Pune : पुण्यातील गँगस्टर शरद मोहोळ सहा महिन्यांसाठी तडीपार, पोलीस उपायुक्तांचा आदेश
Sharad Mohol : पुण्यातील कुख्यात गुंड म्हणून शरद मोहोळची ओळख आहे. शरद हिरामण मोहोळ यांच्या विरोधात पुणे शहर, पिंपरी तसेच ग्रामीण भागात गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत
पुणे : पुण्यातील गँगस्टर आणि कोथरूड भागात दहशत असलेला गुंड शरद मोहोळला शहरातून तडीपार करण्याचे आदेश पोलिस उपायुक्त पौर्णिमा गायकवाड यांनी दिले आहे. शहरातील सार्वजनिक शांतता आणि सुव्यवस्थेला बाधा निर्माण करण्याची शक्यता आहे त्यामुळे हे आदेश देण्यात आले आहे.
पुण्यातील कुख्यात गुंड म्हणून शरद मोहोळची ओळख आहे. शरद हिरामण मोहोळ (वय 38, रा. माऊलीनगर, सुतारदरा, कोथरूड) यांच्या विरोधात पुणे शहर, पिंपरी तसेच ग्रामीण भागात गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. टोळीयुद्धातून गणेश मारणे टोळीतील पिंटू मारणे याचा खून नीलायम चित्रपटगृहाजवळ एका हॉटेलमध्ये शरद मोहोळ आणि साथीदारांनी केला होता. या गुन्ह्यात न्यायालयाने मोहोळला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. या प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने मोहोळला गेल्या वर्षी जामीन मंजूर केला होता.
कारागृहाबाहेर आल्यानंतर मोहोळ आणि साथीदारांची टोळी शहरात आपली दहशत निर्माण करण्यासाठी पुन्हा सक्रिय झाली. काही महिन्यापासून मोहोळ टोळीचे गुंड सदस्य सक्रिय झाल्याने पोलिसांची डोकेदुखी वाढली होती मात्र आता हे गुन्हे दाखल झाल्या नंतर मोहोळ टोळीच्या कारवाया मंदावल्या आहेत तर शेलार टोळीतील सदस्यही पसार झाले असल्याची माहिती समोर येत आहे.
कोण आहे शरद मोहोळ?
शरद मोहोळ हा संशयित दहशतवादी कातिक सिद्दीकीच्या हत्या प्रकरणातील आरोपी आहे. जर्मन बेकरी स्फोटाच्या वेळेस दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराजवळ बॉम्ब ठेवण्याचा प्रयत्न करणारा संशयित दहशतवादी कातिल सिद्दीकीलाअंडासेलमध्ये गळा आवळून फास दिल्याचा आरोप होता. मात्र पुराव्याअभावी शरद मोहोळ याची निर्दोष मुक्तता केली.
तडीपार कधी केले जाते?
एखादा गुन्हेगार शहरात गुन्हे करण्याचे थांबवत नसेल तर त्याला तडीपार केले दाते. शरद मोहोळला पुढील सहा महिने पुणे आयुक्तालयाच्या हद्दीत सहा महिने प्रवेश करण्यास सक्त मनाई आहे.
संबंधित बातम्या :