Pune: प्रदूषकं शोषून घेणाऱ्या वनस्पतींपासून राम नदीचे पाणी शुद्ध; पुण्यातील एचव्ही देसाई महाविद्यालयाचा नाविण्यपूर्ण प्रयोग
पुण्यातील राम नदीचे पाणी शुद्ध करण्यासाठी एच व्ही देसाई महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी एक नाविण्यपूर्ण प्रयोग राबवला आहे.
पुणे: शहराच्या मध्यवर्ती भागातून वाहणाऱ्या राम नदीचे पाणी शुद्ध करण्यासाठी एच व्ही देसाई महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी एक शक्कल लढवलीय. मायक्रोबायोलॉजीचं शिक्षण घेणाऱ्या या विद्यार्थ्यांनी ज्या वनस्पती पाणी शुद्ध करतात अशा वनस्पतींची लागवड तराफ्यांवर करून असे तराफे पाण्यात सोडले आहेत. या तराफ्यांमुळे पाण्यातील प्रदूषण कमी होण्यास सुरुवात झालीय.
पाईप्सचे तुकडे, नारळाच्या शेंड्या, नायलॉनची जुनी जाळी या टाकाऊ वस्तू एकत्र करून हा आयताकार तराफा तयार करण्यात आलाय. या तराफ्यावर पाणी शुद्ध करणाऱ्या वाळा, खस आणि कर्दळ या वनस्पतींच्या रोपांची लागवड करण्यात आली आहे. असे चार तराफे पुण्यातील राम नदीच्या उगमापाशी पाण्यात सोडण्यात आलेत. हे तराफे आता हळूहळू आपलं काम करू लागलेत. तराफ्यावरील रोपं जस जशी मोठी होतायत तस तसं राम नदीचं प्रदूषित पाणी स्वच्छ होऊ लागलंय.
एच व्ही देसाई महाविद्यालयातील मायक्रोबायोलॉजीची विद्यार्थीनी असलेल्या निधी कुलकर्णी या बद्दल माहिती सांगताना म्हणते की, पाणी स्वच्छ करण्याची ही खूप सोपी आणि परिणामकारक पद्धत आहे. तर प्रदीप जैन या विद्यार्थ्याचा दावा आहे की पाण्यातील जड धातू आणि इतर प्रदूषित घटक या ताराफ्यावर लागवड करण्यात आलेल्या वनस्पती शोषून घेतायत. ज्यामुळे पाण्यातील ऑक्सीजनचे प्रमाण वाढीस लागलय.
पुण्यातील किर्लोस्कर-वसुंधरा संस्थेकडून गेल्या काही वर्षांपासून पुण्यातील रामनदीच्या पुनरुज्जीवनासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी वेगवगेळ्या कल्पना मिळाव्यात यासाठी संस्थेकडून एका स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. किर्लोस्कर वसुंधरा अभियानाचे समन्वयक विरेंद्र चित्राव सांगतात की, या स्पर्धेत पुण्यातील 32 महाविद्यालयांनी भाग घेतला होता. त्यापैकी एच व्ही देसाई महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांच्या या फिरत्या तराफ्यांच्या प्रकल्पाची निवड करण्यात आली. या फिरत्या तराफ्यांबरोबरच राम नदीच्याा काठावर वृक्षारोपण देखील मोठ्या प्रमाणात करण्यात येतय.
पुण्याच्या पश्चिम भागात उगम पावणारी राम नदी बावधन, पाषाण, बाणेर अशा मध्यवर्ती भागातून वीस किलोमीटरचं अंतर पार करत मुळा नदीला जाऊन मिळते. पण ठिकठिकाणी अस्वच्छ पाणी नदीत सोडलं जात असल्याने नदी कमालीची प्रदूषित बनलीय. त्यामुळे या फिरत्या तराफ्यांचा उपयोग संपूर्ण राम नदीत करण्यात येणार आहे.
याआधी नदीच्या पाण्यात जलपर्णीशिवाय कोणतीही वनस्पती आणि प्राणी तग धरू शकत नव्हता. पण आता हे पाणी स्वच्छ होऊ लागल्याने इथल्या पाण्यात मासे सोडण्यात आलेत आणि कमळाच्या बियाही सोडण्यात आल्या आहेत. त्यामुळे येणाऱ्या काळात या नदीचं रूप पालटायला मदत होणार आहे.
पुण्यातील नद्या स्वच्छ करण्यासाठी आतापर्यंत अक्षरश शेकडो कोटी रुपये खर्च करण्यात आले. पण परिणाम आपल्या समोर आहे. एच व्ही देसाई महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी मात्र हे काम अगदी फुकटात करून दाखवलंय. काही दिवसांपूर्वी इथल्या पाण्यात फक्त जलपर्णीचे साम्राज्य होतं आणि या पाण्याच्या जवळपासही कोणी फिरकत नव्हतं. मात्र आता हे पाणी स्वच्छ होतंय. त्यामुळे ही संकल्पना पुण्यातील मुळा-मुठा नद्यांमध्येही राबवायला हरकत नाही.
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha