बेडरुमच्या मधोमध पलंग, नवदाम्पत्याने पकडापकडी खेळायची का? : राज ठाकरे
MNS Chief Raj Thackeray: याशिवाय महाराष्ट्रातील सर्किट हाऊस बघितली तर मोठं मोठी बाथरुम असतात, तिथे पळत पळत आंघोळ करायची का, असा टोमणा राज ठाकरे यांनी लगावला.
Raj Thackeray at Pune : पुणे : राज्यकर्त्यांना विकासाची दृष्टी असायला हवी. सौंदर्यदृष्टी सत्ते हवी. नियोजन नसल्यानं शहरं बकाल होत आहेत. लोकांना कोणत्या सुविधा पुरवायच्या याचं नियोजन हवं. गाडगे बाबांच्या राज्यात स्वच्छता शिकवावी लागते हे दुर्दैव आहे, असं रोखठोक मत मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी मांडलं आहे. जागतिक आर्किटेक्चर दिनानिमित्त (World Architect Day) शहर नियोजन, सौंदर्यदृष्टी आणि शाश्वत विकास यावर मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांची मुलाखत लेखक दीपक करंजीकर (Deepak Karanjikar) यांनी घेतली. पुण्यात झालेल्या मुलाखतीत राज ठाकरे यांनी आपल्या शैलीत भाष्य केलं आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या मुलाखतीच्या सुरुवातीलाच त्यांनी बीड सर्किट हाऊसचा किस्सा सांगितला. बीडमध्ये सर्किटहाऊसमध्ये गेलो होतो. तिथल्या बेडरुमध्ये गेलो. बेडरुमचा मोठा हॉल होता आणि मधोमध पलंग. समजा नवविवाहित दाम्पत्य या बेडरुममध्ये गेलं तर पकडापकडी खेळणार का? मध्ये पलंग ठेवणार का? असा सवाल राज ठाकरेंनी उपस्थित करताच एकच हशा पिकला. याशिवाय महाराष्ट्रातील सर्किट हाऊस बघितली तर मोठं मोठी बाथरुमं असतात, तिथे पळत पळत आंघोळ करायची का? असा टोमणा राज ठाकरे यांनी लगावला आहे.
राज ठाकरे काय म्हणाले?
महापालिकेत Development Planning होते पण Town Palnning होत नाही. सौंदर्य दृष्टी सत्तेत असायला लागते. राज्यकर्त्याला ती असेल तर ती खाली पाझरते. महापालिकेत, शासनात इंजिनिअर्स असतात पण टाऊन प्लॅनर नसतात, असं राज ठाकरे म्हणाले.
राज ठाकरे म्हणाले की, शासकीय विश्रामगृहाचे बाथरूम हे मोठ्या हॉल सारखे असते. बीडच्या इरिगेशन खात्याचे गेस्ट हाऊसमध्ये हॉलच्या मधोमध बेड ठेवला होता. तिथं नवीन जोडपं गेलं तर ते काय त्या भोवती पकडा पकडी खेळणार का?
अनेक गेस्ट हाऊसमध्ये भली मोठी बाथरूम असतात. तिथे काय पळत पळत येऊन आंघोळ करायची का ? शिवाजी पार्कमध्ये हेरिटेजमुळे बांधकामांना परवानगी बंद केली. एक इमारत दुसरी सारखी नाही. कुठून येणार हेरिटेज? असा प्रश्न राज ठाकरेंनी उपस्थित केला आहे.
आपण जो विचार करतो आणि सत्ताधारी जे करतात त्यात तफावत आहे. म्हणून सगळा विचका झालाय, असंही राज ठाकरे म्हणाले.
आपल्याकडे कामाची गती विषयी काय बोलावे? रामायणातील सिताहरण ते तिला परत आणण्यासाठी बांधलेल्या सेतूपर्यंतचा कालावधी जेवढा होता, तेवढा वेळ मुंबई वरळी सी लिंक तयार व्हायला लागला.
बेंचवर अमुक अमुक खासदाराच्या सौजन्याने असं लिहिलेलं असतं, ते काय काम आहे का खासदाराचे? ते कायदेमंडळचे सभासद असतात. त्यांनी कायदे करायचे असतात.G20 च्या निमित्ताने खांबांवर दिवे लावले, कळत नाही रस्ते आहे की डान्सबार? एका ठिकाणी सिंहावर खालून लाल लाईट टाकली, असं वाटतं त्याला मूळव्याध झालाय.
जोपर्यंत हे माझं आहे हे समजून राज्यकर्ते काम करणार नाहीत तोपर्यंत काही घडणार नाही. मी स्वतः विषयी आशावादी आहे. बाहेरून येणारे लोंढे, त्यांच्यासाठी पायाभूत सुविधा उभ्या राहत आहेत. बाहेरून आलेल्यांमुळे परिस्थिती बिघडली आहे. इथे आलेल्यांमुळे नाही.
ज्यांनी ही घाण करून ठेवली ती त्यांना घाण वाटत नाही. असं वागणाऱ्या लोकांना तुम्ही मतदान करता. तुम्ही वेगळ्याच मुद्द्यावर मतदान करता. तीच ती लोकं तुम्ही निवडून देता. त्यांनी विचका करून ठेवला, त्याचा मला संताप येतो.
एक ब्रीज पडला, एक दिवस बातमी येते आणि थांबते. त्यावर पुढे काही होत नाही.कुणाला जबाबदारच धरलं जात नाही.
तुमचं आयुष्य राजकारणाशी बांधलंय. मग तुम्ही राजकारणाला तुच्छ का लेखता? आर्किटेक्ट्सनी राजकारणात यायला हवे.
महाराष्ट्रातल्या प्रत्येक माध्यमवर्गीयाने राजकारण आलेच पाहिजे असे नाही, पण तुमची त्यावर नजर असली पाहिजे. राजकारणाला तुच्छ लेखू नका. तुमच्या सहभागातूनच हा महाराष्ट्र घडेल.