(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Pune News: वरसगाव धरणाच्या भिंतीवर आढळली मगर; नागरिकांना सतर्कतेचं आवाहन
Pune News: वरसगाव धरणाच्या भिंतीवर मंगळवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास मगर दिसली आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांना देखील सतर्कतेचे आवाहन करण्यात आले आहे.
Pune News: पुण्यातील वरसगाव धरणातील (varasgaon dam) भिंतीवर काल (मंगळवारी) मोठी मगर आढळली आहे. वरसगाव धरणाच्या (varasgaon dam) भिंतीवर मंगळवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास ही मगर दिसली आहे.
रात्री दहा वाजण्याच्या सुमारास धरणावरील सुरक्षा मंडळाचे कर्मचारी, राहूल जाधव आणि कुणाल बोराडे पाण्याची पातळी पाहण्यासाठी भिंतीवरून जात असताना त्यांना अंधारात समोर हालचाल झाल्याचे दिसून आले. त्यांनी विजेरीच्या उजेडात पाहिले असता त्यांना मोठी मगर असल्याचे दिसून आले. ती मगर धरणाच्या (varasgaon dam) भिंती लगत असलेल्या सुरक्षा चौकीच्या दिशेने येत होती. त्यांनी मोटारीच्या दिव्यांच्या प्रकाशात तिला पाहिले त्यानंतर मगरीने दिशा बदलली आणि ती पुढे धरणाच्या भिंतीवरून जाऊ लागली.
वन विभागाचे अधिकारी कर्मचारी व रेस्क्यू टीम रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास घटनास्थळी पोहोचली. ते मगरीच्या हालचालीवर लक्ष ठेवून आहेत. पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांना पाण्याची पातळी पाहण्यासाठी धरणाच्या भिंतीवर जावे लागते. त्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे..
सध्या पुण्यासह परिसरात मुसळधार पाऊस (Pune Heavy Rain) कोसळत आहे, त्यामुळे सातत्याने पाण्याची पातळी वाढते ते पाहण्यासाठी येथे जावे लागते. मगर सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या चुकीच्या दिशेनेच येत होते. हे धोकादायक असल्याने मगरीला तिला पकडून पाण्यात टाकावी, असे वनविभागाला सांगितले.
धरण पाणलोट क्षेत्रात पावसाची उघडीप
पानशेत, वरसगाव धरणक्षेत्रात मंगळवारी सकाळच्या पावसानंतर दिवसभर पावसाने विश्रांती घेतली. पाण्याची आवक मंदावल्याने टेमघर वगळता तिन्ही धरणांचा विसर्ग बंद करण्यात आला आहे. खडकवासला धरणसाखळीत सायंकाळी पाच वाजता 26.54 टीएमसी (91.06टक्के) इतका पाणीसाठा झाला होता. वरसगाव धरणाचा सांडवा सोमवारी (दि. 5) दुपारपासून बंद करण्यात आला आहे, तरखडकवासलातील विसर्ग रात्री नऊनंतर बंद करण्यात आला.