Pune Nashik Highway Accident : आयशरने मागून धडक दिली, मॅक्स ऑटो हवेत उडून एसटीवर आदळली, पुणे-नाशिक महामार्गावर 9 जणांचा करुण अंत
Pune Nashik Highway Accident : पुणे-नाशिक महामार्गावरील नारायणगावजवळ भीषण अपघाताची घटना घडली आहे. यात 9 जणांचा मृत्यू झालाय.
Pune-Nashik Highway Accident : पुणे-नाशिक महामार्गावरील नारायणगावजवळ (Narayangaon) भीषण अपघाताची (Accident News) घटना घडली आहे. यात चार महिला, चार पुरुष आणि एका बाळाचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिक आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना तात्काळ खासगी आणि शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे. जखमींवर सध्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, पुणे-नाशिक महामार्गावरील नारायणगावजवळ आज सकाळी दहा वाजेच्या सुमारास भीषण अपघात झाला. प्रवासी वाहतूक करणाऱ्या मॅक्स ऑटो गाडीला पाठीमागून आयशर टेम्पोने जोरदार धडक दिली. यामुळे मॅक्स ऑटो ही चेंडूप्रमाणे हवेत फेकली गेली आणि पुढे एक ब्रेक फेल झालेली एसटी रस्त्याच्या बाजूला उभी होती. त्या एसटीवर जाऊन मॅक्स ऑटो आदळली. या अपघातात आयशर आणि मॅक्स ऑटोचा अक्षरशः चुराडा झाला आहे.
अपघातात नऊ जणांचा मृत्यू
या भीषण अपघातात चार महिला, चार पुरुष आणि एका बाळाचा जागीच मृत्यू झाला आहे. तर तीन जण जखमी झाले आहेत. अपघातातील मृतांचा आकडा वाढण्याची भीती वर्तवली जात आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि स्थानिक नागरिक घटनास्थळी दाखल झाले आहेत. अपघातातील जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. काहींची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळत आहे.
मृतांच्या वारसांना पाच लाखांची मदत
दरम्यान, या अपघातानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मृतांच्या वारसांना मदतीची घोषणा केली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी 'एक्स'वर याबाबत माहिती दिली आहे. त्यांनी म्हटलंय की, पुणे-नाशिक महामार्गावर नारायणगाव जवळ झालेल्या भीषण अपघातात 9 कामगारांचा मृत्यू झाल्याची घटना अतिशय दुर्दैवी आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. जखमींच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी, अशी प्रार्थना करतो. मृतांच्या वारसांना 5 लाख रुपये आर्थिक सहाय्य मुख्यमंत्री सहायता निधीतून करण्यात येईल. जखमींच्या उपचाराची योग्य काळजी घ्या, असे मी पुणे पोलिस अधीक्षक यांना सांगितले आहे, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या