Pune News : काही क्षणापूर्वी काढलेला कुंडमळा धबधब्यावरील व्हिडीओ ठरला अखेरचा, पाय घसरुन खोल पाण्यात पडून तरुण मृत्यूमुखी
Pune News : पुण्यातील मावळ तालुक्यातील कुंडमळा धबधब्यावर वाहत्या पाण्यात उभं राहिल्याने पाय घसरुन खोल पाण्यात पडल्याने एका तरुणाचा मृत्यू झाला.
Pune News : पावसाळा सुरु झाला की वर्षा पर्यटनालाही सुरुवात होते. अनेक जण आपला मोर्चा धबधब्याकडे (Waterfall) वळवतात. परंतु यावेळी अनेक दुर्घटना देखील घडल्याच्या घटना यापूर्वी घडल्या आहेत. अशीच एक घटना पुण्यातील (Pune) मावळ तालुक्यातील कुंडमळा धबधब्यावर (Kundmala Waterfall) घडली. वाहत्या पाण्यात उभं राहिल्याने पाय घसरुन खोल पाण्यात पडल्याने एका तरुणाचा मृत्यू झाला. ओंकार गायकवाड असं तरुणाचं नाव आहे. विशेष म्हणजे काही क्षणापूर्वी धबधब्यावरील व्हिडीओ अखेरचा ठरला.
वाहत्या पाण्यात पाय घसरला अन्...
टाटा मोटर्सचा कामगार अससेला ओंकार गायकवाड आपल्या मित्रांसोबत वर्षाविहाराचा आनंद घेण्यासाठी कुंडमळा धबधबा इथे आला होता. मात्र वाहत्या पाण्यात उभं राहिल्याने पाय घसरुन तो खोल पाण्यात पडला. यानंतर घटनास्थळी मावळ वन्यजीव रक्षक टीम, स्थानिक ग्रामस्थ आणि आंबी एमआयडीसी पोलिसांकडून वाहून गेलेल्या तरुणाचा शोध घेत आहे. ओंकार गायकवाडने त्याच्या तीन ते चार मित्रांसह कुंडमळा धबधब्यावर जाण्याचा बेत आखला होता. मात्र तोच फिरण्याचा बेत ओंकार गायकवाडच्या जीवावर बेतला आहे.
कसा आहे कुंडमळा धबधबा?
पुण्यापासून 30 किमी अंतरावर असलेलं कुंडमळा हे ठिकाण आसपासच्या लोकांमध्ये फारच प्रसिद्ध आहे. इथली शांतता आणि सौंदर्य पर्यटकांसाठी आकर्षणाचं केंद्र आहे. इंद्रायणी नदीवर छोटा बांध घालण्यात आला असून तिथे लहानसा धबधबा तयार झाला आहे. जोरदार पावसामुळे इथून पाणी वाहू लागतं जे अतिशय नयनरम्य आहे. एका बाजून पाणी वाहून खाली येत असल्याने धबधब्यात भिजण्याच हौस पूर्ण करता येते. कातळात निर्माण झालेल्या खड्ड्यांमुळे बसायला जागा तयार झाल्याने इथे धबधब्याचा आनंद लुटता येतोय
लोणावळ्यात (Lonavala) 24 तासात 108 मिमी पावसाची नोंद
पुण्यातील लोणावळ्यात पावसाने पुन्हा एकदा जोर धरला आहे.गेल्या चोवीस तासांत इथे तब्बल 108 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. गेले चार दिवस लोणावळ्यात पावसाचा जोर कमी झाला होता. मात्र कालपासून पावसाने पुन्हा एकदा बॅटिंग करायला सुरुवात केली आहे. गेल्या वर्षी पेक्षा यंदा पावसाने उशिरा हजेरी लावली आहे. पण आजच्या दिवसापर्यंत 907 मिमी इतका तर यंदा 1067 मिमी इतका पाऊस कोसळला आहे. पावसाने जोर धरल्याने इथल्या वर्षाविहाराचा आनंद लुटण्यासाठी पर्यटकांची ही गर्दी होताना दिसते.
लोणावळ्यातील वर्षाविहारा ऐवजी पोलीस स्टेशनमध्ये बसण्याचा आनंद घ्यावा लागू शकतो?
लोणावळ्यात पर्यटनासाठी जाणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. वर्षाविहाराचा आनंद घेताना तुम्ही हुल्लडबाजी केली तर तुमची आता खैर नसेल. कारण पर्यटनस्थळी आणि परिसरात साध्या वेशात पोलीस तुमच्यावर करडी नजर ठेऊन आहेत. अनेक पर्यटक इथे आल्यावर स्टंटबाजी करताना आढळतात. भुशी धरण, धबधबे अशा ठिकाणी पर्यटक स्वतःचे जीव धोक्यात घालतात, नको ते प्रयोग करतात. तसेच चारचाकी वाहनांतून प्रवास करताना विविध चाळे करताना आढळतात. हे असे उपद्वव्याप करणाऱ्या पर्यटकांना वर्षाविहाराऐवजी थेट पोलीस स्टेशनमध्ये बसून आनंद घ्यावा लागू शकतो.
हेही वाचा