Siddharth Shinde Passed Away: सुप्रीम कोर्टाचे वकील सिद्धार्थ शिंदे यांचे निधन; दिल्लीत हृदयविकाराच्या झटक्याने मालवली प्राणज्योत
Siddharth Shinde Passed Away: शिंदे यांना सर्वोच्च न्यायालयात असतानाच चक्कर आली होती. त्यानंतर त्यांना एम्स रुग्णालयामध्ये हलवण्यात आलं. मात्र हृदयक्रिया बंद पडल्याने त्यांचा मृत्यू झाला.

दिल्ली: सर्वोच्च न्यायालयातील वकील सिद्धार्थ शिंदे (Siddharth Shinde) यांचं काल (सोमवारी, ता १५) रात्री दिल्लीतील एम्स रुग्णालयात निधन झालं. ते 48 वर्षांचे होते. शिंदे यांना सर्वोच्च न्यायालयात असतानाच चक्कर आली होती. त्यानंतर त्यांना एम्स रुग्णालयामध्ये हलवण्यात आलं. मात्र हृदयक्रिया बंद पडल्याने त्यांचा मृत्यू झाला. माजी केंद्रीय कृषिमंत्री अण्णासाहेब शिंदे यांचे सिद्धार्थ शिंदे हे नातू होते.(Siddharth Shinde Passed Away)
सिद्धार्थ शिंदे यांना महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींची बारकाईने जाण आणि संविधानाविषयी सखोल ज्ञान होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे. मूळचे श्रीरामपूर येथील रहिवासी असलेले सिद्धार्थ शिंदे यांचे कुटुंबीय अनेक वर्षांपासून पुण्यामध्ये स्थायिक आहेत. केसेस, न्यायालयीन निर्णय, न्यायाधीशांचा दृष्टिकोन आणि कायद्याचे बारकावे हे सर्व ते सोप्या भाषेत सांगत असत.
गेल्या अनेक वर्षांपासून सिद्धार्थ शिंदे हे सर्वोच्च न्यायालयात वकील म्हणून कार्यरत होते. सोमवारी ते नेहमीप्रमाणे न्यायालयीन कामासाठी गेले असता अचानक त्यांना चक्कर आली. तत्काळ त्यांना एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचार सुरू असतानाच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने न्यायालयीन क्षेत्रात हळहळ व्यक्त होत असून, कायद्याची सोपी आणि समजण्यासारखी मांडणी करणारा जाणकार आवाज कायमचा हरपल्याची खंत व्यक्त होत आहे. त्यांचे पार्थिव नवी दिल्लीहून आज (मंगळवार १६ सप्टेंबर २०२५ रोजी) सकाळी पुण्यातील त्यांच्या घरी आणण्यात येणार असून दुपारी १ वाजता वैकुंठ स्मशान भूमी, रविवार पेठ, पुणे येथे अंत्यसंस्कार केले जातील.























