Satish Wagh Case: एकदा नाही तर तब्बल 72 वेळा चाकूने भोसकलं! भाडेकरुने सुपारी देऊन भयंकर पद्धतीने सतीश वाघ यांना संपवलं
Satish Wagh Murder Case Update: सतीश वाघ यांचे अपहरण केल्यानंतर दहा ते पंधरा मिनिटांतच आरोपींनी सतीश वाघ यांचा गाडीतच खून केला असल्याची माहिती समोर आली आहे.
पुणे: पुण्यातील भाजप नेते आणि विधानपरिषद आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश सादबा वाघ (वय 55) यांचं अपहरण करून त्यांचा खून करण्यात आला. सतीश वाघ यांच्यावर चाकूने तब्बल 72 वार करून त्यांचा खून करण्यात आला आहे. त्यांच्याकडेच पूर्वी राहणाऱ्या एका भाडेकरूने सतीश वाघ यांची पाच लाख रुपयांना सुपारी देऊन वैयक्तिक कारणातून अपहरण करून खून केल्याची माहिती पोलिसांनी सांगितली आहे. याप्रकरणी खुनाचा कट रचणाऱ्या अक्षय हरिश जावळकर याच्यासह पवन श्यामकुमार वर्मा (वय 30, रा. शांतीनगर, धुळे), नवनाथ अर्जुन गुरसाळे (वय 32, रा. वाघोली), विकास शिंदे (रा. आव्हाळवाडी रोड, वाघोली) या चौघांना पोलिसांनी अटक केली आहे.
वाघ यांना तब्बल 72 वेळा चाकूने भोसकलं
सोमवारी (दि. 9) सकाळी सव्वासहाच्या सुमारास सतीश वाघ मॉर्निंग वॉकला गेले असताना त्याचवेळी फुरसुंगी फाटा परिसरातून नंबरप्लेट नसलेल्या चारचाकी गाडीतून चौघांनी त्यांचे अपहरण केले होते. याप्रकरणी सतीश यांचा मुलगा ओंकार वाघ (वय 27) याने हडपसर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती.
वाघ यांच्या अपहरणाची माहिती मिळताच गुन्हे शाखा आणि स्थानिक पोलिसांच्या पथकांनी आरोपींचा शोध सुरू केला होता. मात्र, सतीश वाघ यांचे अपहरण केल्यानंतर दहा ते पंधरा मिनिटांतच आरोपींनी सतीश वाघ यांचा गाडीतच खून केला असल्याची माहिती समोर आली आहे. वाघ यांना तब्बल 72 वेळा चाकूने भोसकण्यात आलं. सतीश वाघ यांच्या गळ्यावर सर्वाधिक वार करण्यात आले असून, पाठीवर देखील वार करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. वाघ यांचा जीव गेल्यानंतर आरोपींनी मृतदेह शिंदवणे घाटातील निर्जनस्थळी फेकून दिला. सायंकाळी त्यांचा मृतदेह स्थानिक नागरिकांना आढळला. त्यांनी याबाबत उरुळी कांचन पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी पोहचून तपास केला.
या घटनेनंतर पोलिसांची अनेक पथकं तयार करून तपास करण्यात आला. या मार्गावर असलेल्या 600 ते 800 सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तपासणी करण्यात आली आहे. आरोपींचा शोध घेत असताना पोलिसांना अपहरण करण्यासाठी वापरण्यात आलेली चारचाकी गाडी कॅमेऱ्यात दिसली. त्यानुसार त्यांनी वाघोली परिसरातून शर्मा याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे केलेल्या चौकशीत गुरसाळे आणि शिंदे या
दोघांची नावे आले. त्यांनी जावळकर याने आपल्याला वाघ यांची पाच लाख रुपयांना सुपारी दिल्याची माहिती चौकशीवेळी दिली. दरम्यान, या प्रकरणात गुन्हा करण्यापूर्वी आरोपींनी कट रचल्याने भारतीय न्याय संहितेचे कलम 61 नुसार (भादंवि 120ब) वाढ करण्यात आली आहे. तर, या प्रकरणाचा तपास देखील गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे.