Pune news : पुणे विद्यापीठात अश्लील रॅपचं शुटींग करणाऱ्या रॅपरवर गुन्हा दाखल; कारवाई कधी होणार?
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मुख्य इमारतीत आणि ज्या ठिकाणी विद्यापीठाची अधिसभा भरते तिथे अश्लील भाषेतील रॅपचं कुलगुरुंच्या खुर्चीवर बसून शूटिंग केल्याच समोर आलं आहे.

Pune news : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या (Pune Crime News) मुख्य इमारतीत आणि ज्या ठिकाणी विद्यापीठाची अधिसभा भरते तिथे अश्लील भाषेतील रॅपचं शूटिंग केल्याच समोर आलं आहे. ज्या खुर्चीवर कुलगुरु बसतात त्या खुर्चीवर बसून आणि समोरच्या टेबलवर दारुची बाटली ठेवून शुभम जाधव नावाच्या रॅपरने हे रॅप सॉंग शुट केलं. त्यामुळे विद्यापीठ प्रशासनातील व्यक्तींकडून शुभमला हे रॅप सॉंग तयार करण्यासाठी मदत करण्यात आल्याच स्पष्ट झालं आहे. त्याच्यावर चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला असला तरी त्याच्यावर कारवाई झालेली नाही. त्याचबरोबर शुभमला मदत करणाऱ्या विद्यापीठ प्रशासनातील संबंधितावर देखील कारवाई करण्याची मागणी होत आहे.
काही दिवसांपूर्वी शुभमच्या रॅप सॉंगचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्यानंतर हा सगळा प्रकार समोर आला होता. विद्यापीठ प्रशासनाने या प्रकरणी चतु:श्रृंगी पोलिसांत तक्रार दिली होती. त्याने केलेल्या या कृत्यामुळे प्रशासनाने संताप व्यक्त केला होता. मात्र आता विद्यापीठ प्रशासनातील व्यक्तींकडून शुटींगसाठी मदत मिळाली असल्याचं समोर आल्याने खळबळ उडाली आहे.
गाणं व्हायरल झाल्यानंतर आणि विद्यापीठाच्या तक्रारीनंतर चतु:श्रृंगी पोलिसांनी संबंधित रॅपरला चौकशीसाठी बोलावलं होतं. त्या रॅपरची चौकशी केली होती. त्यानंतर या प्रकरणात पोलीस मदत करत नसल्याचा आरोप राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाडांनी केला होता. त्यांनी रॅपरला पाठिंबा देखील दिला होता. तसेच पुणे पोलिसांनी सहकार्य केले नसल्याचा आरोप ही त्यांनी ट्विटच्या माध्यमातून आरोप केला होता. विद्यापीठाच्या तक्रारी सोबतच राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्यावतीने देखील चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली होती.
योग्य कारवाई झाली पाहिजे...
हे सगळं प्रकरण किंवा हा प्रकार निंदनीय असल्याचं युवासेनेचे सचिव वरुण सरदेसाई यांनी म्हटलं आहे. ते म्हणाले की, या रॅप सॉंग मध्ये वापरण्यात आलेली भाषा आणि त्यात वापरण्यात आलेली हत्यारं ही विद्यापीठाच्या परिसरात वापरणं हा अत्यंत भयंकर प्रकार आहे. आम्ही पदाधिकारी आणि बाकी कार्यकर्ते जेव्हा या विद्यापीठाच्या परिसरात येतो तेव्हा सगळ्यांची चौकशी सुरक्षारक्षकांकडून केली जाते आणि कमीत कमी पदाधिकाऱ्यांना कार्यालयात प्रवेश दिला जातो. असं होत असताना जर शुटींग, अश्लील भाषा वापरुन रॅप गाणं तयार केलं जात असेल आणि तलवारी काढल्या जात असतील तर यावर कारवाई झाली पाहिजे, असं ते म्हणाले.























