Reservation to Govindas : गोविंदांना अधिकचं आरक्षण दिलं नाही, फक्त एक खेळ जोडला : चंद्रकांत पाटील
Reservation to Govindas : गोविंदांना सरकारी नोकऱ्यांमध्ये पाच टक्के आरक्षणाचा लाभ देण्याच्या सरकारच्या निर्णयावर विरोधी पक्षांसह स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांकडूनही विरोध होत आहे. यावर चंद्रकांत पाटील यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.
Reservation To Govindas : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी गोविंदांना (Govinda) नोकरीत पाच टक्के आरक्षणाचा (Reservation) निर्णय जाहीर केला आणि ते विरोधकांच्या टीकेचं लक्ष्य झाले. त्यावर आता राज्याचेउच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी यावर स्पष्टीकरण देत विरोधकांकडून समाजाची दिशाभूल केली जात असल्याचा आरोप केला. तसंच कोणी मागणी केली तर विटी दांडू, मंगळागौर हे देखील आरक्षणात जोडून असंही ते म्हणाले. चंद्रकांत पाटील आज (20 ऑगस्ट) पुण्यात बोलत होते.
दहीहंडीला खेळाचा दर्जा देत गोविंदांना सरकारी नोकऱ्यांमध्ये पाच टक्के आरक्षणाचा लाभ देण्याचा आणि 'प्रो गोविंदा' स्पर्धा आयोजित करण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केला. सरकारच्या या निर्णयावर विरोधी पक्षांसह स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांकडूनही विरोध होत आहे. मुख्यमंत्र्यांनी प्रशासनिक बाबी लक्षात न घेता भावनिक होऊन निर्णय जाहीर केल्याचं अजित पवार म्हणाले. तर दहिहंडी महाराष्ट्र सोडून कुठेच नाही, ती आपली परंपरा आहे, खेळ आहे. पण दोन गोष्टींमध्ये गल्लत करता कामा नये, असं काँग्रेस आमदार भाई जगताप म्हणाले. याशिवाय आम्ही आयुष्यभर अभ्यासच करत राहायचा का? असा प्रश्न स्पर्धा परीक्षांच्या संघटनांनी उपस्थित केला आहे.
...तर विटी दांडू, मंगळागौर देखील आरक्षणात जोडू : चंद्रकांत पाटील
यावर बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले की, "एखाद्या निर्णयाचा अभ्यास करण्यापूर्वीच बोलायला सुरु केलं जातं. आधीच राज्यात खेळामध्ये आरक्षणाचा कायदा आहे. खेळामधील पाच टक्के आरक्षण आधीच सगळ्या जातींना लागू आहे. याआधी जे खेळ यात होते, त्यात हा एक खेळ जोडला आहे. त्यात कुठलंही अधिकचं आरक्षण दिलेलं नाही, फक्त नवा खेळ जोडला आहे. कोणी विटी दांडू आरक्षणात जोडण्याची मागणी केली तर तोही जोडू. कोणी मागणी केली तर मंगळागौर देखील यात जोडू. सगळ्या गोष्टी सोप्या असताना त्या अवघड करुन समाजाची दिशाभूल केली जात आहे."
'आले मनात आणि घोषणा केली हे योग्य नाही'
तर गोविंदांना आरक्षण देण्याबाबत अजित पवार म्हणाले की, "उद्या दहीहंडी आहे आणि आज मुख्यमंत्र्यांनी त्याबद्दल आपली भूमिका मांडणे, असं म्हणत अजित पवारांनी आश्चर्य व्यक्त केलं. सोमवारी (22 ऑगस्ट) मी अधिवेशनात याबद्दल बोलणार आहे. गोविंदांना 5 टक्के आरक्षण देणार अशी घोषणा केली, तेव्हा मी प्रश्न केले नाही. मात्र, दहीहंडीत सहभागी होणाऱ्या गोविंदांचे रेकॉर्ड कसे ठेवणार? त्यांच्या पात्रतेबद्दल माहिती कशी ठेवणार? मुख्यमंत्री ज्या ठाण्याचं प्रतिनिधित्त्व करतात, तिथे गोविंदांची संख्या जास्त आहे. त्या गोविंदांना मला नाउमेद करायचं नाही, पण उद्या गोविंदाांना आरक्षण देऊन नोकरी देणार, मात्र जी मुलं-मुली स्पर्धा परीक्षा देण्यासाठी तयारी करतात, त्यांचे काय याबद्दल भूमिका नाही. मुख्यमंत्री झाल्यानंतर असे भावनिक होऊन निर्णय घ्यायचे नसतात. तिथे देवेंद्र फडणवीसही उपमुख्यमंत्री म्हणून आहेत, त्यांना पाच वर्षांचा अनुभव आहे. एकवेळ मला विम्याचा मुद्दा पटला, मात्र पाच टक्के आरक्षणाची घोषणा योग्य नाही, आले मनात आणि घोषणा केली हे योग्य नाही. क्रीडा विभाग किंवा कोणाशी बोलले नाही. सर्वांशी बोलण्याची गरज असते."
आम्ही आयुष्यभर अभ्यासच करत राहायचा का? : स्पर्धा परीक्षा संघटना
दहीहंडी खेळाडूंना आरक्षणाचा लाभ देण्याचा सरकारचा निर्णय अत्यंत चुकीचा आहे. सरकारने हा निर्णय मागे घ्यावा. हा निर्णय वर्षानुवर्षे अभ्यास करणाऱ्या उमेदवार आणि खेळाडूंवर अन्याय करणारा ठरणार आहे. खेळाडूंच्या प्रमाणपत्रात मोठ्या प्रमाणात गैरप्रकार होत असताना सरकारने घेतलेला निर्णय चिंताजनक आहे. हा निर्णय जाहीर करण्याच्या आधी त्यांनी अनेक विद्यार्थ्यांचा विचार करायला हवा होता. विद्यार्थी वर्षानुवर्षे अभ्यास करतात. त्या सगळ्या विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा विचार करावा, असं मत स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करण्याऱ्या विद्यार्थ्यांनी आणि त्यांच्या समन्वयकांनी व्यक्त केलं आहे. तसंच आम्ही आयुष्यभर अभ्यासच करत राहायचा का? असा प्रश्नही त्यांनी विचारला.
दोन गोष्टींमध्ये गल्लत करु नये : भाई जगताप
"दहीहंडी महाराष्ट्र सोडून कुठेच नाही. ती आपली परंपरा आहे, खेळ आहे. पण दोन गोष्टींमध्ये गल्लत करता कामा नये. संस्कृती, परंपरा जपल्या गेल्या पाहिजेत. मात्र त्यात अशा वेगळ्या गोष्टी आणू नये. सरकारी नोकरीच्या पदावर पोहोचण्याकरता अनेक वर्षे मेहनत करावी लागते. त्यामुळे स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांचा आक्षेप योग्य आहे," असं काँग्रेस आमदार भाई जगताप म्हणाले.
Chandrakant Patil on Govinda Sports Reservation : गोविंदांचं आरक्षण नव्याने दिलेले नाही : चंद्रकांत पाटील
संबंधित बातम्या