चंद्रकांत पाटलांवरील शाईफेकीनंतर राजकारण तापलं; समता सैनिक दलाच्या दोघांना तर वंचितच्या एका सदस्याला अटक
Chandrakant Patil Latest News: समता सैनिक दलाच्या दोघांना तर वंचितच्या एका सदस्याला अटक, राजकारण तापलं. हिंमत असेल तर समोर या, चंद्रकांत पाटलांचं विरोधकांना आव्हान.
Chandrakant Patil Latest News: पिंपरीत (Pimpri) काल मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्यावर शाईफेक करण्यात आली असून महाराष्ट्रात (Maharashtra News) झुंडशाही सुरु असून, हिंमत असेल तर समोर या, असं आव्हान काल (शनिवारी) चंद्रकांत पाटलांनी विरोधकांना दिलं आहे. याप्रकरणी पोलिसांकडून कारवाई करण्यात आली आहे. चंद्रकांत पाटलांवर शाईफेक करणाऱ्यांची नावं समोर आली असून त्यांना अटकही करण्यात आली आहे. मुख्य आरोपी मनोज घरबडे यानं दोन साथीदारांसह शाईफेक केली असल्याचं समोर आलं आहे. याप्रकरणी सर्व आरोपींना पोलिसांनी अटक केली असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महात्मा ज्योतिबा फुले (Mahatma Jyotiba Phule) आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) यांच्यावर केलेल्या वक्तव्यावरुन मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर काल (शनिवारी) पिंपरीमध्ये शाईफेक करण्यात आली. शाईफेक करणाऱ्या व्यक्तीला पोलिसांनी घटनास्थळावरुनच ताब्यात घेतलं होतं. त्यानंतर त्याच्या इतर दोन सहकाऱ्यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतलं. चंद्रकांत पाटलांवर शाईफेक करणाऱ्यांमध्ये मनोज घरबडे आणि त्याच्या दोन साथीदारांचा समावेश होता. विजय ओव्हाळ आणि धनंजय ईचगज यांचाही शाईफेक करण्यात सहभाग होता.
उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील पिंपरी दौऱ्यावर असताना झालेल्या शाईफेक प्रकरणी समता सैनिक दल संघटनेच्या दोन कार्यकर्त्यांना, तसेच वंचित बहुजन आघाडीच्या पिंपरी चिंचवड सचिवांना अटक करण्यात आली आहे. समता सैनिक दलाचे संघटक आरोपी मनोज भास्कर घरबडे, समता सैनिक दल सदस्य धनंजय भाऊसाहेब ईचगज आणि वंचित बहुजन आघाडी सचिव विजय धर्मा ओवाळ यांना हे कृत्य केल्याप्रकरणी चिंचवड पोलिसांनी अटक केली आहे. या तिघांवरही भादवि कलम 307,353,294,500,501,120 (ब) 34 क्रिमिनल अमेंन्डमेंन्ट ऍक्ट कलम 7 महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 37(1)135 अन्वे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शाईफेक झाल्यानंतर चंद्रकांत पाटील काय म्हणाले?
शाईफेकीचा मंत्री चंद्रकांत पाटलांकडून निषेध करण्यात आला असून महाराष्ट्रात झुंडशाही सुरु असून, हिंमत असेल तर समोर या, असं आव्हान चंद्रकांत पाटलांनी विरोधकांना दिलं होतं. तसेच, ही लोकशाही नाही. पोलिसांना दोष देण्याचं कारण नाही. पोलिसांवर निलंबनाची कारवाई करु नका, त्यांची यामध्ये काहीही चूक नाही, अशी विनंतही देवेंद्र फडणवीसांना चंद्रकांत पाटलांनी केली आहे.
वाद नेमका काय?
राज्यात वादग्रस्त वक्तव्यांची मालिका काही केल्या थांबत नाही. भाजपचे नेते आणि राज्याचे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी काही दिवसांपूर्वी महात्मा फुले आणि आंबेडकरांबाबत केलेल्या वक्तव्यावरून सध्या राज्यात घमासान सुरू आहे. महात्मा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी अनुदान न मागता भीक मागून शाळा सुरु केल्या, असं वक्तव्य मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे विरोधकांनी चंद्रकात पाटील यांच्यावर हल्लाबोल केला आहे. चंद्रकात पाटलांच्या वक्तव्यावर विरोधकांनी तीव्र शब्दांत आक्षेप घेतला आहे. दरम्यान, सत्ता गेली त्यामुळे सरकारला बदनाम करण्याचं कारस्थान असल्याचं सांगत चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन आपल्या वक्तव्यावर स्पष्टीकरणही दिलं.