Vallabh Benke Passes Away : पवार कुटुंबियांचे निकटवर्तीय माजी आमदार वल्लभ बेनके यांचे दीर्घ आजाराने निधन; 74 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
पुणे जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार वल्लभ बेनके यांचे निधन झाले आहे. गेल्या काही महिन्यांपासून त्यांची प्रकृती खालावलेली होती. ते 74 वर्षांचे होते.
पुणे : पुणे जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार वल्लभ बेनके (Vallabh Benke Death) यांचे निधन झाले आहे. गेल्या काही महिन्यांपासून त्यांची प्रकृती खालावलेली होती. ते 74 वर्षांचे होते. जुन्नर विधानसभेचे त्यांनी अनेक वर्षे विधानसभेत प्रतिनिधित्व केलं होतं. जुन्नरचे विद्यमान आमदार अतुल बेनके यांचे ते वडील होते. वल्लभ बेनके हे पवार कुटुंबियांचं निकटवर्तीय मानले जायचे. बऱ्याच महिन्यांपासून त्यांच्यावर उपचार सुरु होते. आज अखेर रात्री चाकण येथील खासगी रूग्णालयात त्यांची प्राणज्योत मालवली.
सोमवारी (ता.12) सायंकाळी चार वाजता हिवरे बुद्रुक(ता. जुन्नर ) येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. जुन्नर विधानसभा मतदार संघातून सलग सहावेळा (1985 ते 2009) निवडणूक लढवून त्यातील चार वेळा ते निवडणूक जिंकले होते.
शेतकरी, कष्टकऱ्यांसाठी लढणारा संवेदनशील नेता हरपला; अजित पवार
'राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी आमदार वल्लभशेठ बेनके यांच्या निधनामुळे शेतकरी, कष्टकऱ्यांसाठी लढणारं, जुन्नर तालुक्यासह पुणे जिल्ह्याच्या विकासात महत्त्वाची भूमिका बजावणारं कर्तृत्ववान नेतृत्व हरपलं आहे. पुणे जिल्ह्याच्या राजकीय, सामाजिक, सहकार क्षेत्राची मोठी हानी झाली आहे, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या शोकसंदेशात म्हणतात की, जुन्नर तालुक्याचे माजी आमदार वल्लभशेठ बेनके यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. वल्लभशेठ बेनके हे 1985 साली प्रथम जुन्नर विधानसभेवर निवडून आले होते, त्यानंतर 1990 मध्ये दुसऱ्यांदा ते आमदार झाले. वर्ष 2004 व 2009 मध्ये पुन्हा त्यांनी जुन्नर मतदारसंघाचे विधानसभेत प्रतिनिधित्व केले. परखड वक्तव्य व प्रशासनावर असलेली पकड यामुळे त्यांचा संपूर्ण पुणे जिल्ह्यात दरारा होता. कार्यकर्त्यांचा आधार असणाऱ्या वल्लभशेठ बेनके यांच्या निधनामुळे आमदार अतुल बेनके आणि त्यांच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. आमदार अतुल बेनके आणि कुटुंबीयांच्या तसेच त्यांच्या कार्यकर्त्यांच्या दुःखात मी आणि संपूर्ण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सहभागी आहे. स्वर्गीय वल्लभशेठ बेनके यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो', अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या शोक भावना व्यक्त केल्या आहेत
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी आमदार वल्लभशेठ बेनके यांच्या निधनानं शेतकरी, कष्टकऱ्यांसाठी लढणारं, जुन्नर तालुक्यासह पुणे जिल्ह्याच्या विकासात महत्त्वाची भूमिका बजावणारं कर्तृत्ववान नेतृत्व हरपलं आहे. पुणे जिल्ह्याच्या राजकीय, सामाजिक, सहकार क्षेत्राची मोठी हानी झाली आहे. मी… pic.twitter.com/MBvmoJnPY6
— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) February 11, 2024