Beed News : बीडचे एसपी आर राजा यांची अखेर पुण्याला बदली
बीड जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेच्या प्रश्नावर गृहमंत्र्यांनी सक्तीच्या रजेवर पाठवलेल्या आर राजा यांची अखेर बदली झाली आहे.
बीड : बीड जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेच्या प्रश्नावर गृहमंत्र्यांनी सक्तीच्या रजेवर पाठवलेल्या आर राजा यांची अखेर बदली झाली आहे. राजा यांची पुण्यात पोलीस उपायुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. राजा यांच्याकाळात बीड जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था ढासळल्याची लक्षवेधी राष्ट्रवादी कॉंग्रेस आमदारांनी केली होती. त्यानंतर त्यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आले होते. आता अखेर त्यांच्या बदलीचे आदेश आले आहेत. मात्र बीडचे नवे पोलीस अधीक्षक कोण? हे मात्र अद्याप समजू शकलेले नाही.
आर.राजा यांचा कार्यकाळ
तामिळनाडूतील सेलम हे आर.राजा यांचे गाव आहे. इलेक्ट्रीक इंजिनिअर ही पदवी त्यांनी घेतलेली आहे. ते 2012 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. दहा वर्षांच्या सेवा कालावधीत त्यांनी उस्मानाबाद, नगर जिल्ह्यात सेवा बजावलेली आहे. उस्मानाबादेत पोलीस अधीक्षक असताना त्यांच्या विरोधात लिपिकवर्गीय कर्मचाऱ्यांनी आंदोलन केले होते. त्यामुळे त्यांना महासंचालक कार्यालयात हलविण्यात आले होते.
पुढे त्यांना राज्य गुप्तवार्ता विभागाच्या उपायुक्तपदी नेमणूक दिली गेली. पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांच्या बदलीनंतर आर. राजा यांची 17 सप्टेंबर 2020 रोजी बीडला बदली झाली होती. 19 सप्टेंबर 2020 रोजी त्यांनी बीड पोलीस अधीक्षकपदाची सूत्रे स्वीकारली.
मागच्या काही दिवसांमध्ये बीड जिल्ह्यातील गुन्हेगारी स्वरूपाच्या घडामोडीनी वेग घेतला असून यात खून, बलात्कार, प्राणघातक हल्ले, गोळीबार त्यासोबतच वाळू माफियांचा हैदोस आणि जिल्ह्यातील मशिद आणि देवस्थानच्या जमिनी बळकावल्याचे प्रकरण यामुळे जिल्ह्यातील कायदा सुव्यवस्थेचे धिंडवडे निघत आहेत.
जिल्ह्यातील या गुन्हेगारी स्वरूपाच्या घटना संदर्भामध्ये भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी गृहमंत्री आणि पोलिस महासंचालकांना पत्र लिहून कळवले होते. पंकजा मुंडेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुद्धा जिल्ह्यातील कायदा-सुव्यवस्थेच्या संदर्भात तक्रारी करत असताना पाहायला मिळत आहेत. राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश सोळंके आमदार संदीप क्षीरसागर व आमदार बाळासाहेब आजबे या तीन आमदारानी बीड जिल्ह्यातल्या कायदा-सुव्यवस्थेचा संदर्भात थेट विधिमंडळात लक्षवेधी दाखल केली होती
सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार करत आहेत तक्रारी
विरोधी पक्षांनी जिल्ह्यातील कायदा-सुव्यवस्थेची तक्रार करणे स्वाभाविक असले तरी सत्ताधारी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या आमदारांनीच लक्षवेधी मांडत आहेत. पक्षातील वरिष्ठांकडे जिल्ह्यातील कायदा-सुव्यवस्थेच्या तक्रारी करत आहेत तर मग जिल्ह्यातील कायदा-सुव्यवस्थेचे राखायची कोणी असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.
विशेष म्हणजे बीड जिल्ह्यातील कायदा सुव्यवस्था संदर्भात विधिमंडळात मांडण्यात आलेल्या लक्षवेधी चर्चेत राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, सुधीर मुनगंटीवार,राधाकृष्ण विखे पाटील, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, आशिष शेलार, अभिमन्यू पवार, रवी राणा,राम कदम,आणि मंगेश चव्हाण हे आमदार सहभागी होणार आहेत.
बीडच्या कायदा-सुव्यवस्थेवर विशेष बैठकीचे आयोजन करण्याची पंकजा मुंडेंची मागणी
बीड जिल्हयात कायदा आणि सुव्यवस्था पूर्णतः ढासळली असून पोलिसांचा कसलाही धाक गुन्हेगारांवर राहिला नाही. चोऱ्या, खून, मारामाऱ्या, महिलांवर अत्याचार अशा घटना दिवसेंदिवस वाढतच आहेत. या घटनांमुळे सर्व सामान्य नागरिकांत भीती निर्माण झाली असून याची गंभीर दखल घेतली गेली पाहिजे, त्यासाठी फक्त बीडच्या विषयावर विशेष बैठक बोलवावी अशी मागणी भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी गृहमंत्री, गृह राज्यमंत्री आणि विशेष पोलिस महानिरीक्षक यांना पत्र पाठवून केली आहे.
गेल्या कांही महिन्यांपासून जिल्हयातील कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे, त्याला कारणही तसेच आहे. गुन्हेगारी स्वरूपाच्या घटना जिल्हयात मोठया प्रमाणात वाढल्या आहेत. चोऱ्या, खून, मारामाऱ्या, महिलांवर अत्याचार, खंडणी वसुली, तलवारी, रिव्हॉल्व्हर अशा घातक शस्त्रास्त्रांचा वापर सर्रास होताना दिसून येत आहे. बीड, परळी, आंबाजोगाई, माजलगांव, गेवराई सह सर्वच तालुक्यात गुन्हेगारांनी हैदोस मांडला आहे. पोलिसांचा कसलाही धाक अथवा नियंत्रण राहिले नाही. जिल्हयात पोलिस यंत्रणा आहे की नाही असा प्रश्न सर्व सामान्यांना पडला आहे असे पंकजा मुंडे यांनी म्हटले आहे.