Pune Weather Update : पुण्यात हुडहुडी! तापमानाचा पारा घसरला; थंडीचा जोर वाढणार
गेल्या पाच ते सहा दिवसांमध्ये पुण्यात रात्रीचं (Pune Weather Update) तापमान 14 ते 15 अंश सेल्सिअस नोंदवलं गेलं आहे. त्यामुळे पुण्यात चांगलाच गारठा जाणवत आहे.
पुणे : गेल्या पाच ते सहा दिवसांमध्ये पुण्यात रात्रीचं (Pune Weather Update) तापमान 14 ते 15 अंश सेल्सिअस नोंदवलं गेलं आहे. त्यामुळे पुण्यात (Pune News) चांगलाच गारठा (Cold Weather) जाणवत आहे. प्रामुख्याने उत्तरेकडील राज्यांमधून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे गारठा वाढल्याचं हवामान खात्यानं सांगितलं आहे. मागील काही दिवसांत तापमानाच चांगली घट झाली असून आणखी काही दिवस तापमानात घट होणार असल्याचं देखील हवामान खात्याकडून सांगण्यात आलं आहे.
30 ऑक्टोबर रोजी किमान तापमान 16 अंश सेल्सिअस होते. पण 1 नोव्हेंबरपर्यंत ते झपाट्याने दोन अंशांनी घसरून 14 अंश सेल्सिअसवर आले. पुढील 48 तासांत शहराचे किमान तापमान 14 अंश सेल्सिअस राहील, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. शहरात उत्तरेकडील थंड वारे वाहू लागल्याने तापमानात लक्षणीय घट दिसून येत आहे. पाषाण येथे हंगामातील सर्वात कमी किमान तापमानाची नोंद झाली आहे. तापमान कमी होण्यास सुरुवात झाली असली तरी, महाराष्ट्रात अद्याप हिवाळा सुरू झालेला नाही, असे भारतीय हवामान विभागाच्या (IMD) अधिकाऱ्याने सांगितले. गेल्या 3-4 दिवसांत शहरातील कमाल आणि किमान तापमानात लक्षणीय घट झाली आहे, असंही ते म्हणाले.
पुण्यात विविध ठिकाणी किमान तापमान
- चिंचवड-20.5
- कोरेगाव पार्क -19.8
- हडपसर -18.0
- शिवाजीनगर -16.0
- पाषाण -14.0
पुणं गारठणार, विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तापमानात घट...
हवामान खात्यानं वर्तवलेल्या अंदाजानुसार, पुणेकरांना ऑक्टोबर हिटनंतर (october heat)थंडीचा सामना करावा लागणार आहे. पुढील दोन दिवस थंडी वाढणार आहे. मागील काही दिवस पुण्यात उन्हाचे चटके जाणवत होते. या उन्हामुळे पुणेकर हैराण झाले होते. मात्र, आता पुणेकरांना उन्हापासून दिलासा मिळणार आहे. त्यासोबतच विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात अनेक भागात किमान तापमान सरासरीपेक्षा किंचित खाली घसरलं आहे.
नोव्हेंबर महिन्यातही पावसाची शक्यता
गेल्या काही दिवसांत मुंबई, कोकणसह राज्यातील तापमानात बदल झाला आहे. सकाळी हवेतील गारवा वाढला आहे. यामुळे ऑक्टोबर हिटमुळे त्रस्त झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला. पण, आता नोव्हेंबर उजाडताच तापमान आणखी खाली जाण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. ठाणे, मुंबई, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवलीसह पनवेल आणि पालघरमध्येही पहाटे गुलाबी थंडी अनुभवायला मिळत आहे. यंदा नोव्हेंबर महिन्यात देशातील किमान तापमान सरासरीच्या वर जाण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रात सुद्धा किमान तापमान अधिक राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्यात थंडीचे प्रमाण कमी असेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. नोव्हेंबर महिनाच्या शेवटी मुंबई, ठाणेसह कोकणात थंडीचा जोर वाढणार आहे.
महत्वाच्या इतर बातम्या -