मागील तीन पिढ्या स्वतः आंदेकर कुटुंब या इतिहासाचा भाग राहिलंय. गेली पाच दशकं बाहेर खेळलं जात असलेलं टोळीयुद्ध अखेर त्यांच्या कुटुंबात सुरु झालं आणि सख्ख्या बहिणींकडून भावाची हत्या घडवण्यात आली .
हे ही वाचा :