एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
दाभोलकर-गौरी लंकेश हत्येसाठी एकच पिस्तूल, सीबीआयचा दावा
सचिन अंदुरेच्या पोलिस कोठडीत 30 ऑगस्टपर्यंत वाढ करण्यात आली आहे.
पुणे : सचिन अंदुरेचा मेव्हणा शुभम सरोळेकडून जप्त करण्यात आलेल्या पिस्तुलातूनच गौरी लंकेश यांची हत्या करण्यात आली, असा खळबळजनक दावा सीबीआयने केला आहे. सचिन अंदुरे हा डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्या प्रकरणी अटकेत आहे. त्याची पोलिस कोठडी 30 ऑगस्टपर्यंत वाढवण्यात आली आहे.
सचिन अंदुरेच्या मेहुण्याकडून काळ्या रंगाचं देशी बनावटीचं पिस्तूल जप्त करण्यात आलं आहे. गौरी लंकेश हत्या प्रकरणात हेच पिस्तूल वापरण्यात आलं होतं, त्या संदर्भात अधिक तपास करायचा आहे, असं सीबीआयच्या वकिलांनी सांगितलं.
गौरी लंकेश यांच्या हत्येनंतर आरोपींनी हत्येसाठी वापरलेले पिस्तुल आणि तीन बुलेट्स सचिन अंदुरेकडे दिल्या. अंदुरेने ते पिस्तुल आपला मेव्हणा शुभम सरोळेकडे 11 ऑगस्टला दिलं. शुभमने ते रोहित रेगेकडे दिलं. रोहित रेगेकडून ते सीबीआयने जप्त केलं, असं आतापर्यंत अंदुरेकडे केलेल्या चौकशीत सीबीआयला आढळलं.
सचिन अंदुरे आणि शरद कळसकर यांची कोठडी संपत आल्याने त्यांना पुण्यातील शिवाजीनगर कोर्टात हजर करण्यात आलं होतं, त्यावेळी सीबीआयने हा दावा केला. अंदुरे आणि कळसकर या दोघांची एकत्रितपणे चौकशी करायची आहे, त्यामुळे कोठडी वाढवून देण्याची मागणी सीबीआयने केली होती.
सीबीआय कोठडी दरम्यान दाभोळकर हत्येप्रकरणी काहीच तपास झालेला नाही. तपास झाला असेल तर त्याचा प्रगती अहवाल सीबीआयने सादर करावा. त्यामुळे सीबीआय कोठडी न देता न्यायालयीन कोठडीत देण्यात यावी, अशी मागणी आरोपीच्या वकिलांनी केली होती.
शरद कळसकरची एटीएसकडे असलेली पोलिस कोठडी 28 ऑगस्टला संपत आहे. त्यानंतर सीबीआय कळसकरला अटक करणार आहे.
अमोल काळेची दोन्ही हत्या प्रकरणात महत्त्वाची भूमिका
गौरी लंकेश यांच्या हत्येप्रकरणी आरोपी असलेल्या अमोल काळे आणि राजेश बंगेरे या आरोपींचा दाभोलकर यांच्या हत्येमागे हात आहे. या दोन आरोपींनी दाभोलकरांच्या हत्येसाठी पुण्यात रेकी केली होती. या दोन आरोपींना सीबीआय कर्नाटक एटीएसकडून ताब्यात घेऊन त्यांची चौकशी करणार आहे.
दाभोलकर कुठे जायचे, कुठं उतरायचे, कुणाला भेटायचे याच्यावर अमोल काळे आणि त्याच्या साथीदारांनी नजर ठेवली. अमोल काळे हा मूळचा पिंपरी-चिंचवडचा रहिवासी आहे. अमोल काळे हा गौरी लंकेश यांच्या हत्येतील सूत्रधार असल्याचं कर्नाटक एटीएसने म्हटलं आहे.
दाभोलकर हत्या प्रकरणी कोण कोण अटकेत
मुंबईतील माझगाव डॉकमधून अविनाश पवार नावाच्या व्यक्तीला दहशतवादविरोधी पथकाने शुक्रवारी (24 ऑगस्ट) रात्री बेड्या ठोकल्या. स्फोटक प्रकरणातील ही पाचवी अटक आहे. याआधी वैभव राऊत (9 ऑगस्ट), शरद कळसकर (10 ऑगस्ट), सुधन्वा गोंधळेकर (10 ऑगस्ट) आणि श्रीकांत पांगारकर (18 ऑगस्ट) यांना अटक करण्यात आली होती.
