(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Pune Crime News : तीन हजार रुपयांसाठी टॅक्सी चालकाकडून इंजीनिअरची निर्घृण हत्या; नेमकं काय घडलं?
आय टी हब म्हणून ओळख असलेल्या पुण्यातच एका आय टी अभियंताची 3000 रुपयांसाठी टॅक्सी चालक आणि त्याच्या साथीदाराने निर्घृण हत्या केली. वाघोलीतील मल्हारी डोंगराच्या पायथ्याशी या अभियंत्याची हत्या करण्यात आली
Pune Crime News : आयटी हब म्हणून ओळख असलेल्या पुण्यातच एका आयटी अभियंताची 3000 रुपयांसाठी टॅक्सी चालक आणि त्याच्या साथीदाराने निर्घृण हत्या केली. वाघोलीतील मल्हारी डोंगराच्या पायथ्याशी या अभियंत्याची हत्या करण्यात आली आणि लोणी कंद पोलिसांनी अवघ्या 24 तासात त्याच्या मारेकऱ्यांना अटक केली. गौरव सुरेश उदाशी (वय 35 वर्षे) असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे. टॅक्सी चालक भगवान केंद्रे (उस्मानाबाद) आणि अमोल मानकर (वाशिम) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींचे नाव आहेत.
आरोपी भगवान केंद्रे याच्याकडे चारचाकी वाहन आहे. ॲप आधारित टॅक्सी सर्विस तो पुरवतो. यातूनच भगवान आणि गौरव यांची ओळख झाली होती. गौरवने त्याच्या टॅक्सीतून यापूर्वी प्रवासही केला होता. त्याचीच 3000 रुपये उधारी गौरवकडे होती. हे पैसे परत न दिल्यानेच भगवान आणि त्याच्या साथीदाराने गौरवचा काटा काढल्याचं समोर आलं आहे.
क्षुल्लक कारणावरुन राडे
मागील काही दिवसांपासून पुण्यात क्षुल्लक कारणावरुन हत्या आणि हल्ल्यांमध्ये वाढ झाली आहे. त्यात अनेक गॅंगदेखील सक्रिय झाल्या आहेत. काही दिवसांपूर्वी रस्त्यावरुन जाणाऱ्या तरुणाने 'भाई' न म्हटल्याने गुंडांच्या टोळीने जीवे मारणाचा प्रयत्न केल्याची घटना घडली होती. या टोळीने तरुणाच्या डोक्यात रॉड मारुन त्याला जखमी केले होते. पुण्यातील येरवडा परिसरात ही घटना खडकीतील शिवाजी पुतळ्याच्या परिसरात घडली होती. या प्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली होती आणि चौघांवर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला होता. या हल्ल्यात तक्रारदार जखमी झाला. त्यानंतर त्या तक्रारदाराचा मोबाईल फोन देखील फोडला. हा सगळा प्रकार पाहून परिसरातील लोकांनी भांडणं सोडवण्यासाठी प्रयत्न केला. त्यांनी गर्दीदेखील केली मात्र या टोळीने परिसरात दहशत निर्माण केली. वेत लोखंडी रॉड फिरवून लोकांना तुम्ही इथे थांबू नका याला आम्ही जिवंत सोडणार नाही. यावेळी परिसरात गोंधळाचं वातावरण निर्माण झालं होतं.
पुण्यात गुन्हेगारीत वाढ
पुण्यात सातत्याने गुन्हेगारीत वाढ होताना दिसत. रोज पुण्यात नवे गुन्हे समोर येत आहे. पुण्यात सध्या अनेक टोळ्या सक्रिय असल्याचं बघायला मिळत आहे. त्यात शहरात चुहा गॅंग आणि कोयता गॅंग चांगल्याच सक्रिय आहेत. कोयता गॅंगने तर शहरात धुमाकूळ घातला आहे. पुण्यातील अनेक परिसरात या गॅंगने दहशत निर्माण केली आहे. या आणि यासारख्या अनेक गॅंगला आळा घालण्याचं पुणे पोलीसासमोर मोठं आव्हान आहे.