(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Pune Railway : ऐन दिवाळीत पुण्याहून विदर्भात जाणाऱ्या रेल्वे रद्द; रेल्वेने पर्यायही दिला नसल्याने नागरिकांची तारांबळ
पुण्यातून विर्दभात जाणाऱ्या रेल्वे 19 ऑक्टोंबरपर्यंत रद्द करण्यात आल्या आहे. ऐन दिवाळीच्या तोंडावर रेल्वे प्रशासनाने विदर्भात जाणाऱ्या प्रवाशांना चांगलाच धक्का दिला आहे.
Pune Railway : पुण्यातून विर्दभात जाणाऱ्या रेल्वे गाड्या 19 ऑक्टोंबरपर्यंत रद्द (Railway cancel) करण्यात आल्या आहे. ऐन दिवाळीच्या तोंडावर रेल्वे प्रशासनाने विदर्भात (pune Nagpur) जाणाऱ्या प्रवाशांना चांगलाच धक्का दिला आहे. दौंड ते मनमाड या मार्गाचं दुरुस्तीचं काम सुरु असल्याने या गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे अनेक प्रवाशांची चांगलीच तारांबळ उडाली आहे. दिवाळीच्या तयारीसाठी विदर्भातील नागरिक काही महिने आधीच तिकीट काढून ठेवतात. यंदा सगळ्या गाड्यांचं बुकिंग पूर्ण होत आलं होतं. शिवाय अनेकांनी अधिकचे पैसे मोजून तिकीट खरेदी केलं होतं. दिवाळीच्या प्रवासाची सोय करुन ठेवली होती. मात्र गाड्या रद्द झाल्याने त्यांच्यासमोर मोठा प्रश्न उभा राहिला आहे.
विदर्भात जाण्यास गाड्या कमी
उत्सव काळात सर्वच गाड्यांना प्रचंड गर्दी असल्याने ऐनवेळी तिकीट मिळणे अशक्यप्राय आहे. त्यातच पुण्यातून नागपूरला जाण्यासाठी गाड्यांची संख्या खूप कमी आहे. त्यामुळे या मार्गावर तर प्रवाशांची झुंबड उडत असते. त्यातच रेल्वेने नागपूरला जाणाऱ्या गाड्या रद्द केल्याने प्रवाशांना संतापले आहे. खासगी ट्रॅव्हल्ससाठीचे तिकीटही महाग असल्याने अनेकांची कोंडी झाली असून रेल्वेच्या कारभारावर संताप व्यक्त केला जात आहे.
रेल्वेकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, सोलापूर विभागात दौंड ते मनमाड रेल्वेमार्गावर काष्टी ते बेलबंडी स्थानकांदरम्यान ब्लॉक जाहीर करण्यात आला आहे. या काळात रेल्वे मार्गाचे विविध तांत्रिक कामे केली जाणार आहेत. त्यामुळे काही गाड्या रद्द केल्या आहेत. यात पुणे-नागपूर गरीबरथ, हमसफर एक्स्प्रेस, अमरावती सुपरफास्ट या गाड्यांचा समावेश आहे. त्याचप्रमाणे नागपूरहून येणाऱ्या गाड्याही रद्द करण्यात आल्याने पुण्यात येणाऱ्या प्रवाशांनाही चांगलाच फटका बसणार आहे.
या गाड्या रद्द
-7 ते 21 ऑक्टोबरदरम्यान धावणारी अजनी एक्स्प्रेस (Ajni Express)
-6 आणि 13 ऑक्टोबरची पुणे-नागपूर हमसफर (pune - nagpur Hamsafar express)
-5 ते 19ऑक्टोबरपर्यंत पुणे-नागपूर गरीबरथ (Pune- nagpur garibrath)
-अमरावती एसी एक्स्प्रेसही 19 ऑक्टोबरपर्यंत रद्द
ट्रॅव्हल्सची तिकीटं आवाक्या बाहेर
नागपूर आणि अमरावतीहून पुण्यात येणाऱ्या गाड्याही धावणार नसल्याचे रेल्वेकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. या गाड्या रद्द झाल्याने प्रवाशांना रेल्वेने नागपुरात जाण्यासाठीचा मार्ग बंद झाला आहे. एवढ्या कमी काळात आता विदर्भात जाण्यासाठी दुसरा मार्ग मिळणं अवघड आहे त्यामुळे दिवाळीला घर कसं गाठायचं हा प्रश्न निर्माण झाला आहे. दरवर्षी दिवाळी आली की ट्रॅव्हल्सची तिकीटं वाढवण्यात येतात. एरवी 1200 असलेली तिकीट दिवाळीच्या काळात 4000 असते. त्यामुळे नागरिक रेल्वेला प्राधान्य देतात मात्र यावर्षी नागरिकांचा भ्रमनिरास झाला आहे.