प्रकरण काय आहे?
महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाने 9 ऑगस्टला रात्री नालासोपाऱ्यातील वैभव राऊत या व्यक्तीच्या घरातून मोठ्या प्रमाणात स्फोटकं जप्त केली. भांडारअळीत राहणाऱ्या वैभव राऊतच्या घरातून एटीएसने ही स्फोटकं जप्त केली. महत्त्वाचं म्हणजे वैभव राऊत हा कट्टर हिंदुत्ववादी सनातन संस्थेशी संलग्न आहे. एटीएसने 9 ऑगस्टला रात्री ही धडक कारवाई केली. या धाडीत 8 देशी बॉम्ब मिळाले. तर घरापासून काही अंतरावर असणाऱ्या त्याच्या दुकानात बॉम्ब बनवण्यासाठी लागणारी सामुग्रीही मिळाली असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामध्ये गन पावडर आणि डिटोनेटर यांचा समावेश आहे. या सामुग्रीमध्ये 2 डझन पेक्षा जास्त देशी बॉम्ब बनवले जातात.
सनातन संस्थेशी संबंधित असलेल्या वैभव राऊतच्या घरी इतकी मोठी स्फोटकं कशासाठी एकत्र केली होती, याचा तपास आता एटीएस करत आहे.
एटीएसला वैभव राऊतकडे स्फोटकं असल्याची टिप मिळाली होती. त्यामुळे एटीएसने तीन दिवसांपासून सापळा रचला होता. 9 ऑगस्टला खात्री करुन वैभव राऊतच्या घरी धाड टाकली असता, एटीएसला स्फोटकांचा साठा आढळला. पोलिसांनी वैभवाला ताब्यात घेऊन अधिक चौकशी सुरु केली आहे.
एटीएसने या कारवाईनंतर डॉग स्कॉड, फॉरेन्सिक टीम यांनाही बोलावून तपासणीही केली. एटीएसच्या अधिकाऱ्यांनी रात्रभर वैभव राऊतच्या घरी सर्च ओपॅरेशन केलं. मिळालेले बॉम्ब, त्यासाठी लागणारी सामुग्री ही कुठून आणली, हे बॉम्ब कशासाठी बनवले जात होते, याचा सर्व तपास आता सुरु आहे.
वैभव राऊतकडे काय काय सापडलं?
12 देशी बॉम्ब
2 जिलेटीन कांड्या
4 इलेक्ट्रॉनिक डिटोनेटर
22 नॉन इलेक्ट्रॉनिक डिटोनेटर
सेफ्टी फ्यूज वायर
1500 ग्राम पांढरी पावडर
विषाच्या एक लिटरच्या दोन बाटल्या
6 व्होल्टच्या 10 बॅटरींचा बॉक्स
बॅटरी कनेक्टर
कन्व्हरसह अन्य साहित्य
डॉ. दाभोलकर हत्या प्रकरणाचे धागेदोरे
नालासोपारा शस्त्रसाठा प्रकरणी अटकेत असलेल्यांची चौकशी करत असताना पाच वर्षांपूर्वीच्या डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्या प्रकरणाचे धागेदोरेही हाती लागले.
नालासोपाऱ्यात सापडलेल्या स्फोटक प्रकरणाचा तपास करताना एटीएसला डॉ. दाभोलकर हत्या प्रकरणाचे धागेदोरे मिळाले. शरद कळसकरच्या चौकशीतून सचिन अंदुरेचं नाव समोर आलं. सचिन अंदुरे आणि शरद कळसकर हे दोघे मित्र आहेत. सीबीआयने सचिन अंदुरेला अटक केली आहे. सचिन अंदुरेचा गुन्ह्यातील सहभाग लक्षात आल्यानंतर एटीएसने त्याला अटक करुन सीबीआयकडे सोपवलं.
