(Source: ECI/ABP News/ABP Majha)
भिडे पुलावरून सेल्फी काढण्याच्या प्रयत्नात मुठा नदीत पडलेल्या दोन तरुणांचे मृतदेह सापडले
पुण्यातील बाबा भिडे पुलावरून मुठा नदीत पडलेल्या दोन तरुणांचे मृतदेह आज नदीपात्रात सापडले.
पुणे : पुण्यात पावसाने जोरदार हजेरी लावत अक्षरश: धुमाकूळ घातला होता. अनेक रस्ते, नाले पाण्याखाली गेले होते. पुण्यातील बाबा भिडे पुलावरून मुठा नदीत पडलेल्या दोन तरुणांचे मृतदेह आज नदीपात्रात सापडले. दोन दिवसांपूर्वी ओंकार तुपधर आणि सौरभ कांबळे हे भिडे पुलावरून नदीत पडले होते.
काय आहे घटना? पुण्यात धुवांधार पाऊस झाल्यामुळे नद्या नाल्यांना पूर आलाय. हे पाणी आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात टिपण्यासाठी शहरातील बाबा भिडे पुलावर दोन तरुण सेल्फी काढण्यासाठी आले होते. सेल्फी काढताना एका तरुणाचा पाय घसरुन तो पाण्यात पडला. मित्राला पाण्यात वाहून जाताना पाहून दुसऱ्यानेही त्याला वाचवण्यासाठी पाण्यात उडी घेतली. ओंकार तुपधर, (वय 17) सौरभ कांबळे (वय 20) अशी दोघांची नावे आहेत. शुक्रवारी सायंकाळी 5.35 वाजताच्या सुमारास ही घटना घडली. सायंकाळच्या सुमारास हे तरुण बाबा भिडे पूलावरून वाहून गेले. शुक्रवारपासून आतापर्यंत शोधकार्य सुरू आहे. यात महापालिका आपत्ती व्यवस्थापन मदत करत नसल्याचा आरोप कुटुंबातील नातेवाईकांनी केला होता. डेक्कनपासून मांजरीपर्यंत शोध सुरू होता.
पुण्यात परिस्थिती पुर्वपदावर
पुण्यात पावसाने जोरदार हजेरी लावत अक्षरश: धुमाकूळ घातला. अनेक रस्ते, नाले पाण्याखाली गेले आहेत. गुरुवारी संध्याकाळपासून पावसाने झोडपून काढले आहे. पुण्यामध्ये आता पाऊस थांबला आहे. कर्वेरोडवरचा नेहरु वस्तीमधील काही घरांमध्ये पाणी शिरलं होतं. आता वस्तीमधलं पाणी ओसरलं आहे. पण घरांमध्ये पाणी शिरल्याने खूप नुकसान झालं आहे. तसंच काही कोविड सेंटरमध्ये देखील पाणी शिरल्याने प्रशासनासह कोविड रुग्णांची देखील तारांबळ उडाली.