Pune Lonavala Accident News: दोन वर्षाच्या मुलाचा बुडून मृत्यू प्रकरणी लोणावळ्यात सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल
13 जुलै रोजी आपल्या दोन मुलांचा वाढदिवस साजरा करण्यासाठी पवार कुटुंबासह तुंगार्ली येथील पुष्पा व्हिला बंगल्यावर आले होते. स्विमिंग पूलमध्ये खेळण्यासाठी गेला. त्यात त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला होता.
Pune Lonavala Accident News: लोणावळा शहर पोलिसांनी 13 जुलै रोजी घडलेल्या दोन वर्षांच्या मुलाच्या बुडण्याच्या घटनेबाबत अखेर गुन्हा दाखल केला आहे. पुष्पा व्हिला या खाजगी बंगल्यातील स्विमिंग पुलात शिवबा या लहान मुलाचा बुडून मृत्यू झाला. त्याच्या वाढदिवसालाच त्याचा मृत्यू झाल्याने सगळीकडे हळहळ व्यक्त झाली. या घटनेसाठी लोणावळा शहर पोलिसांनी सहा जणांना जबाबदार धरून भारतीय दंड संहितेच्या कलम 304 (अ), 35 अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
मृताचे वडील अखिलकुमार नारायणराव पवार यांनी लोणावळा पोलिसात फिर्याद दिली. ही घटना घडली तेव्हा पुष्पा बंगल्याचे मालक प्रमोद काशिनाथ बहाळकर, नरेशकुमार मुरलीधर भोजवानी, राजेश निंबाळे आणि इतर तीन लोक हॉलमध्ये उपस्थित होते. 13 जुलै रोजी आपल्या दोन मुलांचा वाढदिवस साजरा करण्यासाठी पवार कुटुंबासह तुंगार्ली येथील पुष्पा व्हिला बंगल्यावर आले होते. स्विमिंग पूलमध्ये खेळण्यासाठी शिवबा पाण्याच्या दिशेने गेला आणि पीलमध्ये पडला. त्यात त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला होता.
स्विमिंग पूल कळीचा मुद्दा
खासगी बंगल्यांमधील स्विमिंग पूल हा कळीचा मुद्दा बनला आहे. ती अधिकृत की अनधिकृत, नगरपरिषद आणि पीएमआरडीए लवकरात लवकर तपासून पाहतील, आवश्यक तेव्हा पोलिस कारवाई करतील. मात्र स्विमिंग पूलमध्ये अपघात होऊ नयेत, यासाठी बंगले मालक आणि त्यांच्या चालकांनीही काही नियम करणे गरजेचे आहे. या व्यवसायावर कायदेशीर बंधने येण्यापूर्वी पर्यटकांनी स्वत:वर बंधने घालावीत. जागरूक नागरिकांनी ओळखपत्र तपासल्याशिवाय कोणालाही बंगला भाड्याने देऊ नका, असं आवाहन प्रशासनाने केलं आहे.
दोन अपघातात दोघांचा मृत्यू
लोणावळ्यात गेल्या पंधरा दिवसांत दोन ठिकाणी दोन अपघात झाले. त्यात दोन मुलांना आपला जीव गमवावा लागला आहे. या घटनांमुळे शहराच्या पर्यटन उद्योगाला गालबोट लागलं आहे. आठवडाभरापूर्वी आपटी येथील एका खासगी बंगल्यात क्रिकेट सामन्यावर सट्टा लावणारे सापडले होते. यापूर्वी लोणावळा आणि परिसरातील खासगी बंगल्यांमध्ये जुगार, सट्टा, पार्ट्या करणाऱ्यांना पकडण्यात आले आहे.