नालासोपारा स्फोटक प्रकरणात एटीएसच्या ताब्यात असलेल्या तिघांपैकी (वैभव राऊत, सुधन्वा गोंधळेकर आणि शरद कळसकर) शरद कळसकरने डॉ. दाभोलकरांच्या हत्येत सहभागाची कबुली दिली आहे, अशी माहिती एटीएसकडून देण्यात आली.
अमोल काळे कोण आहे?
अमोल काळे हा 48 वर्षीय असून, तो पुण्याच्या माणिक कॉलनीतील अक्षय प्लाझातील रहिवासी आहे. पत्नी जागृती, पाच वर्षांचा मुलगा, म्हातारी आई यांच्याबरोबर पुण्यातील घरी अमोल राहत असे. वडिलांचं पानाची दुकान होतं, काही महिन्यांपूर्वी वडिलांचा मृत्यू झाला. अमोल काळेचं डिप्लोमापर्यंतचं शिक्षण झालं असून, स्पेअर पार्टस पुरवण्याचा धंदा करत होता. कधी कधी धार्मिक पुस्तकांची विक्रीही अमोल काळे करायचा.
वीरेंद्र तावडे कोण आहे?
वीरेंद्र तावडे हा पेशाने डॉक्टर असून, कान, नाक आणि घशाचा तज्ज्ञ आहे. पनवेलमधल्या सनातनच्या आश्रमात तीन वर्षांपासून साधकांची आरोग्यसेवा करतो. 15 वर्षांपासून सनातनचा साधक आहे. वीरेंद्र तावडे सीबीआयच्या ताब्यात आहे.
सचिन अंदुरे कोण आहे?
सचिन अंदुरे नालासोपारा स्फोटक प्रकरणातील आरोपी शरद कळसकर याचा मित्र आहे. सचिनचे आई-वडील हयात नाहीत. पत्नी आणि एक मुलगी असा त्याचा परिवार आहे. सचिन औरंगाबादमधील राजबाजार कुवारफल्ली भागात भाड्याच्या घरात गेल्या 10 महिन्यांपासून राहत होता. निराला बाजार भागात कपड्याच्या दुकानात सचिन काम करतो. 14 ऑगस्ट रोजी एटीएसने सचिन अंदुरेला निरालाबाजार येथून अटक केली. ज्या दिवशी अटक केली, त्या दिवसापासून त्याच्या घराला कुलूप आहे.
शरद कळसकर कोण आहे?
शरद कळसकर मूळचा औरंगाबादमधील केसापुरीचा रहिवासी आहे. औरंगाबादच्या विवेकानंद महाविद्यालयात बारावीपर्यंतचं शिक्षण घेतल्यानंतर त्याने शिक्षण सोडलं. गेल्या पाच वर्षांपासून कोल्हापुरात लेथ मशीनवर काम करत असल्याचं घरी शरदने सांगितले होते. वडिलांकडे सहा एकर शेती आहे. शरदला पुणे, सोलापूर, सातारा, नालासोपाऱ्यात घातपाताच्या आरोपाखाली अटक करण्यात आली असून, डॉ. नरेंद्र दाभोलकरांची हत्या केल्याची कबुलीही शरदने दिली आहे.
संबंधित बातम्या
नालासोपारा स्फोटकांप्रकरणी पाचवी अटक, मुंबईतून एकाला बेड्या
दाभोलकर, गौरी लंकेश हत्या: चिखलेतील जंगलात आरोपींना ट्रेनिंग?
अमोल काळे, वीरेंद्र तावडे हेच दाभोलकरांच्या हत्येचे मास्टरमाईंड : सीबीआय
डॉ. दाभोलकर हत्या प्रकरण : सीबीआयच्या पहिल्या आरोपपत्रावरुन नवा वाद
डॉ. दाभोलकर हत्या प्रकरण : दिवसभरात औरंगाबादमध्ये काय-काय घडलं?
दाभोलकर हत्या : अंदुरेच्या नातेवाईक-मित्राच्या घरातून शस्त्रसाठा जप्त
गौरी लंकेश हत्या प्रकरणातील आरोपीच्या डायरीत आणखी सहा नावं : सूत्र
डॉ. दाभोलकर हत्या प्रकरण : आरोपी सचिन अंदुरेला 7 दिवसांची पोलिस कोठडी
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
निवडणूक
राजकारण
महाराष्ट्र
Advertisement