Baramati Lok Sabha : सुप्रिया सुळे Vs सुनेत्रा पवार? बारामतीत नणंद-भावजय निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता
मुलांचा राजकारणात सक्रिय सहभाग वाढवू पाहणाऱ्या सुनेत्रा पवार खरंच सुप्रिया सुळे यांच्या विरोधात निवडणूक लढतील का असा सवाल उपस्थित झाला आहे.
पुणे: पवार म्हणजे बारामती आणि बारामती म्हणजे पवार अस समीकरण हे अनेक दशके राज्याच्या राजकारणात रुजले आहे. सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांचा पराभव करण्यासाठी भाजपने कंबर कसली आहे. सुप्रिया सुळे यांचा पराभव करण्यास भाजपाने पवार घरातील कुणालातरी उमेदवारी द्यायचे असे ठरवले असल्याची चर्चा आहे. त्यामुळे सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) बारामती लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार अशी चर्चा सुरु झाली आहे. पण मुलांचा राजकारणात सक्रिय सहभाग वाढवू पाहणाऱ्या सुनेत्रा पवार खरंच सुप्रिया सुळे यांच्याविरोधात निवडणूक लढतील का असा सवाल उपस्थित झाला आहे. .
सुनेत्रा पवार राज्यातील पॉवरफुल घराण्यातील पॉवरफुल सुनबाई. पवार म्हणजे बारामती आणि बारामती म्हणजे पवार असं समीकरण हे अनेक दशके राज्याच्या राजकारणात रुजले आहे. परंतु याच सुनेत्रा पवार आता नणंद असणाऱ्या सुप्रिया सुळे यांच्याविरोधात बारामती लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याची चर्चा सुरु झाली आहे. याआधी खासदार सुप्रिया सुळे यांच्याविरोधात त्यांचे पुत्र पार्थ पवार लढणार अशी चर्चा सुरु होती. पण अचानक सुनेत्रा पवारांची चर्चा सुरु झाल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे.
सहा विधानसभा मतदारसंघात कोणाचा कोणाला पाठिंबा?
बारामती लोकसभा मतदारसंघात एकूण 6 विधानसभा मतदारसंघ येतात. बारामती, इंदापूर, दौंड, पुरंदर हवेली, खडकवासला, भोर-वेल्हा हे विधानसभा मतदारसंघ येतात. खडकवासला आणि दौंड मतदारसंघात भाजपचे आमदार आहेत. यामध्ये राष्ट्रवादीचे दोन, काँग्रेसचे दोन, आणि भाजपचे दोन असे आमदार आहेत. राष्ट्रवादीचे अजित पवार आणि दत्तात्रय भरणे, काँग्रेसचे संग्राम थोपटे आणि संजय जगताप, भाजपचे राहुल कुल आणि भीमराव तापकीर असे आमदार आहेत. अजित पवारांच्या बंडामुळे दत्तात्रय भरणे हे अजित पवारांच्या बाजूला आहेत. भोरचे आमदार संग्राम थोपटे आणि शरद पवारांचे संबंध सलोख्याचे नाहीत.
पुरंदरचे आमदार संजय जगताप हे अजित पवारांमुळे निवडून आले आहे. पण पुरंदर तालुक्यातील काही जण सोडले तर संपूर्ण राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारांच्या बाजूला आहे. भाजपचे राहुल कुल यांच्या पत्नी 2019 साली कांचन कुल या सुप्रिया सुळे यांच्याविरोधात उभ्या राहिल्या होत्या. कांचन कुल यांचा 1 लाख 30 हजार मतांनी पराभव झाला होता. तर 2014 साली महादेव जानकर हे सुप्रिया सुळे यांच्याविरोधात उभे राहिले होते. त्यामध्ये जानकर यांचा 69 हजार 666 मतांनी पराभव झाला होता.
