Pune Wadeshwar Katta : ब्रेकफास्ट विथ उमेदवार; पुण्यातील वाडेश्वर कट्ट्यावर मोहोळ, धंगेकर अन् मोरेंमध्ये रंगल्या गप्पा!
पुण्यातील प्रसिद्ध वाडेश्वर कट्ट्यावर मुरलीधर मोहोळ, रवींद्र धंगेकर आणि वसंत मोरे यांनी हजेरी लावली होती. तिघांनी एकत्र बसून पुण्यातील विविध विषयांवर गप्पा रंगल्या.
पुणे : लोकसभा निवडणुकीला अवघे काही दिवस (Pune Wadeshwar Katta) राहिले आहेत. जाहीर झालेल्या उमेदवारांनी प्रचाराला सुरुवात केलीय. आपल्या प्रतिस्पर्ध्याचा कसा पराभव करता येईल याची चाचपणी करताना दिसत असलेले पुण्यातील उमेदवार मात्र आज एकाच टेबलवर बसून नाष्टा करताना दिसले. निमित्त म्हणजे पुण्यातील वाडेश्र्वर कट्टा. हा कट्टा म्हणजे राजकीय मंडळींसाठी अराजकीय व्यासपीठ जिथे राजकारणाच्या पलीकडचं नातं जपलं जातं. पुणे लोकसभेसाठी महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol), महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) आणि अपक्ष उमेदवार वसंत मोरे (vasant More) हे तिघे ही जणं याच कट्ट्यावर एकत्र आले. पुढच्या काही दिवसांमधे जे उमेदवार एकमेकांविरुद्ध प्रचाराची राळ उठवताना दिसतील मात्र त्यापूर्वी या कट्ट्यवर या तिघांमध्ये चवदार पदार्थ आणि रसभरीत राजकीय गप्पा रंगताना दिसल्या.
पुणे लोकसभेसाठी महाविकास आघाडी आणि महायुतीचे उमेदवार जाहीर झाले आहेत. मायुतीकडून मुरलीधर महोळ उमेदवार आहेत तर महाविकास आघाडीकडून रवींद्र धंगेकरांना उमेदवारी देण्यात आली आहे. दोघांमध्ये तगडी लढत होणार आहे. त्यात वसंत मोरेदेखील लोकसभा निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहे. मात्र त्यापूर्वीच पुण्यातील प्रसिद्ध वाडेश्वर कट्ट्यावर तीघेही एकत्र आले. एरवी एकमेकांवर ताशेरे ओढणारे मोहोळ आणि धंगेकर यांच्यात एकत्र बसून पुण्यातील विविध विषयांवर गप्पा रंगल्या. येत्या निवडणुकीत एकमेकांच्या विरोधात उभे ठाकलेले उमेदवार कट्ट्यावर एकत्र पाहायला मिळाले.
पुणेकांच्या समस्या सोडवणार
या कट्ट्यात अनेक राजकीय चर्चा रंगल्याच मात्र पुणेकरांच्या समस्यांवरदेखील चर्चा झाली. राजकारण करताना पुणेकरांच्या समस्यांकडे दुर्लक्ष झाल्याचं आतापर्यंत दिसलं आहे. वाहतूक कोंडी, प्रदुषण, पाण्याच्या समस्या अशा अनेक समस्या सध्या पुणेकरांना आहेत. याच समस्यांवर काम करणार आणि निवडणूकीत हेच मुद्दे हायलाईट करणार असल्याचं मुरलीधर मोहोळ आणि रवींद्र धंगेकरांनी सांगितलं आहे.