Sandeep Karnik : संदीप कर्णिक यांच्या नियुक्तीने मावळ गोळीबाराच्या आठवणी ताज्या, कोण आहेत पुण्याचे नवे पोलीस सहआयुक्त?
Sandeep Karnik पुण्याचे पोलीस सहआयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आलेल्या संदीप कर्णिक यांची पुण्यातील या आधीची कारकीर्द वादग्रस्त राहिली आहे.
![Sandeep Karnik : संदीप कर्णिक यांच्या नियुक्तीने मावळ गोळीबाराच्या आठवणी ताज्या, कोण आहेत पुण्याचे नवे पोलीस सहआयुक्त? Sandeep Karnik appointed as Joint Commissioner of Police Pune, controversial career of Sandeep Karnik Sandeep Karnik : संदीप कर्णिक यांच्या नियुक्तीने मावळ गोळीबाराच्या आठवणी ताज्या, कोण आहेत पुण्याचे नवे पोलीस सहआयुक्त?](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/04/21/37b4702134e85fee715dde23a8ff9328_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई : राज्याच्या पोलीस विभागात मोठे बदल करण्यात आले आहे. अनेक आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. मुंबईच्या पश्चिम प्रादेशिक विभागाचे अतिरिक्त पोलीस आयुक्त म्हणून कार्यरत असलेल्या संदीप कर्णिक यांची पुण्याचे सहपोलीस आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. यापूर्वी डॉ. रविंद्र शिसवे हे पुणे सहपोलीस आयुक्त होते. त्यांची नियुक्ती आता महाराष्ट्र राज्य मानवी हक्क आयोग मुंबई इथे विशेष पोलीस महानिरीक्षक म्हणून बदली करण्यात आली आहे. गृहविभागाने पोलीस विभागातील बदलीचे आदेश काल (20 एप्रिल) जारी केले आहेत.
संदीप कर्णिक यांची वादग्रस्त कारकीर्द
पुण्याचे पोलीस सहआयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आलेल्या संदीप कर्णिक यांची पुण्यातील या आधीची कारकीर्द वादग्रस्त राहिली आहे. पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक असताना संदीप कर्णिक यांनी मावळमधील शेतकऱ्यांवर गोळीबार करण्याचे आदेश दिले होते आणि स्वतः देखील स्वत:कडच्या बंदुकीने शेतकऱ्यांवर गोळीबार केला होता. 9 ऑगस्ट 2011 साली झालेल्या या गोळीबारात एका महिलेसह तीन शेतकऱ्यांचा मृत्यू झाला होता तर 14 शेतकरी जखमी झाले होते.
पिंपरी-चिंचवड शहराला पुणे जिल्ह्यातील पवना धरणातून बंद पाईपलाईन मार्फत पाणी पुरवठा करण्यासाठी मावळ भागातील शेतकऱ्यांच्या जमिनी अधिग्रहित कराव्या लागणार होत्या. 9 ऑगस्ट 2011 रोजी या अधिग्रहणाचा विरोध करण्यासाठी शेतकऱ्यांचा मोठा जमाव अचानक पुणे-मुंबई एक्स्प्रेस वेवर आला आणि त्यांनी एक्स्प्रेस वे रोखून धरला. त्यावेळी शेतकऱ्यांना पांगवण्यासाठी पोलिसांना हवेत गोळीबार करण्याचे आदेश दिले. मात्र त्यानंतर शेतकऱ्यांवर गोळीबार करण्याचे आदेश संदीप कर्णिक यांनी दिले. त्याचबरोबर स्वतःकडच्या बंदुकीतून त्यांनी शेतकऱ्यांवर गोळीबार केला होता.
संदीप कर्णिक हे राज्याचे तत्कालीन पोलीस महासंचालक अजित पारसनीस यांचे जावई होते. त्यामुळेच त्यांच्यावर कारवाई होत नसल्याचा आरोप त्यावेळी शिवसेना-भाजपने केला होता. या घटनेनंतर संदीप कर्णिक यांची पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक पदावरुन बदली करण्यात आली होती. मावळ गोळीबार प्रकरणाची चौकशी करण्यासाठी तत्कालीन कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस सरकारकडून न्यायमूर्ती एम. जी. गायकवाड यांच्या एक सदस्यीय समितीची नेमणूक करण्यात आली होती. या समितीने संदीप कर्णिक यांनी केलेला गोळीबार समर्थनीय नव्हता, असा निष्कर्ष काढला होता आणि त्यांच्यावर कारवाई करण्याची शिफारस करण्यात आली होती.
दरम्यान चार वर्षांपूर्वी खातेनिहाय चौकशीत संदीप कर्णिक निर्दोष ठरले होते. शिवाय केवळ समज देण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयात हस्तक्षेप करण्यात मुंबई उच्च न्यायालयाने नकार दिल्याने कर्णिक यांना क्लीन चिट मिळाली.
संबंधित बातम्या
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)