अंगावर किलोभर दागिने, पण गृहोपयोगी वस्तूंसाठी पुण्यातील गोल्डमॅनकडून पत्नीचा छळ
किलोभर सोन्याचे दागिने घालून मिरवणाऱ्या सनी वाघचौरेने गृहोपयोगी वस्तूंसाठी पत्नीचा छळ केल्याचा आरोप आहे. चिंचवड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा ही दाखल झाला आहे.
![अंगावर किलोभर दागिने, पण गृहोपयोगी वस्तूंसाठी पुण्यातील गोल्डमॅनकडून पत्नीचा छळ pune goldman Sunny Waghchaure accused of harassing his wife for household items अंगावर किलोभर दागिने, पण गृहोपयोगी वस्तूंसाठी पुण्यातील गोल्डमॅनकडून पत्नीचा छळ](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2020/10/23220741/Nana_Feature_Photo_720X540.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
पिंपरी - चिंचवड : "खायचे दात आणि दाखवायचे दात, हे वेगवेगळे असतात." असं गैरप्रकार करणाऱ्यांबाबत अनेकदा बोललं जातं. पिंपरी चिंचवडमध्ये मात्र हे प्रत्यक्षात सिद्ध झालंय. किलोभर सोन्याचे दागिने घालून मिरवणाऱ्या सनी वाघचौरेने गृहोपयोगी वस्तूंसाठी पत्नीचा छळ केल्याचा आरोप आहे. चिंचवड पोलीस स्टेशनमध्ये तसा गुन्हा ही दाखल झालाय, त्यात सासू-सासरे आणि नंदेचा ही समावेश आहे. त्यामुळे गोल्डमॅन म्हणून राज्यात परिचित असणाऱ्या सनीला कधीही अटक होऊ शकते.
सनी वाघचौरेला काही वर्षांपूर्वी पर्यंत कोणी ओळखत नसेल. पण तो ज्या जिल्ह्यात राहतो त्या पुण्यात गोल्डमॅनचं फॅड आलं. यात सनीने देखील उडी घेतली आणि तो अल्पावधीतच प्रचलीत झाला. गेल्या काही दिवसांपासून किलोभर सोन्याचे दागिने घालून तो अनेक ठिकाणी मिरवताना दिसतो. त्यामुळेच त्याला गोल्डमॅन सनी वाघचौरे नावाने ओळखलं जाऊ लागलं. यातूनच तो बॉलिवूडच्या अनेक कलाकारांशी जवळीक साधू शकला. छोट्या पडद्यावरील अनेक कार्यक्रमांना उपस्थित राहून तो घराघरात ही पोहचला. ही एक बाजू सर्वश्रुत आहे. मात्र दुसरी बाजू ही धक्कादायक असून सनीचा काळा चेहरा समोर आणणारी आहे. कारण आई-वडिलांकडून गृहोपयोगी वस्तू आणाव्यात यासाठी त्याने पत्नीचा छळ केला असल्याचा आरोप आहे. पत्नी गर्भवती असताना गर्भपाताची औषधं देऊन गर्भपात केल्याचा, तसेच मारहाण, शिवीगाळ करत मानसिक आणि शारीरिक छळ केला. असा गुन्हा ही पिंपरी चिंचवडमध्ये पत्नीने दाखल केलाय. 2011 पासून सुरू असलेल्या या छळात सासू, सासरे आणि नंदेने ही मदत केल्याचं गुन्ह्यात नमूद आहे.
सनीवर गुन्हा दाखल करणारी ही दुसरी पत्नी आहे. पहिल्या पत्नीबाबत मात्र अद्याप माहिती मिळू शकलेली नाही. सनी जे दागिने घालून मिरवतोय त्यापैकी अनेक दागिने हे पहिल्या पत्नीकडून घेतल्याची प्राथमिक माहिती पोलिसांकडे आहे. सोन्याच्या दागिने दाखवून त्याने काही महिलांना जाळ्यात खेचलंय. दुसऱ्या पत्नी सोबत राहत असतानाच तो तिसऱ्या महिलेला घरी घेऊन यायचा. कुटुंबियांच्या देखतच हे सुरू असताना पत्नी वगळता कोणीच आक्षेप घेतला नाही. हे सर्व असह्य झाल्यानंतर एप्रिल 2020 मध्ये त्या माहेरी आल्या. दरम्यानच्या काळात प्रकरण मिटविण्याचे प्रयत्न झाले, पण तोडगा निघालाच नाही. शेवटी चिंचवड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय. याप्रकरणी त्याला कधी ही अटक होऊ शकते.
संबंधित बातम्या :
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)