Pune- Chakan News : पुण्यातील चाकण परिसरातील संग्रामदुर्ग किल्ल्याच्या अतिक्रमणावर हातोडा
पुण्यात अतिक्रमण हटवण्याचा धडाका सुरु आहे. पुण्यातील चाकण जवळील संग्रामदुर्ग किल्ल्यावरील अतिक्रमण हटवण्यात आलं आहे. ऐतिहासिक किल्ल्यावर केलेल्या अनधिकृत बांधकाम हटवण्यात आलं आहे.
Pune- Chakan News : पुण्यात (Pune) अतिक्रमण हटवण्याचा धडाका सुरु आहे. पुण्यातील चाकण जवळील संग्रामदुर्ग किल्ल्यावरील (Sangramdurga Fort) अतिक्रमण हटवण्यात आलं आहे. ऐतिहासिक किल्ल्यावर केलेल्या अनधिकृत बांधकाम बाधा ठरत होतं. त्यामुळे पुरातत्व विभागाकडून ही कारवाई करण्यात आली आहे. पोलिसांच्या उपस्थितीत हे बांधकाम हटवण्यात आलं आहे. बुधवारी (9 नोव्हेंबर) ही कारवाई करण्यात आली.
संग्रामदुर्ग किल्ला चाकण परिसरातील ऐतिहासिक वास्तू आहे. या किल्ल्यावर पत्राशेड टाकण्यात आलं होतं. हे पत्राशेड या वास्तूला बाधा निर्माण करत होतं. हे पत्राशेड आणि या परिसरात असलेलं अतिक्रमण हटवणं गरजेचं आहे, अशी मागणी या किल्ल्याची किल्लेदार फिरंगोजी नरसाळा स्मारक प्रतिष्ठानच्या वतीने पुरातत्व विभागाकडे करण्यात आली होती.. अखेर नगर परिषद आणि पिंपरी-चिंचवड पोलीस यांच्या पाठिंब्याने हे अतिक्रमण बुधवारी हटवण्यात आलं आहे.
पुण्यात आणि पिंपरी-चिंचवडमध्ये अतिक्रमण विभागाने कारवाईचा धडाका सुरु केला आहे. अनेक ठिकाणी अतिक्रमणाच्या कारवाई होताना पहायला मिळत आहेत. पुण्याजवळील अनेक किल्ल्यावर अनधिकृत बांधकाम आणि फेरीवाले असतात. त्यांच्यामुळे ऐतिहासिक वास्तुला बाधा निर्माण होते. वास्तूचं सौंदर्य देखील राखण्यास या अतिक्रमणाचा बाधा येते. त्यामुळे अशा ऐतिहासिक वास्तुंवरील अतिक्रमण हटवण्याची कारवाई सातत्याने होताना दिसत आहे.
इतिहासप्रेमींच्या तक्रारीच तक्रारी
ऐतिहासिक वास्तुंवर किंवा त्या परिसरात अनेक ठिकाणी अनधिकृत बांधकाम बघायला मिळतात. लहान-मोठ्या व्यावसायिकांनी हा परिसर सतत व्यापलेला असतो. व्यावसायिकांचा यात फायदा होतो मात्र त्यामुळे ऐतिहासिक वास्तुंचं नुकसान होतं. शिवाय वास्तुंचं सौंदर्य देखील झाकोळलं जातं. त्यामुळे इतिहासप्रेमी सतत पुरातत्व विभागाकडे तक्रारी करतात. त्यांच्या तक्रारीनुसार अनेकदा पाहणी केली जाते आणि अनधिकृत किंवा सौंदर्याला बाधा आणणाऱ्या बांधकामांवर कारवाई केली जाते.
वाकड, बाणेर परिसरात अतिक्रमणावर हातोडा
पिंपरी-चिंचवड परिसरातील बाणेर आणि वाकडमध्येही अतिक्रमणाच्या मोठ्या प्रमाणात कारवाई सुरु आहे. काही दिवसांपूर्वी बाणेर रोड परिसरात दुकांनासमोरील अनधिकृत बांधकाम आणि शेडवर मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात आली होती. पूर्वी या सगळ्या व्यावसायिकांना माहिती देण्यात आली होती. मात्र व्यावसायिकांनी माहितीकडे दुर्लक्ष केल्याचं समोर आलं होतं. वारंवार सांगूनही व्यावसायिकांना दुकानाबाहेरील शेड काढले नव्हते त्यानंतर अतिक्रमण विभागाने कडक कारवाई करत शेड हटवले होते. वाकड परिसरात फर्निचरच्या दुकानांच्या व्यावसायिकांनी सोयीनुसार अनधिकृत बांधकाम करुन आपला व्यावसाय सुरु केला आहे. त्यांच्यावर देखील काल कारवाई करण्यात आली. मोठ्या-मोठ्या फर्निचरचे दुकानं पाडण्यात आली.