मेट्रोवाल्यांनी फसवलं, आम्हाला अडगळीत टाकलं, पुण्यातील कचरा वेचक महिलांच्या अडचणी पाहून तुमच्याही डोळ्यात येईल पाणी!
Pune News : पुणे मेट्रोमुळे स्थलांतरित झालेल्या महिलांनी त्यांच्या व्यथा मांडल्या आहेत. यातून धक्कादायक वास्तव समोर आले असून त्यांनी शासनावर आरोप केले आहेत.
Pune News : पुण्यातील तोफखाना (Pune Tofkhana) परिसरात असलेल्या राजीव गांधीनगरच्या (Rajiv gandhi Nagar) आम्ही सर्व रहिवासी आहोत. या ठिकाणी तीन वर्षांपूर्वी मेट्रोचे (Pune Metro) काम सुरू करण्यात आलं आणि आम्हाला या ठिकाणाहून दुसरीकडे स्थलांतरित करण्यासाठी सांगण्यात आलं. ज्यावेळी आमचं स्थलांतर करण्यात आलं. त्यावेळीस आम्हाला राहायला पक्क घर दिले जाईल, 24 तास पाणी दिले जाईल, पुढील पाच वर्षांचा मेंटेनन्स भरला जाईल, असे आश्वासन देण्यात आले होते, मात्र प्रत्यक्षात आम्हाला अडगळीत टाकले असल्याची प्रतिक्रिया पुण्यातील कचरा वेचक महिलांनी दिली आहे.
पुणे मेट्रोच्या कामासाठी काही कुटुंबांना स्थलांतरित (Migrants) करण्यात आले होते. स्थलांतरावेळी त्यांना अनेक आश्वासन देण्यात आली. प्रत्यक्षात मात्र त्यांना अनेक अडचणीचा सामना करावा लागत आहे. एबीपी माझाने पुण्यातील कचरा वेचक महिलांशी संवाद साधला असता धक्कादायक वास्तव समोर आले आहे. या महिलांनी शासनावर गंभीर आरोप केले आहेत.
आम्हाला पुणे शहरातून बाहेर हाकललं
एक महिला म्हणाली की, गेल्या एक ते दीड वर्षांपासून आम्ही इकडे राहायला आलेलो आहोत. या ठिकाणी प्रचंड अडचणींचा सामना करावा लागत आहे. आम्हाला पुणे (Pune) शहरातून बाहेर हाकलून हडपसरपासून (Hadapsar) दहा किलोमीटर लांब या अडगळीत आणून ठेवले आहे. या ठिकाणी ना पाणी आहे ना वाहतुकीची सोय आहे. 15 मजली एसआरए बिल्डिंगमध्ये एक दवाखाना देखील नाही. त्यामुळे अनेक वेळा बिल्डिंगमध्ये लाईट गेल्यानंतर पायऱ्या चढून वृद्धांचा मृत्यू झाला आहे. तर गाडी उपलब्ध न झाल्यामुळे अनेक महिलांची डिलिव्हरी रस्त्यातच झाली आहे. एकंदरीतच आमची फसवणूक झाली आहे. बाबांना केवळ 14 वर्षे वनवास भोगला आम्हाला आता कायमस्वरूपी वनवास भोगायचा आहे.
आम्ही काय खाणार आणि कसं कुटुंब चालवणार?
त्या पुढे म्हणाल्या की, आमची 65 वर्षीय कमल ही महिला एकटी आहे. आज महागाई मोठ्या प्रमाणात वाढली आहे. ती दररोज पौड येथे कचरा वेचायला जाते. दररोज येण्याजाण्यासाठी शंभर रुपयाचा खर्च तिचा आहे. सध्या कमावून कमी खर्च जास्त झाला आहे. दिवसभर कचरा बाटली गोळा केल्यानंतर त्याच्या विक्रीतून जे पैसे येतात त्याच्यातून आम्ही संसार चालवतो. मात्र, आता पैसे शिल्लक राहत नाहीत. आमची लोक आम्हाला दररोज दुरचा प्रवास करत लागत असल्यामुळे शहरात राहायला गेली. मात्र तिथे देखील सात ते आठ हजार रुपये घरभाडे आहे. आमचा महिन्याचा पगारदेखील तेवढाच आहे. त्यामुळे आम्ही काय खाणार आणि कसं कुटुंब चालवणार? हा प्रश्न आहे. आमच्या परिसरातली मलमुत्राच वहन करणारी पाईप फुटून आता दोन महिने झाले. सगळी घाण रस्त्यावर आली आहे. मात्र अद्याप कोणीही दुरुस्तीसाठी पुढे आलेला नाही.
मेट्रो वाल्यांकडून आमची फसवणूक
1977 पासूनच्या आम्ही त्या ठिकाणचे रहिवासी होतो. त्या ठिकाणी आम्ही जे टॅक्स भरले त्याचे देखील पावती आमच्याकडे आहेत असं असताना देखील आम्हाला घर मिळालं नाही. मात्र 2015 मध्ये ज्यांनी नोंदणी केल्या त्यांना तीन-तीन घरे देण्यात आली. केवळ तीस ते चाळीस हजार रुपये यांनी घेतले आणि तीन-तीन घरं वाटली. मेट्रोवाल्यांनी (Pune Metro) सरळसरळ आमची फसवणूक केली. आमच्या झोपड्यात तोडताना जे पंचनामे केले ते देखील कागदपत्र (Documents) आमच्याकडे आहेत. मात्र उपयोग काहीच झाला नाही, असे एका महिलेने म्हटले आहे.
सात रुपये खायला नाहीत, सात हजार रुपयांचा टॅक्स कुठून भरायचा?
आम्ही तोफखाना परिसरात होतो. त्यावेळेस आमचा काही खर्च नव्हता. सुखाने राहत होतो इथे आम्हाला पंधरा मजल्याचे बिल्डिंगमध्ये आणून टाकले आहे. खर्चायला पैसे नाहीत ही वाईट परिस्थिती आहे. तुम्हीच सांगा मग कशाला आम्ही मोदीला निवडून द्यायचं. मोदींनी आमच्यासाठी काय केलं? नुसतं म्हणत होते अच्छे दिन आयेंगे जर जमणार नव्हतं तर सगळ्यांना मारून तरी टाकायचं होतं. बिल्डिंगमध्ये चढता येत नसल्यामुळे दहा ते पंधरा लोकांचा जीव गेला. दवाखान्यात वेळीच पोहोचू शकत नसल्यामुळे अनेक महिला रस्त्यात बाळंतीण झाल्या. सोन्यासारखी जागा आमची घेतली. काय करायचे त्या मेट्रोला तुम्हीच सांगा. या मोदींनी (PM Narendra Modi) काय चांगलं केलं. चांगली चांगली पोरं मरायला लागली. मग म्हाताऱ्या माणसांनी जगून काय करायचं. सात रुपये खायला नाहीत. सात हजार रुपयांचा टॅक्स कुठून भरायचा? कचरा वेचायला जाताना पंधरा रुपये सुद्धा आमच्याजवळ नसतात. एकमेकीला विचारून पैसे गोळा करून आम्ही कामावर जातो, अशा भावना महिलांनी व्यक्त केल्या आहेत.
आणखी वाचा