दिलीप वळसेंची कन्या तुतारीच्या चिन्हावर विधानसभा निवडणूक लढण्याची चर्चा, शरद पवार म्हणाले....
Sharad Pawar : दिलीप वळसे पाटलांची कन्या शरद पवारांच्या राष्ट्रवादीतून विधानसभा निवडणूक लढवणार, अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगली आहे. याबाबत शरद पवारांनी महत्वाचे वक्तव्य केले आहे.
Sharad Pawar : मंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) यांच्या कन्या अॅड. पूर्वा वळसे पाटील (Purva Walse Patil) यांचा गेल्या काही दिवसांपासून आपल्या मतदारसंघात वावर वाढला आहे. यामुळे पूर्वा वळसे पाटील या विधानसभा निवडणुकीच्या (Vidhan Sabha Election) रिंगणात उतरण्याचे संकेत आहेत. मात्र अजित पवार गटात असलेल्या दिलीप वळसे पाटलांची कन्या शरद पवारांच्या राष्ट्रवादीतून विधानसभा निवडणूक लढवणार, अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगली आहे. याबाबत शरद पवारांनी (Sharad Pawar) महत्वाचे वक्तव्य केले आहे.
दिलीप वळसेंची कन्या शरद पवार गटाकडून निवडणुकीच्या रिंगणात?
दिलीप वळसेंची कन्या शरद पवार गटाकडून विधानसभा लढण्यास इच्छुक आहेत का? असा प्रश्न विचारला असता शरद पवार म्हणाले की, आमच्या बाजूनं आमचा निर्णय आमचे स्थानिक नेते घेतील. या पलीकडे आणखी कोणाचं नाव घ्यायची गरज नाही, असे वक्तव्य त्यांनी केले आहे.
अतुल बेनके कोण आहेत?
तर अतुल बेनके यांनी आज शरद पवारांची भेट घेतली. याबाबत शरद पवार म्हणाले की, हे अतुल बेनके कोण आहेत? एखाद्या पक्षाच्या अध्यक्षाने यांना उत्तर द्यावं, इतका महत्वाचा माणूस आहे का हा? तुम्ही कोणाबद्दल विचारायला हवं अन् कोणाला महत्व द्यायला हवं, हे ठरवायला हवं, असे त्यांनी म्हटले.
शरद पवारांचा दिलीप वळसे पाटलांवर निशाणा
दिलीप वळसे पाटील हे आपल्या मतदारसंघात विकास करायला कमी पडले का? असे विचारले असता शरद पवार म्हणाले की, दिलीप वळसेंनी त्यांच्या मतदारसंघातले प्रश्न सोडवले नाहीत का? हे त्यांना विचारा, मुळात ते किती वर्षे सत्तेत आहेत. 35 वर्षे आमदार, त्यापैकी 25 वर्षे मंत्री आहेत. आता ज्यांना 25 वर्षात विकास करता आला नाही ते आता काहीतरी सांगतात. मुळात हा संधीसाधूपणा आहे. अनेकांना अनेक वर्षे संधी देऊन ही त्यांना कामं करता आलेली नाहीत. जनतेला न्याय देता आलेलं नाही, याला उत्तर आता शोधावं लागेल. यासाठी राज्याची सत्ता हातात घ्यावी लागेल.
जनतेचा कल बदललाय
अमित शाह यांच्या महाराष्ट्र दौऱ्याबाबत शरद पवार म्हणाले की, महाराष्ट्राच्या जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवली आहे. आता बघा पाच वर्षांपूर्वी काँग्रेसचा एक आणि राष्ट्रवादीचे चार खासदार निवडून आले. यावेळी महाराष्ट्राच्या जनतेने 48 पैकी 31 खासदार निवडून दिलेत. याचा अर्थ जनतेचा कल बदललेला आहे. आता जनतेने आमच्याकडे अपेक्षा ठेवल्या आहेत, असे त्यांनी म्हटले.
आम्हाला राज्याला स्थिर सरकार द्यायचंय
विधानसभा निवडणुकीसाठी मविआच्या जागावाटपाबाबत शरद पवारांना विचारले असता ते म्हणाले की, मविआचे तिन्ही पक्ष एकत्र बसून निर्णय घेतील. हीच जागा द्या किंवा तीच जागा द्या, असा आग्रह आम्ही करणार नाही. आम्हाला राज्याला स्थिर सरकार द्यायचं आहे, हे आमचं मुख्य उद्धिष्ट आहे, असे स्पष्टीकरण शरद पवारांनी दिले आहे.
शहाण्या माणसांनी याची नोंद घ्यावी
स्वंयसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी काही लोक आधी सुपरमॅन (महापुरुष), त्यानंतर पूजनीय आणि पूजनीयनंतर देव बनू पाहत आहेत, असे वक्तव्य केले होते. यावर शरद पवार म्हणाले की, आता मला कल्पना नाही, ते कोणाबद्दल बोलले असावेत. आता देव बनायला कोणीतरी निघाले होते. त्यावर भाजप आणि आरएसएसचे लोक वक्तव्य करायला लागले. शहाण्या माणसांनी याची नोंद घ्यावी, असे त्यांनी सांगितले.
चौकटीच्या बाहेर अधिकारी जायला लागले, ही गंभीर बाब
वादग्रस्त ट्रेनी आयएएस पूजा खेडकर प्रकरणावर शरद पवार म्हणाले की, मी जी माहिती घेतली, ती देशाच्या दृष्टीने चिंताजनक आहे. आपल्या देशात आणि राज्यात प्रशासकीय अधिकाऱ्यांची एक परंपरा आहे. त्या चौकटीच्या बाहेर अधिकारी जायला लागले, ही अतिशय गंभीर बाब आहे. केंद्र सरकार याची अतिशय गांभीर्याने दखल घेतील, योग्य ती कारवाई करतील, असे त्यांनी म्हटले आहे.
अतिशय उत्तम निर्णय
निवडणूक आयोगाने तुतारी आणि तुतारी ही मुक्तचिन्हे गोठवण्याचा निर्णय घेतल्याने शरद पवार गटाला मोठा दिलासा मिळाला आहे. याबाबत शरद पवार म्हणाले की, याचे दोन भाग आहेत. स्थानिक स्वराज्य निवडणूकीचा निर्णय राज्य निवडणूक आयोग घेते. या आयोगाने काल निर्णय घेतला. यापुढं तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह राज्यातील सर्व निवडणुकांमध्ये कायम राहील. अन्य पिपाणी वगैरे चिन्हावर बंदी घातली आहे, हा अतिशय उत्तम निर्णय झालाय. मात्र हा फक्त राज्यापुरता लागू आहे. देशाची लोकसभा आणि विधानसभा या ठिकाणी हाच निर्णय लागू करायला हवं, असे त्यांनी म्हटले आहे.
आणखी वाचा
"असली फालतू बडबड करायला मी मोकळा नाही", प्रश्नाचं उत्तर देताना अजित पवार भडकले; नेमकं काय घडलं?