Gautami Patil And Margale Family: 'अपघात प्रकरणात ट्विस्ट', गौतमी पाटील-मरगळे कुटुंब यांच्यात सेटलमेंट? सगळेच दिसले एकत्र, नेमकं काय घडलं?
Gautami Patil And Margale Family: गौतमी पाटीलने हे व्हिडीओ तिच्या सोशल मिडीया अकाऊंटवरून शेअर केले आहेत. यामध्ये मरगळे परिवार आणि गौतमी पाटील एकत्रित दिसत आहेत.

पुणे: नृत्यांगना गौतमी पाटील (Gautami Patil) आणि कार अपघातातील मरगळे कुटुंबातील(Margale Family) गाजलेला वाद अखेर थंडावल्याची माहिती समोर आली आहे. काही दिवसांपूर्वी दोन्ही बाजूंमध्ये तीव्र आरोप-प्रत्यारोपांची मालिका रंगली होती. मरगळे कुटुंब गौतमीविरोधात आक्रमक झालं होतं, तर गौतमी पाटीलने (Gautami Patil) उलटपक्षी मरगळे कुटुंबावर लाखो रुपयांची मागणी केल्याचा गंभीर आरोप केला होता. या प्रकरणाचा तपास पोलिसांकडे सुरू होता, आणि दोन्ही पक्षांकडूनही टोकाच्या प्रतिक्रिया दिल्या जात होत्या. गौतमी पाटीलने (Gautami Patil) पत्रकार परिषद घेत त्यांना मदत पाठवल्याची आणि त्यांनी मदत नाकारल्याची माहिती दिली होती, त्याचबरोबर आता सर्व पोलीस तपासानुसार आणि कायद्यानुसार होऊ द्या अशी भूमिका घेतली होती, तर मरगळे कुटुंबाने तिच्यावर आरोपांची सरबत्ती केली होती. या पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर मोठी चर्चा रंगली होती. काहीजण गौतमीवर(Gautami Patil) टीका करत होते, तर काहींनी तिची बाजू घेत पाठिंबा दर्शवला होता.
Gautami Patil And Margale Family: गौतमी पाटील आणि मरगळे कुटुंबियांचा एकत्र व्हिडिओ समोर
मात्र आता या वादाला अनपेक्षित वळण लागले आहे. गौतमी पाटील आणि मरगळे कुटुंबियांचा एकत्र व्हिडिओ समोर आला असून त्यात दोघांमधील मतभेद मिटल्याचे दिसते. व्हिडिओमध्ये अपर्णा मरगळे या हसऱ्या चेहऱ्याने सांगताना दिसतात की, गौतमी पाटीलने स्वतः येऊन माझ्या वडिलांची विचारपूस केली. दरम्यान, गौतमी पाटील मात्र शांतपणे, कोणताही हावभाव न दाखवता बसलेली दिसते. या दृश्यामुळे ‘वाद मिटला की कहाणीला नवीन ट्विस्ट आला?’ असा प्रश्न आता नेटीझन्स विचारताना दिसत आहेत. दरम्यान अपघातातील जखमी झालेले रिक्षाचालक मरगळे यांना रूग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे, याचवेळी गौतमी पाटील आणि मरगळे परिवार एकत्रित आल्याचं दिसून आलं आहे.
Gautami Patil And Margale Family: अपर्णा मरगळेने मानले गौतमीचे आभार
गौतमी पाटीलने हे व्हिडीओ तिच्या सोशल मिडीया अकाऊंटवरून शेअर केले आहेत. यामध्ये मरगळे यांची मुलगी अपर्णा मरगळे हिने म्हटलं आहे की, आज 15 ऑक्टोबर रोजी माझ्या वडिलांना दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. यावेळी गौतमी ताई पाटील यांनी येऊन माझ्या वडिलांच्या तब्येतीचा आढावा घेतला विचारपूस केली आणि आम्ही जो अप्रोच केला त्यानंतर ते आल्या त्यासाठी त्यांचा धन्यवाद, या व्हिडीओनंतर आता नेटकऱ्यांमध्ये वेगवेगळ्या चर्चा रंगल्या आहेत. त्याचबरोबर या व्हिडीओवरती दोन्ही बाजुने कमेंट आल्याचं दिसून येत आहे.
Gautami Patil And Margale Family: नेमकं प्रकरण काय?
काही दिवसांपूर्वी नृत्यांगना गौतमी पाटील हिच्या नावावर असलेल्या चारचाकी वाहनाने झालेल्या अपघातामुळे मोठा वाद निर्माण झाला होता. या गाडीने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या रिक्षाला जोरदार धडक दिली होती, ज्यात रिक्षाचालक गंभीर जखमी झाला होता. धडकेनंतर गौतमीचा चालक घटनास्थळावरून पळून गेला, तर स्थानिक नागरिकांनी तत्काळ रिक्षाचालकाला रुग्णालयात दाखल केलं. जखमीवर दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार सुरू होते.
या अपघाताबाबत पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती. चौकशीत समोर आलं की, संबंधित चारचाकी गाडी गौतमी पाटीलच्या नावावर नोंद आहे. त्यामुळे प्रकरणाला अचानक कलाटणी मिळाली आणि गौतमीविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी पीडित कुटुंबीयांकडून होत होती. मात्र, अपघातावेळी गौतमी गाडीत नसल्याचे स्पष्ट झाल्याने पोलिसांनी “तिच्यावर गुन्हा दाखल करता येणार नाही” असं सांगितलं. वाढत्या दबावानंतर गौतमीने पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली. ती म्हणाली की, “पीडित कुटुंबियांनी माझ्याकडे लाखो रुपयांची मागणी केली.” या दाव्यानंतर अपर्णा मरगळेने तीव्र प्रतिक्रिया देत गौतमीला थेट आव्हान दिलं “कोणाकडून लाखो मागितले ते सांगा!” या सर्व घडामोडींमुळे वाद शिगेला पोहोचला होता. मात्र, अनपेक्षितरीत्या गौतमी पाटील आणि मरगळे कुटुंबीयांमधील वाद आता मिटल्याची माहिती समोर आली असून, त्यामुळे प्रकरणाला नवं वळण मिळालं आहे.























