Pune News: पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर सतर्क राहण्याच्या सूचना; पुणे पोलिसांनी लॉज मालकांना केलं आवाहन, परदेशी नागरिकांच्या....
Pahalgam terror attack security impact : पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर पुणे पोलिसांनी लॉज मालकांसोबत बैठक घेऊन सर्व ग्राहकांची कागदपत्रे तपासण्यास सांगितले असून सीसीटीव्ही सुरक्षेची सूचना दिली आहे.

पुणे: सुरक्षेच्या दृष्टिकोनातून पुणे पोलिसांच्या लॉज मालक आणि चालक यांना सूचना देण्यात आल्या आहेत. लॉज येथे रहावयास येणारे सर्व ग्राहकांची कागदपत्रे व्यवस्थितपणे तपासून रजिस्टरमध्ये नोंद करा अशी महत्त्वाची सूचना पोलिसांनी लॉजचे मालक- चालक यांना करण्यात आली आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या अनुषंगाने सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून हडपसर पोलीस स्टेशन हद्दीतील लॉजचे मालक चालक यांची बैठक घेण्यात आली होती.
पुणे पोलिसांच्या परिमंडळ 5 कडून हडपसर पोलीस स्टेशन हद्दीतील लॉज मालक आणि अधिकारी यांची बैठक पार पडली. लॉजवर राहण्यासाठी येणारे परदेशीय नागरिक यांचे सी फॉर्म भरून त्यांचे पासपोर्ट व व्हिजा यांच्या कॉपी घेऊन त्या रजिस्टरला नोंद करावी अशा सूचना पोलिसांकडून देण्यात आल्या आहेत. लॉजचे प्रवेशद्वारावर व सभोवती येणारे जाणारे रस्ते कव्हर होतील अशा पद्धतीने एचडी व नाईट विजन कॅमेरे बसवण्यात यावेत अशा सूचना पोलिसांनी दिल्या आहेत. लॉजमध्ये संशयित इसम आढळून आल्यास तात्काळ पोलीस कंट्रोल रुमला कळवा, असं आवाहन पोलिसांनी केलं आहे.
पुणे पोलिसांच्या परिमंडळ 5 पोलीस उपयुक्त राजकुमार शिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार, पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर हडपसर पोलीस ठाण्यात या अंतर्गत येणाऱ्या सर्व लॉजच्या मालक आणि चालक यांच्यासोबत काल आम्ही बैठक घेतली. या बैठकीत आम्ही त्यांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत. त्या त्यांनी पाळणं बंधनकारक आहे, याबाबत माहिती दिली. त्यांच्या लॉजमध्ये येणारे सर्व नागरिकांची कागदपत्र तपासूनच त्यांना प्रवेश द्यावा तसेच परदेशी नागरिकांच्या प्रवेशाबद्दल सुद्धा त्यांचे सर्व कागदपत्र आणि पासपोर्ट सोबत असलेला व्हिजाची पडताळणी करून घेतल्यानंतरच त्यांना प्रवेश दिला जाईल याची खात्री करावी," असंही पोलिसांनी यावेळी म्हटलं आहे.
पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यांमध्ये 26 पर्यटकांचा मृत्यू झाला होता. यामध्ये महाराष्ट्रातील 6 जणांचा मृत्यू झाला आहे. यानंतर केंद्र सरकारने पाकिस्तानी नागरिकांचे सर्व शॉर्ट टर्म व्हिजा रद्द केले होते. याच पार्श्वभूमीवर पुण्यातील तीन पाकिस्तानी नागरिकत्व असणाऱ्यांना आता परत पाठवण्यात आला आहे. हे तिन्ही पाकिस्तानी नागरिक पुण्यातील कोंढवा परिसरात काही दिवसांपासून वास्तव्यास होते. यातील एक जण हा त्याच्या नातेवाईकाकडे राहण्यासाठी आला असल्याचं समोर आलं आहे.
