राजकारणात येण्याआधी सुप्रिया सुळे सामाजिक कामात सक्रिय
आता सुप्रिया सुळे यांच्याविरोधात सुनेत्रा यांच्या नावाची चर्चा सुरु झाली आहे. सुप्रिया सुळे राजकारणात येण्याआधी त्या महिला सक्षमीकरण, सबलीकरण, आदिवासींचा शैक्षणिक व सामाजिक विकास, तसेच पवार चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून अनेक सामाजिक कामे करण्यात सक्रिय होत्या. तसेच यशवंतराव चव्हाण विकास प्रतिष्ठानच्या माध्यमातून अनेक समाज उपयोगी कामे आजही करत आहेत. या कामामुळे त्याच्या लोकांशी थेट संपर्क आला. त्यांनतर त्या राज्यसभेत निवडून गेल्या. त्यांनतर त्या सलग तीन वेळा बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार राहिल्या आहेत. तिसऱ्या टर्ममध्ये खासदार सुप्रिया सुळे यांनी मतदारसंघातील प्रत्येक गावाला भेट दिली आहे.
सुनेत्रा पवारांचा बारामती विधानसभा मतदारसंघावर प्रभाव
तर सुनेत्रा पवार या एन्व्हायरमेंटल फॉर्म ऑफ इंडिया, हायटेक टेक्स्टाईल पार्क कापड उद्योगांशी अनेक संस्था जोडल्या. त्यामुळे अनेक कुटुंबातील महिलांना प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष रोजगार मिळाला, ग्राम स्वच्छता, स्मार्ट व्हिलेज, पर्यावरण संतुलित गाव या माध्यमातून सक्रिय आहेत. शिक्षण क्षेत्रात सक्रीय आहेत. सावित्रीबाई फुले विद्यापीठात सिनेट सदस्य, सुनेत्रा पवारांचा पुणे जिल्ह्यात विशेषतः बारामती विधानसभा मतदारसंघावर प्रभाव आहे.
सुनेत्रा पवार खरंच बारामतीमधून निवडणूक लढतील?
सुनेत्रा पवार आणि सुप्रिया सुळे या शिक्षण क्षेत्रात काम करतात. विद्या प्रतिष्ठान या संस्थेच्या माध्यमातून त्या शिक्षण क्षेत्रात सक्रिय आहेत. सुनेत्रा पवार या सुप्रिया सुळे यांच्याविरोधात निवडणूक लढणार असा प्रश्न सुप्रिया सुळे यांना विचारला असता सुप्रिया सुळे यांनी सुनेत्रा पवार यांच्या उमेदवारीचे स्वागत केलं आहे. पण खरंच सुनेत्रा पवार राजकारणात सक्रिय होतील का सवाल विचारला जातोय. त्याचे कारण आहे सुनेत्रा पवारांची दोन मुले पार्थ आणि जय. पार्थ पवार हे आधीपासूनच राजकारणात सक्रिय आहेत. अजित पवारांच्या बंडानंतर जय पवार देखील राजकारणात सक्रिय झाले आहेत. त्यामुळे मुलांना राजकारणात सक्रिय करु पाहणाऱ्या सुनेत्रा पवार खरंच बारामतीतून निवडणूक लढतील का असा प्रश्नच आहे.
सुप्रिया सुळेंचा पराभव करण्यासाठी भाजपचे प्रयत्न
भाजपला बारामती लोकसभा मतदारसंघात सुप्रिया सुळे यांचा पराभव करायचा आहे. बारामती लोकसभा मतदारसंघात विजय शिवतारे, कांचन कुल, हर्षवर्धन पाटील, पार्थ पवार यंच्या नावाची चर्चा सुरु असताना सुनेत्रा पवारांचे नाव आले. पण सुनेत्रा पवार या भाजपकडून लढतील का असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाला आहे. तर अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी बारामती लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी हे अजित पवार निश्चित करतील असे सांगितल्याने राजकीय चर्चांना उधाण आले. अजित पवारांनी उमेदवारी घोषित करण्याआधीच सुनेत्रा पवारांच्या नावाची चर्चा सुरु झाल्याने राजकीय वर्तुळात मात्र चर्चांना उधाण आलं आहे. पण सुप्रिया सुळे यांच्यासमोर सुनेत्रा पवार असणार? की आणखी कोणी? हे लवकरच स्पष्ट होईल.
हे ही वाचा :
AJit pawar and Sunetra Pawar : अजित पवार म्हणाले, लवकरच माझी पत्नी सुनेत्रा सुद्धा.....