Pune Metro : रुबी हॉल ते रामवाडी मेट्रोचं पंतप्रधान मोदींकडून हिरवा झेंडा; या मार्गिकेवर स्टेशन्स किती आणि तिकीट दर काय असेल?
पुणे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज पिंपरी चिंचवड महानगरपालिका ते निगडी, पुणे मेट्रोचे भूमीपूजन करण्यात आले. यावेळी रुबी हॉल क्लिनिक ते रामवाडी, पुणे मेट्रोला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हिरवा झेंडा दाखवला.
पुणे : पुणे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या (Pm Narendra Modi) हस्ते आज पिंपरी चिंचवड महानगरपालिका ते निगडी, पुणे मेट्रोचे भूमीपूजन करण्यात आले. यावेळी रुबी हॉल क्लिनिक ते रामवाडी, (Pune Metro) पुणे मेट्रोला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हिरवा झेंडा दाखवला. पंतप्रधानांनी आज कोलकाता येथून विविध प्रकल्पांचे लोकार्पण आणि भूमिपूजन केले. यावेळी त्यांनी पुणे आणि पिंपरी चिंचवड मधील या मेट्रो प्रकल्पांची ऑनलाईन प्रणालीद्वारे सुरुवात केली. या कार्यक्रमासाठी सह्याद्री अतिथीगृह येथून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार हे देखील सहभागी झाले होते.
पंतप्रधान लोकार्पण करत असलेल्या पुण्यातील रुबी हॉल क्लिनिक ते रामवाडी हा मेट्रो मार्ग सहा किलोमीटरचा असून 5 फेब्रुवारी 2024 रोजी या मेट्रोची ट्रायल रन झाली आहे. यापूर्वी 6 मार्च 2022 रोजी पीसीएमसी ते फुगेवाडी या सात किलोमीटर आणि वनाज ते गरवारे पाच किलोमीटर मेट्रो मार्गाचे उद्घाटन पंतप्रधानांच्या हस्ते करण्यात आले होते फुगेवाडी ते सिविल कोर्ट 6.91 किमी आणि गरवारे ते रुबी क्लिनिक 4.75 किमी अशा मेट्रोच्या टप्प्यांचे लोकार्पण पंतप्रधानांच्या हस्ते 1 ऑगस्ट 2023 रोजी करण्यात आले होते आणि आज रुबी हॉल क्लिनिक ते रामवाडी या सहा किलोमीटर मार्गाचे लोकार्पण पंतप्रधानांच्या हस्ते करण्यात आले.
तिकीट दर किती असेल?
वनाज ते रामवाडी- 30 रुपये
रुबी हॉल ते रामवाडी- 20 रुपये
रुबी हॉल ते रामवाडी कोणते स्टेशन्स पडणार?
रुबी हॉल ते रामवाडी मार्गिकेवर तीन स्टेशन्स पडणार आहेत. बंड गार्डन, येरवडा आणि कल्याणी नगर या तिन्ही स्टेशनची नावं आहेत.
पिंपरी चिंचवड महानगरपालिका ते निगडी या पहिल्या टप्प्यातील मेट्रोचे भूमिपूजन
पंतप्रधानांच्या हस्ते पिंपरी चिंचवड महानगरपालिका ते निगडी या पहिल्या टप्प्यातील मेट्रोचे भूमिपूजन देखील करण्यात आले. हा मार्ग 4.4 किमीचा असून पूर्णपणे उन्नत मार्ग आहे. यामुळे स्वारगेट ते पीसीएमसी कॉरिडॉर हा निगडीपर्यंत विस्तारित होणार आहे. गेल्या पावणे दोन वर्षांपासून महाराष्ट्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी जी यांच्या मार्गदर्शनाने मोठ्या प्रमाणावर विकास कामे सुरू आहेत. रेल्वे आणि मेट्रोसाठी सुद्धा राज्यासाठी मोठ्या प्रमाणावर तरतूद करण्यात आली आहे ज्याचा फायदा नागरिकांना होत आहे. आज लोकार्पण करण्यात आलेल्या पुण्यातील मेट्रो मार्गाचे भूमिपूजन देखील आदरणीय प्रधानमंत्री यांच्या हस्ते करण्यात आले होते, आणि आज त्यांच्याच हस्ते ही मेट्रो सेवा सुरू देखील झाली आहे. वाढत्या शहरीकरणामुळे स्मार्ट आणि दर्जेदार वाहतुकीची गरज आहे. मेट्रो सेवेमुळे ही गरज पूर्ण होऊन इंधन आणि वेळेत देखील मोठी बचत होणार आहे. मोदींची गॅरंटी असलेले सर्व प्रकल्प आणि विकास कामे गतीने सुरू असल्यामुळे महाराष्ट्राला मोठा फायदा होत आहे, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले आहेत.
इतर महत्वाची बातमी-
Pune Crime News : पुणे आंतरराष्ट्रीय ड्रग्स प्रकरणात ईडीची उडी; आरोपींच्या मालमत्तेची माहिती मागवली!