Pune News : पुण्यात बिहारसारख्या घटना? आयटी इंजिनिअरच्या कारवर दुचाकीस्वारांच्या जमावाचा हल्ला, व्हिडीओ व्हायरल
Pune News : अभियंता आणि त्यांच्या पत्नीला २९ सप्टेंबरच्या पहाटे एक भयानक अनुभव आला, जेव्हा काही मोटरसायकलवरून आलेल्या पुरुषांनी त्यांच्या कारचा पाठलाग केला आणि कारवर लोंखडी रॉडने हल्ला करत कारचे नुकसान केले.
पुणे: गेल्या काही दिवसांमध्ये पुण्यात अनेक गुन्हेगारीच्या घटना समोर येत आहेत, खून, हत्या, महिलांवरील अत्याचार या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाली असतानाच आता आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. रात्रीच्या वेळी आपल्या कुटूंबासोबत चार चाकी वाहनाने प्रवास करणाऱ्या एका आयटी अभियंत्याच्या कारवर दुचाकीस्वारांनी हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अभियंता आणि त्यांच्या पत्नीला २९ सप्टेंबरच्या पहाटे एक भयानक अनुभव आला, जेव्हा काही मोटरसायकलवरून आलेल्या पुरुषांनी त्यांच्या कारचा पाठलाग केला आणि कारवर लोंखडी रॉडने हल्ला करत कारचे नुकसान केले. नांदे गावाजवळ त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. सुस येथील त्यांच्या घरी पोहोचेपर्यंत दोघांचा पाठलाग करण्यात आला. आयटी अभियंत्याने नंतर पौड पोलीसांशी संपर्क साधला आणि तक्रार दाखल केली. या घटनेचा थरारक व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे.(Pune Crime)
नेमकं काय घडलं?
आयटी अभियंता असलेले रवी करनानी यांनी आपल्या सोशल मिडिया एक्स अकाउंटवरती या हल्ल्याचा थरारक व्हिडिओ शेअर केला आहे. करनानी हे सूसगाव येथील रहिवासी आहेत. करनानी आपल्या पत्नीसोबत प्रवास करत असताना त्यांच्यावर दुचाकीस्वारांनी हातात लोखंडी रॉड घेऊन हल्ला केला. कारचे हल्ल्यात मोठे नुकसान झाले आहे, हल्ला करणारा जमाव दिसत आहे. या जमावाने करनानी यांना त्यांची कार थांबवण्यासाठी पाठलाग केला. करनानी हे आपल्या कुटुंबासह कारमधून प्रवास करत असताना त्यांच्यासोबत ही घटना घडली.(Pune Crime)
We were attacked !!!
— Ravi Karnani (@_ravi_karnani) September 30, 2024
There were total of 40 people in different pockets with Iron Rods, Stones and Sticks who were attacking our car, with 2 bikes and a car filled with Local goons chasing us at a speed of 80kmpl !!!
The local Police took their side stating they were patrolling pic.twitter.com/YVlUJlmdLY
ही घटना लवाळे-नांदे मार्गावर ही घटना घडली. दोन बाईकस्वार आणि एका कारने त्यांच्या कारचा पाठलाग केला, कारवर हल्ला करत त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला. करनानी यांनी कार थांबवण्यास नकार दिल्यानंतर बाईकस्वारांनी त्यांच्या कारवर हातातील लोंखडी रॉडने हल्ला केला. त्यानंतर काही जणांनी लाठी, लोखंडी रॉड, दगडांसह करनानी यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न केला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मिडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. आयटी अभियंता असलेल्या रवी करनानी यांनी नंतर पौड पोलीसांशी संपर्क साधला आणि तक्रार दाखल केली. यानंतर या प्रकरणी पौड पोलिसांनी अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल केला असून तपास सुरू आहे. (Pune Crime)
घटनेचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल
या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनी चिंता व्यक्त केली आहे. या परिसरात कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. स्थानिक पोलिसांवरही या घटनेने प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. तर गेल्या काही दिवसांमध्ये पुण्यात घडत असलेल्या घटनांनी नागरिक संतप्त झाले आहेत. त्यामुळे पोलिसांचा धाकउरला आहे की नाही, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.